Devendra Shirurkar
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा बटाटा उत्पादनात घट झाल्यामुळे दर स्थिर राहतील, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा बटाटा उत्पादनात घट झाल्यामुळे दर स्थिर राहतील, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या पहिल्या अंदाजात यावर्षी बटाट्याचे उत्पादन सुमारे ५ कोटी ३६ लाख टन होईल, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली होती. गेल्यावर्षी बटाट्याचे उत्पादन ५ कोटी ६१ लाख टन झाले होते.
गेल्यावर्षी बटाटा लागवडीच्या काळात (नोव्हेंबर -डिसेंबर) झालेल्या अवेळी पावसाचा फटका पश्चिम बंगाल, पंजाब आणि हरियाणातील उत्पादनाला बसला आहे. त्यानंतर मार्च महिन्यातील उष्णतेच्या लाटेमुळेही बटाटा उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे बटाट्याच्या किमती स्थिरावतील अशी शक्यता आहे.
बिहार, गुजरात आणि राजस्थानमध्ये बटाटा मोठ्या प्रमाणात शीतगृहात साठवण्यात आलेला आहे. त्यामुळे बटाट्याचे दर लगेच वाढतील, अशी शक्यता नसल्याचे व्यापारी सूत्रांचे म्हणणे आहे.
बटाट्याचे सर्वाधिक उत्पादन घेणाऱ्या राज्यांत पश्चिम बंगालची गणना होते. यावर्षी इथे उत्पादनात २३ टक्क्यांनी घट झाली आहे. २०२१ साली पश्चिम बंगालचे बटाटा उत्पादन १ कोटी १० लाख टन होते. यंदा ते ८५ लाख टनांवर आले आहे. तर पंजाब आणि हरियाणातील उत्पादनात १० ते २५ टक्क्यांची घट झाल्याचे फेडरेशन ऑफ कोल्ड स्टोरेज असोसिएशन ऑफ इंडियाचे (FCSAI) सचिव राजेश गोयल यांचे म्हणणे आहे.
बटाट्याच्या ज्योती या साधारण वाणाची ठोक विक्री यंदा २२ ते २४ रुपये दराने होते आहे. गेल्यावर्षी या बटाट्याचा ठोक दर १४ ते १६ रुपये प्रति किलो असा होता. पश्चिम बंगालमध्ये ४.६ लाख हेक्टर क्षेत्रात बटाट्याची लागवड करण्यात आली.
हुगळी, बरद्वान, बांकुरा, इस्ट मिदनापूर, वेस्ट मिदनापूर हे बटाटा उत्पादक जिल्हे म्हणून ओळखले जातात. यंदा ६१ लाख टन बटाटे शितगृहात दाखल झाल्याचा अंदाज आहे. राज्यात ४०० शीतगृह असून त्यातून ७० लाख टन बटाटे साठवले जाऊ शकतात.
पश्चिम बंगाल, पंजाब, हरियाणाच्या तुलनेत उत्तर प्रदेश, गुजरात आणि मध्य प्रदेशात बटाट्याचे उत्पादन नेहमीप्रमाणे झाले आहे. उत्तर प्रदेशात उष्णतेच्या लाटेचा उत्पादनावर फारसा परिणाम झाला नाही कारण तोवर निम्म्या बटाट्याची काढणी झाली होती. सुरुवातीला राज्यातील बटाटा उत्पादनात १० टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र उष्णतेच्या लाटेमुळे उत्पादन वाढले नाही पण नुकसानही झाले नाही.
कोल्ड स्टोरेजमध्ये उशिराने दाखल झालेल्या पिकावर उष्णतेच्या लाटेचा दुष्परिणाम झाला आहे. विशेषतः होळीनंतर दाखल झालेल्या बटाट्याचे नुकसान झाले आहे. उत्पादनात घट झाल्यामुळे बटाट्याचे दर चांगले राहतील, असा विश्वासही राजेश गोयल यांनी व्यक्त केला आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.