Dalimb Rate: डाळिंबाचा बाजार खुलला

Anil Jadhao 

 चालू वर्षी नैसर्गिक आपत्तीच्या तडाख्यात डाळिंब पिकाचा आंबिया बहर प्रभावित झाला आहे. फळांची कुज झाल्याने उत्पादनावर मोठा परिणाम झाल्याची स्थिती आहे.

राज्यातील डाळिंब उत्पादक पट्ट्यातील बाजार आवारात आवक घटल्याने पुरवठा कमी झाला आहे. परिणामी, डाळिंबाची लाली खुलली आहे. दराला झळाळी मिळत आहे. शुक्रवारी राहाता बाजार समितीत डाळिंबाला २५ हजार ५०० रुपये उच्चांकी दर मिळाला.

संततधार पाऊस व रोगांच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनात ४० ते ५० टक्क्यांपर्यंत घट आली आहे. राज्यात उत्पादनाचा आढावा घेतल्यास नाशिक जिल्ह्यात मालेगाव, देवळा व सटाणा तालुक्यात, तर धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात काही प्रमाणात माल काढणीयोग्य होऊन सौदे सुरू आहेत.

सोलापूर, पुणे विभागात मालाची उपलब्धता कमी आहे. काही ठिकाणी माल उपलब्ध आहे; परंतु प्रतवारी नसल्याची स्थिती आहे.

ऑगस्ट महिन्यात मालेगाव तालुक्यातील सातमाने परिसरात १०० रुपयांवर खरेदी सुरू होऊन १५१ रुपये किलोपर्यंत उच्चांकी दर मिळाला होता.

चालु महिन्यात दुसऱ्या आठवड्यापासून मालाची उपलब्धता कमी झाल्याने दराने पुन्हा उसळी घेतली आहे. शिवार खरेदीत प्रतिकिलो १७४ रुपयांचा विक्रमी दर मिळाला होता. त्यानंतर हा दर २५० रुपयांवर गेला आहे.

cta image