Turmeric Processing : फिरता हळद प्रक्रियेचा जुगाड

Anil Jadhao 

वाशीम जिल्ह्यातील एकांबा येथील शिवाजी दशरथ कुऱ्हे यांनी हळद विक्रीसाठी स्वतःच्या संकल्पनेतून प्रक्रिया यंत्रणा तयार केली. थेट ग्राहकांच्या दारात जाऊन मागणीनुसार हळद तयार करून दिली जाते.

दुचाकी-ट्रॉली-चक्की या यंत्रणांचा कल्पनेने वापर करत त्यांनी फिरता हळद प्रक्रिया उद्योग तयार केला. तसेच मिरची पावडर तयार करण्याची यंत्रणाही त्यांनी याच पद्धतीने विकसित केली आहे.

ट्रॉलीमध्ये हळद दळण्याची चक्की आणि ती चालण्यासाठी इंजिन बसविले आहे. यासाठी जवळपास ३५ हजार रुपये खर्च आला. ५० हजारांची दुचाकी, ३५ हजारांची चक्की आणि इंजिन तसेच वीस हजाराची ट्रॉली असे जवळपास लाख रुपयांच्या गुंतवणुकीतून ग्राहकांच्या समोर हळद दळून देण्याची फिरती यंत्रणा कुऱ्हे यांनी तयार केली.

या यंत्रणेच्या माध्यमातून सुरवातीला त्यांनी काही दिवस वाशीम शहरात हळद विक्रीचे काम केले. परंतु मोठ्या शहरात या पद्धतीने दळलेली हळद घेणारे ग्राहक जास्त मिळतील म्हणून त्यांनी अमरावती गाठले. तेथे जवळपास सहा ते सात महिने हळकुंडावर प्रक्रिया करून हळद तयार करत गल्लीबोळात विक्रीचे काम केले. पुढे त्यांनी औरंगाबाद शहर गाठले.

शिवाजी कुऱ्हे यांना महिन्याला साधारणतः दहा क्विंटल हळकुंडे लागतात. स्वतःच्या शेतात उत्पादित होणाऱ्या हळकुंडाबरोबरच ते वाशीम जिल्ह्यातील गाव शिवारातील शेतकऱ्यांच्याकडून गरजेनुसार हळकुंडे खरेदी करतात.

सध्याच्या काळात १८० रुपये प्रति किलो दराने हळदीची विक्री होते. औरंगाबाद शहरात दीड वर्षांपूर्वी जेव्हा हळद विक्री सुरू केली त्याचवेळी १५० रुपये प्रति किलो दराने हळद विक्री होत होती. मध्यंतरी पेट्रोलचे दर तसेच वाढता उत्पादन खर्च लक्षात घेऊन त्यांनी प्रति किलो २० रुपयांची दरवाढ केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

cta image