Fodder Shortage : फक्त चाऱ्यासाठी एफपीओ स्थापन होणार

Anil Jadhao 

देशात मागील काही वर्षांपासून पशुधानासाठी चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे देशात पशुखाद्याचे दर वाढले आहेत. वाळलेल्या चाऱ्यासह, पेंड आणि इतर पोष्टक पशुखाद्याच्या दरात मागील दोन वर्षांमध्ये किलोमागे २५ ते ३० टक्क्यांनी वाढ झाली.

सर्वसाधारण वर्षात देशात हिरव्या  चाऱ्याचा तुटवडा १२ ते १५ टक्के असतो. तर वाळेलेल्या चाऱ्याचा तुटवडा २५ ते २६ टक्क्यांपर्यंत असतो. तसेच प्रक्रियायुक्त चारा ३६ टक्क्यांनी कमी असतो.

आता सरकारने देशातील चारा उत्पादन वाढीसाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांचा आधार घेण्याचे ठरवले आहे. केंद्र सरकारने राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डला चारा उत्पादनासाठी १०० शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्यास सांगितले आहे.

यापुर्वी २०२० मध्ये केंद्रीय मत्स्य, पशुधन विकास आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाने फक्त चारा उत्पादनासाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना करण्याची शिफारस केंद्रीय कृषी मंत्रालयाकडे केली होती.

या शेतकरी उत्पादक कंपन्यांचा समावेश १० हजार शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्याच्या सरकारच्या महत्वाकांक्षी प्रकल्पात करण्याची शिफारस केली होती. 

या १०० चारा उत्पादक शेतकरी उत्पादक कंपन्या राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डासोबत काम करतील. या कंपन्यांचा मुळ भर हा चारा उत्पादनावर असेल आणि दुय्यम काम हे पशुधन विकासाचे असेल.

cta image