उत्पन्नवाढीच्या कृती कार्यक्रमाचा गाभा

निती आयोगाच्या म्हणण्यानुसार पीक उत्पादकता, एकूण घटक उत्पादकता, पीक पद्धती बदल, पिकांची तीव्रता आणि बाजार सुधारणा यांच्या विकासाचा दर आजवर आहे तोच पुढे सुरू ठेवला तरी २०२२-२३ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न ७५.१ टक्क्यांनी आपोआपच वाढणार आहे. या उपाययोजना अधिक ताकतीने अमलात आणल्या तर आणखी २५ टक्के उत्पन्न वाढवून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे शक्य आहे.
विशेष लेख
विशेष लेख

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी केंद्र सरकारने आपला कृती कार्यक्रम जाहीर केला आहे. आजवरच्या शेती धोरणांचा मुख्य भर शेतीमालाचे ‘उत्पादन’ वाढविण्यावर राहिला आहे. ‘उत्पादन’ वाढले की ‘उत्पन्न’ आपोआप वाढेल असे आजवर गृहीत धरण्यात आले आहे.

गेल्या पन्नास वर्षांत यामुळे शेतीमालाचे ‘उत्पादन’ वाढले. शेतकऱ्यांचे ‘उत्पन्न’ मात्र त्याबरोबरीने वाढले नाही. शेती संकटाचे हेच खरे ‘मूळ’ आहे. स्वामिनाथन आयोगाने ही बाब लक्षात घेत शेतकऱ्यांचे ‘निव्वळ उत्पन्न’ वाढविण्यावर भर दिला. २०१६ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा केली. निती आयोगाच्या कृती कार्यक्रमाचा गाभा अशा पार्श्वभूमीवर तपासून पाहिला पाहिजे. उत्पादकता वाढ निती आयोगाने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी ‘उत्पादकता’ वाढविण्यावर सर्वाधिक भर दिला आहे. सिंचन व तंत्रज्ञानाचा विकास करून उत्पादकता वाढविणे शक्य आहे. देशाचा आजवरचा प्रतिवर्ष पीक उत्पादकता वाढीचा दर ३.१ टक्के आहे. हा इतका दर जरी कायम ठेवला तरी २०२२-२३ पर्यंत यातून शेती उत्पन्नात १६.७ टक्के वाढ शक्य आहे. शेती उत्पन्नात ३० टक्के वाटा असणाऱ्या पशुधनाचा आजवरचा प्रतिवर्ष वाढीचा दर ४.५ टक्के आहे. हा दर कायम ठेवल्यास २०२२-२३ पर्यंत शेती उत्पन्नात १०.८ टक्के वाढ शक्य आहे. पीक व पशुधन मिळून अशाप्रकारे २०२२-२३ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न २७.५ टक्क्यांनी वाढेल असा निती आयोगाचा दावा आहे. एकूण घटक उत्पादकता (टीएफपी) तंत्रज्ञानातील बदल, कौशल्य विकास, पायाभूत सुविधांचा विकास व निविष्ठांच्या परिणामकारक वापरामुळे उत्पादन खर्च न वाढता अधिक उत्पादन घेणे शक्य असते. या घटकांमुळे वाढणाऱ्या उत्पादकतेला एकूण घटक उत्पादकता (टीएफपी - टोटल फॅक्टर प्रोडक्टिव्हिटी) म्हणतात. अशा उत्पादकता वाढीतून शेती उत्पन्नात मोठी वाढ होईल. संसाधनांच्या परिणामकारक वापरामुळे शेती उत्पन्नात होणाऱ्या वाढीचा आजवरचा दर कायम ठेवल्यास २०२२-२३ पर्यंत शेती उत्पन्न १६.७ टक्क्यांनी वाढेल, असे निती आयोगाला वाटते आहे. उच्च मूल्य पिकांच्या उत्पादनाकडे वाटचाल देशभरात फळे, भाजीपाला, धागा, मसाले व ऊस यांसारख्या ‘उच्च मूल्य’ पिकांखाली केवळ १९ टक्के लागवड योग्य जमीन आहे. कृषी उत्पन्नात मात्र या उच्च मूल्य पिकांचा वाटा खूप मोठा आहे. उत्पन्न वाढावे यासाठी कडधान्य, तृणधान्य व तेलबिया या कमी उत्पन्न देणाऱ्या पिकांऐवजी या ‘उच्च मूल्य’ पिकांच्या लागवडीकडे कल वाढतो आहे. पीकबदलाचा हा कल याच दराने कायम ठेवल्यास शेतकऱ्यांच्या उत्पन्नात २०२२-२३ पर्यंत ५ टक्के वाढ होईल, असे आयोगाचे मत आहे. पीक तीव्रतेत वाढ सिंचन सुविधा किंवा मुबलक पाऊस उपलब्ध असलेल्या भागात एकाच पीक हंगामात मुख्य पिकानंतर लगेच ‘दुसरे’ पीक घेतले जाते. लागवड योग्य जमिनीपैकी ३८.९ टक्के जमिनीवर असे ‘दुसरे’ पीक घेतले जाते. ‘दुसरे’ पीक घेण्याच्या प्रमाणात वाढीचा आजवरचा दर कायम ठेवल्यास २०२२-२३ पर्यंत शेतकऱ्यांच्या उत्पन्नात ३.४ टक्के वाढ होईल, असे निती आयोगाला वाटते आहे. शेती कसणाऱ्यांच्या संख्येत घट शेती तोट्यात असल्यामुळे शेतकरी शेतीतून बाहेर पडत आहेत. परिस्थिती अवलोकन सर्वेक्षण २००२-०३ नुसार, योग्य पर्याय मिळाला तर ४० टक्के शेतकऱ्यांना शेती सोडायची आहे. सन २००४-०५ ते २०११-१२ या कालावधीत लागवडदारांची संख्या १६.६१ करोड वरून कमी होऊन ती १४.६२ करोड वर आली आहे. असेच सुरू ठेवले तर २०१५-१६ ते २०२२-२३ या काळात देशातील लागवडदारांची संख्या १३.४ टक्क्यांनी कमी होईल. शेतकऱ्यांची संख्या कमी झाल्यामुळे उपलब्ध शेती उत्पन्न उरलेल्या शेतकऱ्यांमध्ये विभागले जाऊन त्यांच्या उत्पन्नात वाढ होईल. निती आयोगाला ‘शेतकऱ्यांनी शेती सोडणे’ हा इतर शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणारी बाब वाटते आहे. बाजार सुधारणा सरकारने बाजार सुधारणा हाती घेतल्या आहेत. ई-मार्केटिंग व ऑनलाइन ट्रेडिंगसारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. शेतीमालाला यामुळे खूप चांगले दर मिळत असल्याचा दावा आयोगाने केला आहे. कर्नाटक सरकारने या संबंधाने केलेल्या सुधारणांचा दाखला आयोगाने दिला आहे. अशाच प्रकारच्या सुधारणा देशभर राबविल्या तर शेतकऱ्यांचे उत्पन्न २०२२-२३ पर्यंत आणखी ९.१ टक्क्यांनी वाढेल, असा निती आयोगाचा दावा आहे. निती आयोगाच्या म्हणण्यानुसार अशाप्रकारे वरील बाबींच्या विकासाचा दर आजवर आहे तोच पुढे सुरू ठेवला, तरी २०२२-२३ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न ७५.१ टक्क्यांनी आपोआपच वाढणार आहे. वरील उपाययोजना अधिक ताकतीने अमलात आणल्या तर आणखी २५ टक्के उत्पन्न वाढवून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे शक्य आहे.

डॉ. अजित नवले - ९८२२९९४८९१ (लेखक महाराष्ट्र राज्य किसान सभेचे सरचिटणीस, तसेच शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीचे राज्य समन्वयक आहेत.) .......................

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com