Onion Subsidy: कांदा अनुदानासाठी अर्ज कसा आणि कुठे करावा?

Anil Jadhao 

राज्य सरकारने कांदा अनुदानाबाबतची अधिसूचना आज जाहीर केली. या अधिसूचनेतून शेतकऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. सरकारनं अनुदानाची रक्कम ३०० ऐवजी ३५० रुपये देऊ केली.

एका शेतकऱ्याला जास्ती जास्त २०० क्विंटलसाठी अनुदान मिळेल. राज्यातील मुंबई बाजार समिती वगळता इतर बाजार समित्या, तसेच खाजगी बाजार समित्या तसेच नाफेडला कांदा विकणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे.

व्यापाऱ्यांचा तसेच परराज्यातून आवक झालेल्या कांद्यालाही अनुदानातून वगळले.  परराज्यात कांदा विकणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान मिळणार नाही.

ज्या शेतकऱ्यांनी १ फेब्रुवारी २०२३ ते ३१ मार्च २०२३ या दोन महिन्यातील काळात कांदा विकला त्यांनाच अनुदान मिळणार आहे.

फक्त लाल कांद्यासाठीचे हे अनुदान असेल. अनुदानाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल.

कांदा अनुदानासाठी शेतकऱ्यांनी कांदा विक्री पावती, सात बारा उतार आणि बॅंक खात्याच्या माहितीसह ज्या बाजार समितीत कांदा विक्री केला त्या बाजार समितीत अर्ज करावा. शेतकऱ्यांना अनुदान प्राप्त करुन देण्याचे प्रस्ताव संबंधित बाजार समिती तयार करणार आहे.