कापूस निर्यातबंदीसाठी दाक्षिणात्य लॉबी सक्रिय

जर कापूस निर्यातबंदीचा कोणताही विषय आला तर आयातही बंद होईल. मध्यंतरी दाक्षिणात्य संघटनांनी कापूस निर्यातीसंबंधी मर्यादांचा मुद्दा आणला होता. परंतु मध्यांचल व नॉर्थमधील रुईच्या उद्योगांशी संबंधित संघटनांनी केंद्राकडे जर निर्यातबंदी केली तर आयातही बंद करावी, असा मुद्दा रेटला होता. दाक्षिणात्य भागात कापूस पीक कमी आहे. वस्त्रोद्योग तिकडे मोठा आहे. जेव्हा बोंड अळीचा मुद्दा होता, तेव्हा स्वस्त रुईची आयात मिलांनी केली आहे. कापूस निर्यातबंदी होऊच शकत नाही. - अनिल सोमाणी, सदस्य, कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया
कापूस गाठी
कापूस गाठी

जळगाव ः डॉलरच्या तुलनेत रुपया सतत कमकुवत होत असल्याने कापूस निर्यातीला चालना मिळत आहे. याचवेळी पुढील काळात मिल्सला रुईसंबंधीच्या अडचणी नकोत यासाठी वस्त्रोद्योगातील दाक्षिणात्य लॉबी सक्रिय झाली आहे. काही काळासाठी कापूस किंवा गाठींच्या निर्यातीवर मर्यादा आणण्यासंबंधीचा मुद्दा ही लॉबी पुढे रेटण्याच्या तयारीत असल्याचे कापूस उद्योगातील जाणकारांनी  सांगितले.  गुलाबी बोंड अळीचे संकट वाढताच मागील वर्षीच दाक्षिणात्य मिल्स लॉबीने आयातीवर भर दिला होता. कारण, त्या वेळेस परदेशातील रुई भारताच्या तुलनेत परवडत होती. परंतु, जसा डॉलर रुपयाच्या तुलनेत मजबूत होत गेला व जगात कापूस पिकाला फटका बसल्याचे अहवाल समोर आले, तशी परदेशातील रुई महागडी ठरू लागली. 

अमेरिका, ऑस्ट्रेलियाची खंडी (३५६ किलो रुई) सध्या ५८ हजार रुपयांवर भारतीय मिलांना घ्यावी लागेल, अशी स्थिती आहे. भारतीय रुई ४८ हजार रुपये खंडी, अशा दरात आहे. ऑस्ट्रेलिया, अमेरिकेतील आयात महाग पडत असतानाच देशातील रुई चीन, बांगलादेश, व्हीएतनाम, पाकिस्तानला स्वस्त पडत असल्याने भारतीय रुईची निर्यात वाढत असून, ती यंदा मागील चार वर्षांपेक्षा अधिक असेल. सुमारे ८२ ते ८४ लाख गाठींची निर्यात यंदा होईल. चीनकडून सूत व रुईच्या आयातीचा सपाटा सुरू आहे. कारण, अमेरिकेशी सुरू असलेल्या व्यापार युद्धामुळे तेथील दरवाजे चीनसाठी बंद झाल्यात जमा आहेत. चीनला ११७ लाख गाठी पुढील वर्षभरात आयात करायच्या आहेत. 

पुढचा हंगाम जेमतेम असेल, रुई वेळेत व पुरेशा प्रमाणात मिळणार नाही, अशी स्थिती आहे. अर्थातच अमेरिकेतील (यूएसए) टेक्‍सास, भारत, पाकिस्तान व चीनमध्ये कापूस पिकाला नव्या हंगामात फटका बसला आहे. भारतात गुलाबी बोंड अळीचे संकट असेल, असाही मुद्दा तज्ज्ञांनी सातत्याने मांडला आहे. नव्या हंगामात देशात ३४५ ते ३४८ लाख गाठींचे उत्पादन येईल. मग निर्यात सुरूच राहिली तर देशांअंतर्गत मिला बंद ठेवण्याची वेळ येईल, असा मुद्दाही उपस्थित केला जात आहे. 

दाक्षिणात्य असोसिएशनकडून ओरड सुरु देशातील मिलांना दर महिन्याला २७ लाख गाठींची गरज असते. २४०० सूतगिरण्या देशात आहेत. यातील सर्वाधिक गिरण्या या दाक्षिणात्य भागात असून, तेथे कापसाचे उत्पादन नेमके कमी असते. अलिकडेच साऊथ इंडियन स्पीनर्स असोसिएशनचे अध्यक्ष एस. के. रंगराजन यांनी ‘मिलांसमोर दर्जेदार रुईचा तुटवडा आणि रुईच्या दरवाढीचा मुद्दा असणार आहे. चीनने कापूस आयात वाढविली आहे. पुढेही ही दरवाढ कायम असेल, अशी भीती व्यक्त केली आहे.

देशांअंतर्गत कमी लागवड चिंतेचा विषय शहादा (जि. नंदुरबार) येथील लोकनायक जयप्रकाश नारायण सहकारी सूतगिरणीचे कार्यकारी संचालक राजाराम पाटील म्हणाले, की देशात मागील वर्षी जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सुमारे ८० लाख हेक्‍टरवर कापसाची लागवड झाली होती. परंतु, एकूण लागवड १२२ लाख हेक्‍टर २० जुलैपर्यंत झाली होती. मागील वर्षी एकूण लागवडीधील १६ टक्के क्षेत्र हे पूर्वहंगामी कापसाचे होते. यंदा मात्र अद्याप देशात निम्मीही कापूस लागवड झाली नाही. त्यात फक्त १३ टक्के क्षेत्र पूर्वहंगामी कापसाचे आहे. पूर्वहंगामी कापूस लागवड हरियाणा, पंजाब व राजस्थानात कमी झाली आहे. उत्तरेकडे पूर्वहंगामी कापसाखाली सुमारे तीन लाख हेक्‍टर क्षेत्र कमी झाले आहे. तर पुरेसा पाऊस नसल्याने देशात कापूस लागवड रखडली आहे. महाराष्ट्र, तेलंगण, तामिळनाडू, कर्नाटक, मध्य प्रदेशातही समाधानकारक कापूस लागवड नाही. यंदा ११० लाख हेक्‍टरवर लागवड अपेक्षित आहे. पण निम्मीही लागवड अजून झालेली नसल्याने कापूस उद्योगाने त्याचा धसका घेतला आहे, अशी माहिती मिळाली. 

डॉलर सत्तीपार जाणार काय? या महिन्यात डॉलर ६९ रुपयांपर्यंत होता. नंतर त्यात वाढ होत गेली. मंगळवारी (ता. १०) दुपारी त्याचे दर प्रतिडॉलर ६९.७० रुपये होते. तो सत्तरीपार जाईल, अशी चर्चा कापूस उद्योगात आहे. 

काही वेळ निर्यातीवर मर्यादांचा मुद्दा कापूस निर्यात कायमस्वरूपी बंद न करता फक्त सप्टेंबर व ऑक्‍टोबरमध्ये काही दिवस कशी कमी होईल, यासंबंधी कार्यवाही केंद्राने करावी, असा मुद्दा चर्चेत सध्या आहे. मात्र कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाचे सदस्य अनिल सोमाणी यांनी हा चर्चेचा मुद्दा असला तरी तो प्रत्यक्षात येणार नाही,  असे म्हटले आहे. 

 आकडे दृष्टीक्षेपात  (एक गाठ १७० किलो रुई)

  • देशातील २०१७-१८ च्या हंगामातील अपेक्षित कापूस निर्यात :  ८२ ते ८४ लाख गाठी
  • आतापर्यंत झालेली निर्यात :  सुमारे ७४ ते ७६ लाख गाठी
  • कापूस आयात :  १२ लाख गाठी
  • डॉलरच्या दरांची थोडी रंजक माहिती

  •  सप्टेंबर १९४७ मधील डॉलरचे दर :   १ रुपया
  •  १९७५ मधील दर :  ८ रुपये
  •  १९८५ मधील दर :  १२ रुपये
  •  २००१ मध्ये डॉलरचे दर :  ४७ रुपये (नंतर वाढ सुरूच)
  •  २०१८ (१२ जुलै) मधील दर :  ६८.५६ रुपये
  • प्रतिक्रिया देशात कापूस लागवड अपेक्षेपेक्षा यंदा खूप कमी आहे. परंतु मोसमी पाऊस सक्रिय झाला की लागवड वाढेल. ती १०५ लाख हेक्‍टरवर जाईलच. पण, कमी लागवड हा देशांतर्गत वस्त्रोद्योगासमोरील चिंतेचा विषय आहे. रुईचे वाढलेले दर व पुढील दरवाढीची स्थिती याबाबत दाक्षिणात्य स्पिनींग मिलांच्या संघटनांनी चिंता व्यक्त केली आहे. राज्यात मात्र कोणतीही अडचण रुईसंबंधी सूतगिरण्यांसमोर नाही. निर्यातबंधीचा कोणताही विषय आमच्यापर्यंत नाही.   - दीपकभाई पाटील, अध्यक्ष, लोकनायक जयप्रकाश नारायण सहकारी सूतगिरणी, शहादा (जि.नंदुरबार)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com