मनोज कापडे
१. ही कहाणी आहे शेतकरी सगाबाई बबन कचरे यांची.
लग्नानंतर दोन वर्षात घरधन्याचे अकाली निधन झालेले, समोर एकदीड एकरची उजाड शेती, झोपडीतील दाणापाणी संपलेला आणि अंगावर अंगावर दीड वर्षाचा तान्हा… अशी भयावह स्थिती असताना मावळातील ही आधुनिक हिरकणी डगमगली नाही.
जगण्यासाठी ‘ती’ गुराखी बनली. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात धाडसाने एकटे फिरत वर्षानुवर्षे पशुपालनाचे काम करीत तीने मुलाला वाढवले. त्याला उच्चशिक्षणासाठी पुण्यात पाठवत स्वतः मात्र अजूनही दऱ्याखोऱ्यात एकटी जगते आहे.
२. तोरणा गिरीदुर्गाच्या पाठीमागील दुर्गम भागात वेल्हा तालुक्यातील डोफेखिंडीच्या शिखरावर सगाबाईंची झोपडी आहे. “तोरणा किल्ल्याच्या घेऱ्यातील भट्टी गावात माझे माहेर आहे. २० वर्षांपूर्वी लग्न होऊन मी इथे सासरी आले.
धनी दोन खंडी शेळ्यांचा मालक होता. लग्नाच्या दुसऱ्याच दिवसापासून मी रानात जाऊ लागले. नशिब चांगले नव्हते. दोन वर्षात धनी आजारपणात मरण पावले. दीड वर्षाच्या मुलासह माझा संसार उघड्यावर आला. शेतीत भात सोडून काहीच येत नव्हते. उभे आयुष्य पडलेले होते. पण मी सासरची झोपडी न सोडण्याचा निर्णय घेतला,” सगाबाई आपली कहाणी सांगत होत्या.
३.माहेरी शेती होती. पण, जमिनीची खरेदी विक्री करणाऱ्या पार्टीवाल्यांना स्वस्तात जमीन गेली. माझ्या भावांनी मला हे गाव न सोडण्याचा सल्ला दिला. मग मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत माझ्या एकुलत्या एक मुलासोबत म्हणजेच संतोषसोबत रानात राहू लागले.
गुराढोराबरोबरच त्याला मी वाढवला. त्याला बारावीपर्यंत मावळात शिकवले. आता त्याला पुण्याला पाठवले आहे. त्याला सरकारी नोकरीत जायचे आहे. माझ्याकडे आता दोन शेळ्या आणि दोन गायी आहेत. एक बकरू पाच हजाराला विकले जाते. दोन पोते भात होतो. त्यातच मी संसार चालवते,” सगाबाईंच्या बोलण्यात आत्मविश्वास दिसत होता.