Rainfall : राज्यात ऑगस्टअखेर १८ टक्के अधिक पावसाची नोंद

Team Agrowon

राज्यात १ जून ते ३१ ऑगस्ट या कालावधीत ९५७.१ मिलिमीटर म्हणजेच १८ टक्के अधिक पावसाची नोंद (Monsoon Rain) झाली आहे. कोकणात पावसाने सरासरी गाठली असून, उर्वरित राज्यात सरासरीच्या तुलनेत अधिक पाऊस झाला आहे.

जुलै महिन्यापाठोपाठ ऑगस्टच्या पहिल्या पंधरवड्यात पावसाचा (Monsoon Rainfall) तडाखा सुरूच राहिला, मात्र अखेरच्या टप्प्यात पावसाचा जोर (Rain Intensity) कमी होऊन अनेक भागात उघडीप मिळाली.

यंदाच्या हंगामाचा विचार करता जून महिन्यात पूर्वमोसमी पावसाची दडी, मॉन्सूनच्या पावसाचा अभाव यामुळे राज्यात १४७.५ मिलिमीटर म्हणजेच सरासरीच्या अवघा ७० टक्के पाऊस पडला होता.

मात्र जुलै महिन्यात राज्यात सर्वदूर दमदार पाऊस कोसळल्याने जुलैअखेरपर्यंत राज्यात ६७७.५ मिलिमीटर म्हणजेच २७ टक्के अधिक पावसाची नोंद झाली होती. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात अनेक भागात अतिवृष्टी झाली.

त्यामुळे ओल्या दुष्काळाची स्थिती आणखी बिकट झाली. मात्र दुसऱ्या पंधरवड्यात काही भागांत पावसाने दडी मारल्याचे चित्र पाहायला मिळाले. यात काही ठिकाणी तर १५ ते २२ दिवस पावसाची उघडीप असल्याने पेरणी झालेली पिके करपू लागली.

ऑगस्टमध्ये मराठवाड्याचा बहुतांश भाग व लगतचा उत्तर महाराष्ट्र आणि पश्‍चिम विदर्भातील जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी असल्याचे दिसून आले.

कमी कालावधीत जोरदार पावसाने ऑगस्ट महिन्याची सरासरी गाठली असली, तरी पावसाने असमान वितरण हे वैशिष्ट्य ठरले. विभागनिहाय पडलेल्या पावसाची स्थिती पाहता ऑगस्ट अखेरपर्यंत कोकण विभागात सरासरी पाऊस झाला.

मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा २१ टक्के अधिक, तर विदर्भात सरासरीपेक्षा २५ टक्के अधिक पाऊस झाल्याचे हवामान विभागाच्या नोंदीवरून स्पष्ट झाले.

ऑगस्ट महिन्यात पहिल्या दोन आठवड्यांत चांगला पाऊस झाला. महिन्याभरात अरबी समुद्रात एक, बंगालच्या उपसागरात तीन अशा एकूण चार कमी दाब प्रणाली तयार झाल्या. तीव्रता अधिक असलेल्या (डिपेशन) या प्रणाली महिन्यात तब्बल १९ दिवस सक्रिय राहिल्या.