टीम ॲग्रोवन
सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात लाल मिरचीला चांगलाच उठाव मिळाला. तसेच दरही वधारलेले राहिले.
मिरचीला प्रतिक्विंटलला कमाल १८ हजार ५०० रुपये इतका दर मिळाल्याचे बाजार समितीकडून सांगण्यात आले.
बाजार समितीच्या आवारात गेल्या आठवड्यात लाल मिरचीची आवक प्रतिदिन तीन ते पाच क्विंटल अशी जेमतेम राहिली. पण मागणीमध्ये सातत्य राहिल्याने दर मात्र चांगलेच वधारले.
लाल मिरचीची आवक प्रामुख्याने जिल्ह्यातील विविध भागातूनच होतेच, पण सर्वाधिक आवक कर्नाटकातील विजापूर, इंडी, गुलबर्गा या भागातून होते.
पण गेल्या महिना-दीड महिन्यापासून आवकेत सातत्याने घट होत आहे. मूळात गेल्यावर्षी मिरचीची लागवड कमी झाली.
गेल्या पंधरवड्यापासून तर मागणी आणि आवकेतील तूट वाढत आहे. त्यामुळे दरात तेजी वाढत आहे.
गतसप्ताहात मिरचीला प्रतिक्विंटलला किमान १० हजार रुपये ५०० रुपये, सरासरी १२ हजार ५०० रुपये आणि सर्वाधिक १८ हजार ५०० रुपये इतका दर मिळाला.
त्याशिवाय लसूण, कांद्याचे दर मात्र काहीसे स्थिर राहिले. लसूण आणि कांद्याची आवक मात्र वाढली. लसणाची प्रतिदिन किमान १०० ते २०० क्विंटल आणि कांद्याची १०० गाड्यांपर्यंत आवक राहिली.
लसणाला प्रतिक्विंटलला किमान ८०० रुपये, सरासरी १८०० रुपये आणि सर्वाधिक २५०० रुपये, कांद्याला किमान १०० रुपये, सरासरी ११०० रुपये आणि सर्वाधिक २५०० रुपये असा दर मिळाला.