Soybean Rate : बाजारात सोयाबीनची दरपातळी काय राहीली?

Anil Jadhao 

देशातील बाजारात आज, म्हणजेच २७ डिसेंबरला जवळपास साडेचार लाख क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. पण सोयाबीनच्या दरात विशेष काही बदल झाले नाहीत.

मध्य प्रदेशात आज सव्वा दोन लाख टन सोयाबीन विक्रीसाठी आलं होतं. मध्य प्रदेशात सोयाबीनला सरासरी ५ हजार ३०० ते ५ हजार ६०० रुपये दर मिळाला होता. तसंच प्रक्रिया प्लांट्सचे दर सरासरी ५ हजार ७०० रुपयांवर होते.

आज राज्यात दीड लाख टन सोयाबीन विक्रीसाठी आले होते. तर या सोयाबीनला सरासरी ५ हजार २०० ते ५ हजार ५०० रुपये दर मिळाला. प्रक्रिया प्लांट्सचे दर सरासरी ५ हजार ७०० रुपयांवर होते.

आंतरराष्ट्रीय सोयाबीन आणि सोयापेंडचे सौदे वाढू शकतात. तसंच जानेवारीत चीनची मागणी वाढण्याचा अंदाज आहे. अर्जेंटीना आणि ब्राझीलमधील परिस्थिती बऱ्यापैकी स्पष्ट होईल.

जानेवारीच्या मध्यापर्यंत देशातील बाजारात सोयाबीनची आवक जास्त असते. त्यामुळं दरही सर्वात कमी असतात. पण यंदा शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्री कमी केल्यानं दर जास्त तुटले नाहीत. पण दबावात मात्र आले.

सोयाबीन दर कमी झाल्यानं सोयापेंडचे भावही कमी होऊन सोयापेंड निर्यात वाढली. तसंच सौदेही वाढले. भारतीय सोयापेंडला जानेवारीत चांगली मागणी राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळं सोयाबीनच्या दरातही सुधारणा होऊ शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला.