Team Agrowon
कर्मवीर व्याख्यानमालेत रात्री व्याख्यान संपल्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव मला म्हणाले उद्या वेळ असेल तर आमच्या ड्रामा सेंटरलाही भेट द्या.
म्हटलं हे काय आहे ? तर ते म्हणाले, मामासाहेब जगदाळे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ उभं केलेलं एक अत्याधुनिक असं हॉस्पिटल आहे. मी म्हटलं, मी तिथं येऊन काय करू ? त्यातलं मला काय कळणार ?
ते म्हणाले या तर, पाहून जा सहज म्हणून, तुमची कविता ज्या शेतीमातीतल्या माणसाविषयी पोट तिडीकीनं बोलते त्याच माणसासाठी आम्ही हे ट्रामा सेंटर उभं केलेलं आहे, म्हणून तुम्ही पाहायला या.
दुसऱ्या दिवशी मी त्या ट्रामा सेंटरला भेट द्यायला गेलो. डॉ. यादव स्वतः उपस्थित होते. त्यांनी मला हे पाच मजली हॉस्पिटल संपूर्ण फिरून कानाकोपऱ्यासह दाखवलं.
चाळीस कोटी रुपये जमऊन उभं केलेलं हे हॉस्पिटल जगातल्या अत्याधुनिक सुविधा पुरविणारं आहे. या सगळ्या निधीतला एकही पैसा सरकारी अनुदानातला नाही.
हा सगळा निधी डॉक्टर यादव यांनी देणग्या मामासाहेब जगदाळे यांनी सुरू केलेल्या मधून उभा केलेला आहे. शिवाजी एज्युकेशन सोसायटीच्या कर्मचाऱ्यांनीही त्याला सढळ हातानं मदत केलेली आहे. हे हॉस्पिटल पाहताना डॉक्टर यादव यांचा इथं गुंतलेला जीव दिसत होता. जणू ते त्यांच्या आयुष्यातलं एक स्वप्नच होतं.