प्रक्रिया उद्योगातून मिळविले आर्थिक स्थैर्य

जळगाव शहरातील प्रदर्शनात विविध उत्पादनांची विक्री करताना माधुरी निळे.
जळगाव शहरातील प्रदर्शनात विविध उत्पादनांची विक्री करताना माधुरी निळे.

जळगाव शहरातील माधुरी अनिल निळे यांनी जिजाई लघुउद्योग उभारून मसाल्यांसह मिरची, हळद, धने पूडनिर्मिती आणि विक्री सुरू केली आहे. या प्रक्रिया उद्योगामध्ये त्यांनी घराजवळच्या महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला अाहे. प्रक्रिया उद्योगासाठी लागणारी लाल मिरची, हळदीची खरेदी थेट शेतकऱ्यांकडूनच केली जाते. स्थानिक बाजारपेठेसह राज्यातील विविध शहरांत त्यांच्या मसाल्यांना चांगली मागणी आहे.  

माधुरी निळे यांचे पती अनिल हे कृषी व्यवसायात कार्यरत आहेत. यानिमित्त त्यांचा खानदेशातील विविध भागांतील शेतकऱ्यांशी संपर्क येतो. या संपर्कातून कुटुंबीयांच्या मदतीने शेतीमालावर आधारित प्रक्रिया उद्योग सुरू करावा, असा विचार त्यांचा मनात आला. यावर त्यांनी अभ्यास केला. वर्षभर ते शेतकरी, बाजारातील किरकोळ व्यापारी यांच्या संपर्कात राहिले. २०१४ मध्ये माधुरी निळे यांनी दिवाळीच्या दिवशी मिरची आणि हळद पावडर निर्मिती व्यवसायाला सुरवात केली. सुरवातीला माधुरी या एकट्याच मसालानिर्मितीचे काम पाहायच्या. हा व्यवसाय कसा विस्तारेल, ठिकठिकाणी ग्राहक कसे मिळतील, याबाबत अनिल निळे यांनी विविध शहरांत जाऊन बाजारपेठांची माहिती घेतली. पहिल्यांदा मसाल्याची विक्री परिसरासह जळगाव शहरातील काही दुकानदारांना केली. काही दिवसात या उत्पादनांना ग्राहकांची पसंती मिळाली. 

मागणीनुसार उत्पादने वाढविण्यासह उद्योग विस्तारासाठी आर्थिक निधी आणि मदतीची गरज होती. त्यामुळे माधुरी निळे यांनी घरानजीकच्या काही महिलांना प्रक्रिया उद्योगात सामील करून घेतले. महिलांच्या सहकार्याने त्यांनी सुमीत महिला बचत गटाची स्थापना केली. 

दोन वर्षांपूर्वी त्यांना एका राष्ट्रीयीकृत बॅंकेने सहा लाख आणि एका सहकारी बॅंकेने एक लाख रुपयांचे कर्ज दिले. यातून त्यांनी मसाले आणि पावडर उत्पादनासाठी आवश्‍यक लाल मिरची, हळद आणि मसाल्याची खरेदी केली. बाजारपेठेत स्वतःच्या उत्पादनाचे वेगळेपण जपण्यासाठी त्यांनी ‘हरिसिद्धी` ब्रॅंडची निर्मिती केली. येणाऱ्या मिळकतीमधून त्यांनी कर्जाची नियमित परतफेड सुरू आहे.

थेट शेतकऱ्यांकडून खरेदी    माधुरी निळे या मिरची पूडनिर्मितीसाठी आवश्‍यक लाल मिरच्यांची खरेदी शहादा, नंदुरबार, पारोळा भागातील शेतकऱ्यांकडून करतात. उन्हाळ्यात अधिक प्रमाणात ग्राहक मिरची पावडर खरेदी करतात. म्हणून निळे एकाच वेळी लाल मिरची थेट शेतकऱ्यांकडे जाऊन खरेदी  करतात. बाजारातील दरांचा अंदाज घेऊन शेतकऱ्यांना परवडतील अशा दरात लाल मिरचीची खरेदी केली जाते.  जळगाव जिल्ह्यातील यावल व रावेर तालुक्‍यातील शेतकऱ्यांकडून थेट हळदीची खरेदी केली जाते. निळे प्रामुख्याने सेंद्रिय हळदीला पसंती देतात. यासाठी शेतकऱ्यांना अधिक दर देण्याची त्यांची तयारी असते. धने पावडरनिर्मितीसाठी आवश्‍यक धण्यांची खरेदी अमळनेर तालुक्‍यातील तापी काठावरील गावांमधून केली जाते. विविध मसाल्यांसाठी आवश्‍यक बाबींची खरेदी मुंबई येथील वाशी येथील घाऊक बाजारातून केली जाते. प्रामुख्याने निळे या केरळमधील मसाल्यांना पसंती देतात.   

मसालानिर्मिती उद्योग 

  • मसाले व विविध प्रकारच्या  पावडरनिर्मितीचा हंगाम फेब्रुवारी ते मेअखेरपर्यंत  असतो. या काळात प्रतिदिन आठ ते दहा महिलांना रोजगार दिला जातो. नंतरच्या महिन्यात आठवड्यातून तीन दिवस चार-पाच महिलांना त्या रोजगार देतात. पावडर व मसाले पॅकिंगचे काम घरातच केले जाते. वाळलेल्या मिरचीची देठ खुडण्याचे काम उन्हाळ्यात सुरू असते. देठ खुडण्यासाठी महिलांना चार रुपये प्रतिकिलो अशी मजुरी दिली जाते. मिरचीची बारमाही गरज असते. यामुळे वाळविलेली मिरची जळगाव शहरानजीक एका शीतगृहामध्ये साठविली जाते. सुधारित यंत्राच्या साह्याने मिरची पूड तयार केली जाते. काही ग्राहक घरी येऊन मिरची पूड तयार करून घेऊन जातात.
  •  मागील दोन वर्षे दर महिन्याला सरासरी ४०० किलो मिरची पावडर आणि १०० किलो हळद  पावडर विक्री होते. ग्राहकांच्या मागणीनुसार  ५० ते १०० ग्रॅम मसाल्याच्या पुड्या तयार केल्या जातात. हळद, मिरची व धने पावडर पाव किलोपासून ते एक किलोपर्यंच्या पॅकिंगमध्ये उपलब्ध आहे. 
  •  लसूण चटणी तसेच खडा मसाला, चाट मसाला, मटण मसाला, सांबर मसाला, पावभाजी मसाला, शेवभाजी मसाला आदींचे उत्पादन केले जाते. या उत्पादनांनादेखील ग्राहकांकडून चांगली मागणी आहे.  
  • विक्रीचे नियोजन 

  • मुंबई, ठाणे आणि कल्याण भागातील खासगी संस्था, महिला मंडळे यांच्यातर्फे आयोजित बचत गटांच्या उत्पादनांचे प्रदर्शन व विक्री या उपक्रमात माधुरी निळे सहभागी होतात. यामुळे मुंबई व ठाणे भागात त्यांच्या उत्पादनांना चांगले ग्राहक मिळाले आहेत. याच उपक्रमांच्या माध्यमातून त्यांच्या उत्पादनांना मागील वर्षी परदेशी ग्राहकांकडूनही मागणी आली होती. तेथे मसाले, मिरची, धणे, हळद पावडरचा पुरवठा त्यांनी केला. सोबतच जळगाव शहरात दरवर्षी होणारा पापड महोत्सव, आत्माअंतर्गत होणारे महोत्सव, बहिणाबाई महोत्सव यातही त्यांच्या उत्पादनांचा स्टॉल असतो. 
  • निळे यांच्या बचत गटाला मसाला उत्पादनांच्या विक्रीसाठी जळगाव शहरात एका बॅंकेने एक दुकान उपलब्ध करून दिले आहे.  मुंबई येथून मिरची पावडरीस सर्वाधिक मागणी आहे. विक्रीसाठी त्यांनी मुंबई, ठाणे, डोंबिवली भागात आठ वितरक मिळविले आहेत. अनिल निळे यांच्याकडे एक चारचाकी आहे. ते भाडे तत्त्वावर ही चारचाकी उपलब्ध करून देतात. मुंबई किंवा इतर शहरांमधून मागणी असते, तेव्हा या चारचाकीमध्ये सर्व उत्पादने भरून वितरकांना पोचविली जातात. 
  •   - माधुरी निळे ः ८००७९८९६६२

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com