अमित गद्रे
" या माझ्या बागेत हापूस आंबा तर आहेच, त्याचबरोबरीने तो दिसतोय ना गोडांबा, लिटी, हा साखरांबा अशा २० रायवळ आंबा जाती माझ्या वडिलांनी लावल्यात, त्या मी सांभाळतेय, हापूसपेक्षा या रायवळला मागणी आहे, गावातच संपतोय.
Hapus Mangoही सुपारीची स्थानिक जात, माझ्या आजोबांपासून बागेत आहे, हीच आम्ही चार एकरवर नेली आहे, जागेवर मागणी आहे, चढा दर आम्ही घेतोय.
तो पलीकडे जाम दिसतोय का? चार प्रकार आहेत माझ्याकडे, बांधावर कोकम देखील गावठी... माझ्या बागेत रोज ५० पक्षी दिसतात, ब्लू मॉरमन फुलपाखरू देखील दिसेल पहा..."
फणशी नदीच्या काठावरून नितळ पाणी पाहताना माझी ऍग्रीकॉस मैत्रीण वीणा खोत देरदे गावातील तिच्या २५ एकर शेतीतील जैवविविधता सांगत होती.
ही वीणा आमच्या दापोली कृषी महाविद्यालयाची युवा कृषी पदवीधर. साधारण पाच, सहा महिन्यांपूर्वी एक माहितीसाठी तिचा एकदा फोन आला होता, बोलण्यावरून ती अभ्यासू वाटली होती. म्हणाली होती की, दापोलीला आलात की, आमची फळबाग पाहायला या.
आज कामानिमित्ताने दापोलीत गेलो होतो, तीन तास वेळ शिल्लक होता. सहज फोन केला तर म्हणाली, या, आंबा, काजू, फणस, सुपारी बाग बघूयात. माझा दापोलीतील मित्र हेमंत बरोबर दाभोळ रस्त्यावर असलेल्या तिच्या गावी पोहचलो.
म्हटलं, अर्धा तासात ही फळबाग पाहून होईल.पण डोंगरउतारावरून वळणे घेत निसर्गरम्य बागेत पोहचलो तेव्हा ही कृषिकन्या वेगळी आहे हे लक्षात आले.
दोन बहिणीची लग्न झालेली, आता घरी आई, वडिलांच्या सोबत स्वतः जबाबदारीने वीणा २५ एकर शेतीचा भार आनंदाने सांभाळत आहे. २०१८ मध्ये कृषी पदवीधर झालेली वीणा निसर्गवेडी आहे.
आंबा, काजू, सुपारी, मिरी ही मिळकतीची पिके, पण गावरान आंबा,कोकम, जांभूळ, जामच्या जाती, वेलची आणि लाल केळीच्या जातीचे संवर्धन, १००वर्षांपासून जपलेली सुपारी जातीबद्दल माहिती सांगताना एक स्पार्क दिसला.
नुसती फळ पिके नाही तर किमान ४० प्रकारचे देशी वन वृक्ष संवर्धन, २० प्रकारच्या वनौषधी तिच्या फळबागेत पहायला मिळतात. किमान ५० प्रकारचे पक्षी तिच्या बागेत रोज भेटी देतात.