...आता तर पावसाची आकडेवारीच झाली गायब !

‘महावेध’ प्रकल्पाच्या नोंदीतून मालवण येथे शनिवारी सकाळपर्यंत ४८६ मिलिमीटर पावसाची नोंद आहे. ‘महावेध’वरून ‘महारेन’ संकेतस्थळावर ही माहिती अपलोड हाेताना तांत्रिक अडचणी आल्या आहेत. ही बाब निदर्शनास आल्याने दोन दिवसांपासून संकेतस्थळावर आकडेवारी प्रसिद्ध केली जात नाही. सर्व्हरची तांत्रिक अडचण दूर करण्याचे काम सुरू असून, लवकरच ही माहिती शेतकऱ्यांना उपलब्ध होईल. - उदय देशमुख, मुख्य सांख्यिक, कृषी विभाग, पुणे.
पाउसाची आकडेवारीच गायब
पाउसाची आकडेवारीच गायब

पुणे : राज्यात एकाच ठिकाणी पडलेल्या पावसाच्या दोन वेगवेगळ्या नाेंदी हाेत असल्याचे, तसेच यात मोठी तफावत असल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर एकच गोंधळ उडाला. यातच कृषी विभागाच्या संकेतस्थळावर, तसेच मोबाईल अॅपवर गेल्या दोन दिवसांपासून पावसाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात येत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम वाढला आहे.  केंद्र सरकारचा हवामान विभाग व राज्य सरकारच्या कृषी विभागाकडून पावसाच्या नोंदी घेण्यात येतात. शुक्रवारी (ता. ८) व शनिवारी (ता. ९) मालवणसह कोकण किनारपट्टीला पावसाने झोडपून काढले. शनिवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये मालवण येथे उच्चांकी ४९१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली, तर वेंगुर्ला, भिवंडी येथेही २०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला होता. मात्र, कृषी विभागाच्या संकेतस्थळावर आणि मोबाईल अॅपवर मालवण येथे २६.३, वेंगुर्ला येथे ३७.८, तर भिवंडी येथे ५५.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली होती. पीकविमा कंपन्यांशी साटेलोटे असल्याने त्यांच्या फायद्यासाठी खोटी आकडेवारी देण्यात येत असल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केला होता. त्यानंतर १० आणि ११ जून रोजीची पावसाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. तर, ९ जून रोजीच्या पावसाची नोंदही कायम असल्याचे दिसून आले आल्याने संभ्रम आणखीनच वाढला आहे.  कृषी विभागाच्या ‘महारेन’ या प्रकल्पाअंतर्गत राज्यातील महसूल यंत्रणेकडून मंडलनिहाय पावसाची आकडेवारी संकलित करून ती संकेतस्थळावर, तसेच ‘महारेन’ या मोबाईल अॅपवर प्रसिद्ध केली जात होती. मात्र, राज्य सरकारने आता ‘स्कायमेट’ या खासगी संस्थेबरोबर ‘महावेध’ हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. स्कायमेट या संस्थेने सर्व मंडळांमध्ये स्वयंचलित हवामान केंद्र कार्यान्वीत केली असून, त्यातून ‘महारेन’ला पावसाची आकडेवारी उपलब्ध होत असते. महसूल यंत्रणेकडून घेतली जाणारी माहिती मात्र आता बंद करण्यात आली आहे. स्कायमेटकडून पावसाबरोबरच पाऊस, तापमान, वाऱ्याची दिशा, वाऱ्याचा वेग, आर्द्रता या पाच घटकांची माहिती उपलब्ध होते. मात्र, नेटवर्कमधील अडथळ्यांमुळे केंद्रांचा संपर्क खंडित झाल्यास हा डेटा सर्व्हरला येत नाही. ही माहिती नंतर उपलब्ध होत असते. त्यात सध्या काही तांत्रिक अडचणी असल्याने ही चुकीची माहिती संकेतस्थळावर दिसून आली. ती तांत्रिक अडचणी दूर करण्यात येत असून, सेवा सुरळीत होण्यास काही दिवस लागतील, असे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले.  ‘स्कायमेट’चे डाॅ. संजय मोरे म्हणाले, की स्कायमेटने महसूल मंडळांमध्ये स्वयंचलित हवामान केंद्र बसविली आहेत. त्यात १० मिनिटांनी सातत्याने स्वयंचलित पद्धतीने आकडेवारी उपलब्ध होते. केंद्रावर आकडेवारी (डाटा) गोळा होऊनही तांत्रिक अडचणीमुळे हा डेटा उपलब्ध होत नाही. हवामान विभागाकडे सकाळी आठ वाजेपर्यंतच्या २४ तासांतील पावसाची नोंद असते. मात्र, महावेधकडे दररोज रात्री १२ वाजेपर्यंतच्या २४ तासांतील पावसाची नोंद होते. त्यामुळे आकडेवारीमध्ये तफावत दिसून येते. महावेधकडे शनिवारी (ता. ९) मालवण येथे ९५ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद आहे. मात्र, तरीही ज्या ठिकाणी समस्या आली आहे. तेथे भेट देऊन पर्जन्यमापकामध्ये काही तांत्रिक दोष असतील, तर ते तपासण्यात येतील, असेही डॉ. मोरे यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com