Chilli Rate : पाकिस्तानमधील मिरची हब उद्धवस्त

Anil Jadhao 

पाकिस्तानमधील कापूस पिकाला पुरामुळे मोठ्या प्रमाणात फटका बसला. कापसासोबतच पूर आणि उष्णतेचा फटका पाकिस्तानमधील मिरची पिकालाही बसला.

पाकिस्तान मिरची उत्पादनात चौथ्या क्रमांकावर येतो. येथे दरवर्षी जवळपास दीड लाख एकरवर मिरचीची लागवड होते. तर उत्पादनही जवळपास दीड लाख टनांवर होते. त्यामुळे जागतिक मिरची बाजारात पाकिस्तानचं स्थान महत्वाचं आहे.

पाकिस्तानमध्ये उन्हाळ्यात यंदा अनेक वर्षातील विक्रमी तापमानाची नोंद झाली. शेतकऱ्यांनी टाकलेल्या रोपवाटीका उष्णतेमुळे करपल्या. 

उन्हाळ्यात उष्णतेचा मार झेलणाऱ्या शेतकऱ्यांना ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पुराचा सामना करावा लागला. पाकिस्तानमधील पंजाब, सिंध आणि बलुचिस्तान या प्रांतांमध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात जोरदार पाऊस झाला. पुरामुळे कापूस, भाजीपाला आणि मिरची पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. 

पाकिस्तानमधील अनेक मिरची उत्पादकांना यंदा निम्मही उत्पादन मिळालं नाही. अनेक शेतकरी केवळ ३० ते ४० टक्क्यांपर्यंतच उत्पादन मिळाल्याचं सांगत आहेत.

पाकिस्तानमध्ये कुनरी मिरची मार्केट सर्वात मोठे आहे. या बाजारात मिरचीची आवक मोठ्या प्रमाणात असते. कुनरी बाजारातील व्यापाऱ्यांच्या मते गेल्यावर्षी या काळात १० हजार बॅग्सपर्यंत मिरीच आवक होत होती. मात्र सध्या आवक २ हजार बॅग्सपेक्षा जास्त होतना दिसत नाही.

cta image