तूर खरेदीचे चुकारे येत्या पंधरा दिवसांत : सुभाष देशमुख

सुभाष देशमुख
सुभाष देशमुख

नागपूर ः राज्यात या वर्षी विक्रमी ३२ लाख क्‍विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे; परंतु काही शेतकऱ्यांना तुरीचे चुकारे मिळाले नाहीत. तुरीचे थकीत चुकारे येत्या पंधरा दिवसांत केले जातील, अशी माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी विधान परिषदेत एका प्रश्‍नाच्या उत्तरात दिली.  विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी तूर खरेदीसंदर्भाने लक्षवेधी मांडली होती. त्याला उत्तर देताना सहकारमंत्र्यांनी गेल्या हंगामात तुरीची उत्पादकता वाढण्यामागे जलयुक्‍त शिवार हे कारण असल्याचे सांगितले. जलयुक्‍त शिवारमुळे तुरीला संरक्षीत सिंचन करणे शक्‍य झाले तर काही ठिकाणी पिकाच्या मुळांना पाणी मिळाले. त्यामुळे उत्पादकता वाढीस लागली. त्यामुळे या वर्षी विक्रमी ३२ लाख क्‍विंटल तुरीची खरेदी करण्यात आली. काही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे वळते करण्यात आले आहेत; परंतु काही शेतकऱ्यांना अद्यापही चुकारे मिळाले नाहीत. येत्या पंधरा दिवसांत हे चुकारे केले जातील, असे सुभाष देशमुख यांनी सांगितले.  शेतकऱ्यांच्या कष्टाने  वाढली उत्पादकता  जलयुक्‍तमुळे तुरीची उत्पादकता वाढल्याचे सहकारमंत्र्यांनी सांगितले. त्यावर आक्षेप घेत धनंजय मुंडे यांनी सरकारच्या मेहरबानीने नाही तर शेतकऱ्यांच्या कष्टाने उत्पादकता वाढल्याचे सांगितले. चुकाऱ्याच्या मूळ प्रश्‍नाला बगल देण्याचा हा प्रयत्न असल्याने गोंदिया-भंडारा पोटनिवडणुकीप्रमाणे राज्यातही असेच परिणाम भोगावे लागतील, असा टोलाही मुंडे यांनी लगावला. 

खरेदीकरिता गोदामाची सोय नाही  सरकारची तूर खरेदीची प्रामाणिक इच्छा आहे; परंतु साठवणुकीकरिता गोदाम नाहीत; त्यामुळे तूर खरेदी कमी करावी लागली. मागच्या सरकारने गोदाम बांधले असते तर जास्त तूर खरेदी केली असती, असे सहकारमंत्री म्हणाले. मात्र, २००१-२०१४ या कालावधीत एफसीआयने किती गोदाम देशात आणि महाराष्ट्रात बांधले याचे आकडेवारीच सभागृहासमोर ठेवण्याचे आवाहन या वेळी धनंजय मुंडे यांनी दिले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com