Rain Update : पावसामुळं शेतकऱ्यांची चिंता वाढली ?

Team Agrowon

पुणेः राज्याच्या अनेक भागांत पावसानं (Heavy Rainfall) धुमाकुळ घातलाय. गुरुवारी काही भागांमध्ये पावसाचा जोर कमी झाला. मात्र अनेक ठिकाणची पीकं अद्यापही पाण्याखाली आहेत.

त्यामुळं (Rain Intensity) नुकसानीची तीव्रता वाढली. हवामान विभागानं (Weather Department) उद्या सकाळपर्यंत अकोला वगळता संपूर्ण विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज (Heavy Rain Forecast) व्यक्त केलाय.

परतीच्या पावसाने विदर्भात अनेक ठिकाणी हाहाकार उडाला. वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ, नागपूर, अकोला, अमरावती या जिल्ह्यांमध्ये काही भागांतील कपाशी आणि सोयाबीन पिकं हातची गेली.

काढणी करून शेतात ठेवलेल्या आणि उभ्या सोयाबीनला मोठा फटका बसलाय. तर कपाशी पिकाचंही नुकसान वाढलंय.

पूर्व विदर्भातील भंडारा जिल्ह्यातील बारा महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. त्याचा काढणीस आलेल्या धानपिकाला सर्वाधिक फटका बसला.

तर बुलडाणा जिल्ह्यात १९ हजार, तर अकोला जिल्ह्यात ८ हजार १२४ हेक्टरचे नुकसान झाल्याचा अहवाल बनवण्यात आलाय.

नाशिक जिल्ह्यातील निफाड, सिन्नर, येवला, चांदवड, सटाणा, मालेगांव, नांदगाव, नाशिक, दिंडोरी, इगतपुरी तालुक्याला पावसानं झोडपलं. सलग दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पिकं आडवी झाली.

काढणीला आलेली खरीप पिकांचे होत्याच नव्हत झालं. पुणे जिल्ह्याच्या पूर्व पट्यात पावसाची चांगलीच रिपरीप सुरू आहे.

या पावसामुळं पिकांचं नुकसान होतंय. तसचं ऊस तोडणीच्या कामातही अडथळे निर्माण होत आहेत. सातारा जिल्ह्यात अनेक भागांत कमी अधिक स्वरूपात पाऊस पडतोय.

तर सोलापूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेला पावसाचा जोर गुरुवारी काहीसा ओसरला. सांगली जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळं शेतकऱ्यांमध्ये धास्ती निर्माण झालीये.

cta image