महारुद्र मंगनाळे
अंबाजोगाई पासून १४-१५ कि.मी.अंतरावर भावठाण आहे.गावाबाहेर रस्त्याच्या बाजूला नदीच्या कडेला डोंगरावर मानवलोकची २० एकर जमीन आहे. स्व.डॉ.द्वारकादास लोहिया यांचं ही जमीन विकसित करण्याचं स्वप्न होतं
.त्या स्वप्नपूर्तीची सुरूवात साधारण वर्षभरापूर्वी अनिकेतने केलीय.पूर्वी आम्ही आलो तेव्हा चारचाकी आत येण्यासारखा रस्ताही नव्हता.आता रस्ता झालाय.आत आल्याबरोबर एक मोठा हॉल पूर्ण झाल्याचं दिसलं.आतमध्ये दोन छोट्या अटॅच बाथरूम रूम आहेत.
कलरींगचं काम चालू होतं.रस्ते व वृक्षारोपणाचं काम एवढ्या मोठ्या प्रमाणावर झालयं की,आठ महिन्यांपूर्वी इथं केवळ डोंगर होता यावर विश्वास बसणार नाही.शेततळ्याची साईट अतिशय सुंदर आहे.ते डोंगरातलं पाण्याचं बेट असल्याचा भास होतो.
मियावाकी पध्दतीने लावलेल्या सगळ्या जंगलाची वाढ आश्चर्यकारक अशीच आहे.बघतच राहावं,असं हे जंगल काही महिन्यात बनलयं.या सगळ्या जंगलाला ठिबक सिंचनने पाण्याची सोय केलीय.त्यामुळं ऊन्हाची चिंता नाही.
सुबाभूळ,ग्लेसिरियाची पूर्वीची झाडं काढणं सुरू आहे.तिथं नव्याने लागवड होईल.जूनमध्ये ड्रॅगन फ्रुट लावण्याचीही तयारी झालीय.याच डोंगरावर मानवलोकने पाणलोटाची कामे केल्याने, मार्च अखेरीसही ओढा वाहतोय.खालच्या बाजुने नदीचाच शेजार आहे.
काठावर साठ फुट खोलीची मोठी विहीर बांधलीय.तिच्यात नदीतील पाणी सोलरच्या मोटारीने पडतयं.इथंला परिसर केवळ सौरउर्जेवरच प्रकाशमान राहिलं,असं नियोजन करीत असल्याचं अनिकेत बोलला.