Onion Market : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत करा

Team Agrowon

कांदा (Onion) प्रश्नावर सरकारचे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मुंबई-आग्रा महामार्गावरील टेहरे (ता. मालेगाव) येथील हुतात्मा चौकात शेतकरी संघटनेतर्फे (Shetakari Sanghatana) ‘कांदा बाजार स्वातंत्र्य अर्थाग्रह’ रास्ता रोको गुरुवारी (ता.२९) करण्यात आला.

‘‘आजच्या कांद्याच्या प्रश्नाचे मूळ मागील वर्षीच्या कांदा निर्यातबंदीत (Onion Export Ban) आहे. त्यामुळे जागतिक पातळीवर निर्यातीत भारतीय कांद्याची पत घसरलेली आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल (Piyush Goyal) यांनी निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे,’’ असा आरोप करीत या नुकसानीची मदत केंद्र सरकारने द्यावी.

या निर्णयाचा परिणाम म्हणून कांद्यासाठी शेतकऱ्यांनी घेतलेली कर्जे थकली आहेत. ती रद्द व्हावीत किंवा सरकारने ती फेडावीत,’’ अशी मागणी शरद जोशीप्रणित (Sharad Joshi) शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ललित बहाळे यांनी केली.

बहाळे म्हणाले, ‘‘कांदा जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत घालू नये.कांद्याच्या विक्री प्रक्रियेत कोणीही हस्तक्षेप करू नये. या शिवाय साठा मर्यादा, व्यापाऱ्यांवर आयकर धाडी टाकू नयेत. यापूर्वी ज्या ज्या वेळी धाडी टाकल्या, त्यावेळी मोठा फटका शेतकऱ्यांना बसला, असे सिद्ध झाले आहे.’’

सकाळी ११ वाजेपासून शेतकरी हुतात्मा चौकात दुपारी २ वाजेपर्यंत आंदोलन सुरू होते. शेतकरी संघटनेचे पदाधिकारी कांद्याच्या माळा गळ्यात घालून आंदोलनात सहभागी झाले.

आंदोलनस्थळी पोलिस फाटा मोठ्या प्रमाणात तैनात होता. आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी मुंबई-आग्रा महामार्ग अडविल्याने जवळपास एक तास वाहतूक खोळंबली होती.

cta image