Team Agrowon
आज मोगडा मारला. खरीप हंगामासाठी शेतीच्या मशागतीला गती आली आहे.
पाऊस बऱ्यापैकी झाल्याने ढेकळं ठिसूळ झाले आहेत. त्यामुळे नांगरटीला खूप चांगला मोगडा बसत आहे. तीन फणाची तिफण असते.... जी ढेकळं फोडण्यासाठी वापरतात.
सर्व कामे यंत्राने /मशीनने करायला शेतकरी ऐवढा श्रीमंत नाही.... जवळपास 80 ते 85 टक्के शेतकरी हे अल्पभूधारक असून कोरडवाहू शेती करणारा आहे. या कोरडवाहू शेतकऱ्यांना यांत्रिकीकरणाची शेती परवडेल का?
आम्ही भावंडे, आईवडील व घरची मंडळी शेतीत राबायचो.रान मोगडायचो, कुळवायचो,कोळपणी,व शेतीची अनेक कामे करायचो. पण आज दुर्दैवाने आमची प्राणी संपत्ती व बैल काळानुरूपाने नाहीसे झाले.
आमच्याकडे गोदावरी नावाची एक गाय होती.पुढे तिला राधा ही कालवड तर हौशा व देशा हे गोरे व त्यांचेच पुढे बैल म्हणून आमच्या गरीबीची परिस्थिती बदलण्यात मोलाचे योगदान होते.या गाईंचा व बैलांचा आम्हाला व आमचा त्यांना खुप लळा व प्रेम होते.
आमची परिस्थिती नसल्याने आम्ही आजोळात आमचा सांभाळ आजी व आजोबांनी केला.त्यावेळी आम्ही सहा सहा महिने आमच्या गावाकडे जायचो नाही.परंतु जेव्हा कधी जायचो तेव्हा आमचे स्नेही असल्यागत आमची गोदावरी,राधा,हौशा,देशा आम्हाला जवळ जाताच प्रेमाने चाटायचे.