Team Agrowon
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जगद्विख्यात अर्थतज्ज्ञ होते. त्यांनी शेतीच्या प्रश्नाविषयी मुलभूत अभ्यास केलेला होता.
शेतीचा नेमका प्रश्न काय आणि त्यावर काय उपाययोजना केल्या पाहिजेत, याविषयी त्यांनी केलेली मांडणी आजही दीपस्तंभासारखी मार्गदर्शक आहे.
१९४४ मध्ये बाबासाहेबांनी शेतीसाठी लागणारा खर्च सरकारने उचलला पाहिजे, त्यासाठीची रक्कम शेतकऱ्यांना द्यायला पाहिजे, अशी सूचना केली होती.
७५ ते ८० वर्षानंतर तेलंगणा राज्याने बाबासाहेबांचा हा विचार स्वीकारला आहे. केंद्र सरकारने देखील शेतकऱ्यांना तुटपुंजी का होईना, मदत देण्यास सुरुवात केली आहे.
देशातील ८० टक्के जनता शेतीवर उदरनिर्वाह करत असेल तर राष्ट्रीय उत्पन्नातील शेतीचा वाटा लक्षात घेऊन या क्षेत्राचे राष्ट्रीयीकरण करावे आणि शेतकऱ्यांना भांडवल पुरवावे, अशी संकल्पना बाबासाहेबांनी मांडली होती.
शेतीसाठी लागणारी यंत्रसामग्री, कसदार बियाणे, उत्तम खते देण्याची जबाबदारी सरकारची असल्याचे बाबासाहेबांनी ठासून सांगितले होते.
शेतीसाठी लागणारी अवजारे आधुनिक पाहिजेत, पारंपरिक पद्धतीने केलेली शेती कधीच फायदेशीर ठरणार नाही, आधुनिकीकरणासाठी जमिनीचे छोटे-छोटे तुकडे नाही तर एकत्रिकरण होणे आवश्यक आहे. शेतीला दर्जेदार बियाण्याची गरज आहे ही त्रिसूत्री शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी आवश्यक असल्याचे बाबासाहेबांनी त्या वेळेस सांगितले होते.