Rice Export : तांदळावरील निर्यातबंदी मागे घ्या - किसान सभा

Team Agrowon

तांदूळ निर्यातीवरची बंदी (Rice Export Ban) तातडीने मागे घ्यावी, अशी मागणी किसान सभेने Kisan Sabha) केंद्र सरकारकडे केली आहे.

सरकारने तुकडा तांदळाच्या निर्यातीवर बंदी (Broken Rice Export Ban) लागू केली असून बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर (Non Basamti Rice Export) २० टक्के निर्यातकर लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

सरकारच्या या निर्णयामुळे तांदूळ उत्पादक (Rice Producer) शेतकऱ्यावर अन्याय होणार असल्याने केंद्र सरकारने तांदूळ निर्यातबंदी तातडीने उठवावी अशी मागणी किसान सभेने केली आहे.

शेतकऱ्यांना शेतीमालाला दोन पैसे मिळायला लागताच यापूर्वीची सरकारे निर्यातबंदी लागू करून शेतीमालाचे भाव पाडायचे. भाजप असे करणार नाही, उलट हे सरकार शेतकऱ्यांच्या हातातील बेड्या तोडेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वारंवार जाहीर केले होते.

प्रत्यक्षात मात्र कांदा, गहू आणि आता तांदळावर निर्यातबंदी लागू करून केंद्र सरकारने आपल्या कथनी आणि करणीत अंतर असल्याचे सिद्ध केले आहे, असे किसान सभेने निवेदनात म्हटले आहे.

खरीपात भात उत्पादन घटण्याचा अंदाज असून, घाऊक आणि किरकोळ बाजारात तांदळाचे दर वाढले असल्याने व पशुखाद्य आणि इथेनॉल मिश्रणासाठी तांदळाची उपलब्धता घटली असल्याने निर्यातबंदी लागू केल्याचा लटका युक्तिवाद केंद्र सरकारकडून केला जात आहे.

प्रत्यक्षात मात्र देशांतर्गत तांदळाची उपलब्धता पाहता निर्यातबंदी लागू करण्याची अजिबात आवश्यकता नाही हे वास्तव आहे.

देशात तांदळाचा पुरेसा साठा उपलब्ध असून निर्यातबंदीची गरजच नाही असे केंद्र सरकारकडून यापूर्वी वारंवार जाहीर करण्यात आले आहे. असे असताना गव्हाप्रमाणेच तांदळाच्या बाबतीतही केंद्र सरकारने रात्रीतून आपली भूमिका बदलत तांदळावर निर्यातबंदी लागू केली आहे. तांदूळ उत्पादक शेतकऱ्यांवर हा मोठा आघात आहे.

cta image