कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात पावसाचा जोर वाढण्यास प्रारंभ

कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात पावसाचा जोर वाढण्यास प्रारंभ
कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात पावसाचा जोर वाढण्यास प्रारंभ

पुणे ः गेल्या दोन ते तीन दिवसांपासून कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्यास सुरवात झाली आहे. गुरुवारी (ता.५) कोकणात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार, तर विदर्भात मुसळधार पाऊस पडला. कोकणातील माथेरान येथे उच्चांकी १७० मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली असून दावडी, डुंगरवाडी, भिरा, लोणावळा या घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस पडला. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, पालघर, मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, नगर, नाशिकमधील काही भागात पाऊस पडला.  उत्तर महाराष्ट्राच्या किनारपट्टीपासून ते केरळपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने कोकण, मध्य महाराष्ट्रातील अनेक भागात पाऊस पडत आहे. येत्या सोमवार (ता.९) पर्यंत कोकण, गोव्यात काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. आज (शुक्रवारी) आणि उद्या (शनिवारी) कोकणात काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार तर मराठवाड्यात मुसळधार पाऊस पडेल. कोकणात अतिवृष्टी  गेल्या काही दिवसांपासून कोकणात पावसाचा जोर कायम आहे. गुरुवारी (ता.५) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये कोकणातील माथेरान, हर्णे, विक्रमगड येथे सर्वाधिक पाऊस पडला. तसेच पालघर, पोलादपूर, रोहा, वाडा, मानगाव, अंबरनाथ, कल्याण, चिपळूण, मंडणगड, म्हसळा, पनवेल, सुधागडपाली, उल्हासनगर, जव्हार, खेड, महाड, मोखडा, तळासरी या शहरामध्ये शंभर मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. उर्वरित भागातही जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळे भात लागवडीला वेग आला आहे.  

मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी जोरदार  मध्य महाराष्ट्रातही पावसाने चांगलाच जोर धरला आहे. दोन दिवसांपासून पुणे, नगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक जिल्ह्याच्या पश्चिमेकडील भागात जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे ओढे, नाले वाहू लागले असून धरणातील पाणीसाठा हळूहळू वाढू लागला आहे. पुणे जिल्ह्यातील लोणावळा, साताऱ्यातील महाबळेश्वर येथे १६० मिलिमीटर पावसाची सर्वाधिक नोंद झाली आहे. नाशिकमधील इगतपुरी येथेही ९० मिलिमीटर पाऊस पडला. कोल्हापुरातील गगनबावडा, शाहूवाडी, राधानगरी या ठिकाणीही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. 

विदर्भात पावसाचा जोर वाढण्यास सुरवात  गेल्या काही दिवसांपासून विदर्भात पावसाचा जोर काहीसा कमी झाला होता. मात्र, आता विदर्भात पुन्हा पावसाचा जोर वाढण्यास सुरवात झाली आहे. विदर्भातील भामरागड, लाखनी, वर्धा येथे ५० मिलिमीटर पाऊस पडला आहे. अहिरी, साकोली येथे चाळीस मिलिमीटर पाऊस पडला असून अर्जुनी मोरगाव, मोर्शी, चिमूर, देवरी अशा अनेक ठिकाणी पावसाची चांगली हजेरी लावली आहे. त्यामुळे खरिपातील पिकांना काही प्रमाणात जीवदान मिळाले आहे. 

मराठवाड्याला जोरदार पावसाची प्रतीक्षा  पावसाचा महिना उलटला तरी मराठवाड्यात जोरदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे धरणातील पाणीसाठा कमी होऊ लागला आहे. येत्या चार आठ दिवसांत जोरदार पाऊस पडला तर खरिपातील पिकांना जीवदान मिळणार आहे. मराठवाड्याला अजूनह जोरदार पावसाची प्रतीक्षा लागून आहे. गुरुवारी सकाळपर्यत नांदेडमधील किनवट तसेच माहूर, वाशी या ठिकाणी दहा मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. उर्वरित भागात ऊन सावल्याचा खेळ सुरू असून काही भागात ढगाळ हवामान आहे.   

गुरुवारी (ता.५) सकाळपर्यंत प्रमुख शहरात झालेला पाऊस (मिलिमीटरमध्ये)  कोकण ः माथेरान १७०, हर्णे, विक्रमगड १४०, पालघर, पेण, पोलादपूर, रोहा, वाडा १३०, मानगाव १२०, अंबरनाथ, चिपळूण, कल्याण, मंडणगड, म्हसळा, पनवेल,  शहापूर, सुधागडपाली, उल्हासनगर ११०, जव्हार, खेड, महाड, मोखडा, तळासरी १००, अलिबाग, भिवंडी, कणकवली, कर्जत, लांजा, मुरबाड ९०, बेलापूर, डहाणू,  उरण ८०, खालापूर, मुरूड, संगमेश्वर देवरूख, ठाणे, वैभववाडी ७०, गुहागर, फोंडा, राजापूर, श्रीवर्धन ६०, मुलडे, वाल्पोई, वसई ५०,   मध्य महाराष्ट्र ः लोणावळा, महाबळेश्वर १६०, इगतपुरी, मुळशी ९०, गगनबावडा, ओझरखेडा, शाहूवाडी ७०, पेठ, वेल्हे ६०, राधानगरी ५०, भोर, धाडगाव, जावळीमाथा, पाटण, सुरगाणा ४०, आजरा, अमळनेर, चंदगड, हरसूल, जुन्नर, नवापूर, सातारा, तळोदा, त्र्यंबकेश्वर ३०, अकोले, गारगोटी, खेड, राजगुरूनगर, शिराळा २०, आंबेगाव, चांदवड, चोपडा, गडहिग्लज, कागल, कळवण, कराड, कोरेगाव, पन्हाळा, पुरंदर, शहादा, वडगावमावळ, वाई, इस्लामपूर १०  मराठवाडा ः किनवट, माहूर, वाशी १०  विदर्भ ः भामरागड, लाखनी, वर्धा ५०, अहिरी, साकोली ४०, अर्जुनी मोरगाव, मोर्शी, चिमूर, देवरी, गोंड पिपरी, नागपूर, पौनी, राजूरा, सेलू ३०, बल्लारपूर, भद्रावती,  भंडारा, चंद्रपूर, धामणगाव, एटापल्ली, गडचिरोली, गोरेगाव, हिंगणघाट, कोरची, कुही, लाखंदूर, मूल, सालेकसा, समुद्रपूर, उमरेड २०, अकोला, आंबगाव, अंजनगाव,  आरमोरी, आर्वी, बाभूळगाव, ब्रह्मपुरी, चांदूर, चिखलदरा, देसाईगंज, धानोरा, धारणी, हिंगना, कामठी, कुरखेडा, मोरसी, नांदगाव १०  घाटमाथा ः ताम्हिणी २३०, दावडी २१०, डुंगरवाडी २००, भिरा, लोणावळा १७०, धारावी १५०, लोणावळा १४०, शिरगाव १२०, वाळवण ११०, शिरोटा, कोयना ६०, कोयना (नवजा) वाणगाव ५०, ठाकूरवाडी, खंद ४०, भिवपुरी ३०   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com