Maize Rate : मक्याचा बाजार दबावात

Anil Jadhao 

देशातील बाजारात नव्या मक्याची आवक आता सुरु झाली. कर्नाटक, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये नवा मका बाजारात येत आहे.

यंदा केंद्र सरकारनं मक्यासाठी १ हजार ९६२ रुपये हमीभाव जाहीर केला. मात्र नव्या मक्यामध्ये ओलावा अधिक येत असल्यानं दर हमीभावापेक्षाही कमी झाले. मागील १५ ते २० दिवस देशातील बहुतेक भागांमध्ये पाऊस झाला. त्यामुळे मक्याची काढणी रखडलेली आहे. तर काही ठिकाणी मका सुकविण्याचे काम सुरु आहे.

देशातील बाजारांमध्ये सप्टेंबर महिन्यापर्यंत मका दरात तेजी होती. मात्र मक्याचे दर वाढल्याने पशुखाद्यात तांदूळ आणि बाजरीचा समावेश वाढला होता. त्यामुळं मक्याला उठाव कमी होऊन दर घटले. 

नव्या मक्यामध्ये ओलावा जास्त असल्यानं या मक्याला प्रतिक्विंटल १६०० ते २ हजार रुपये दर मिळतोय. तर जूना मका प्रतिक्विंटल २ हजार १०० ते २ हजार ३०० रुपयाने विकला जात आहे.

देशात काही प्रमाणात जुना मका उपलब्ध आहे. शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी दरवाढीच्या अपेक्षेने जुना मका मागे ठेवला होता. मात्र दर दबावात आल्यानं माल शिल्लक आहे.

सध्या जूना मका प्रतिक्विंटल २ हजार १०० ते २ हजार ३०० रुपयाने विकला जात आहे. नव्या मक्यातील ओलावा कमी झाल्यानंतर यादरम्यानच दर मिळतील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.

cta image