Sugarcane : गाळप हंगाम एक ऑक्टोबरपासून सुरू होणार ?

Team Agrowon

सध्या राज्यभर सुरू असणारा वादळी पाऊस (Heavy Rain) सरकारच्या या प्रयत्नाला खीळ घालण्याची शक्यता आहे. विशेष करून ऊस पट्ट्यामध्ये सातत्याने जोरदार पाऊस सुरू आहे.

गेल्या वर्षीचा ऊस हंगाम जून महिन्यापर्यंत लाबल्याने यंदा सरकारने एक ऑक्टोबरपासून गाळप हंगाम (Crushing Season) सुरू करण्याबाबत नियोजन सुरू केले आहे.

विशेष करून पश्‍चिम महाराष्ट्रातील ऊस पट्ट्यात दसरा ते दिवाळी (Dasara And Diwali) या दरम्यानच ऊस हंगाम सुरू होईल, अशी शक्यता आहे. राज्यात यंदा १४ लाख ८८ हजार हेक्टर क्षेत्रातील ऊस तोडणीसाठी (Sugarcane Crushing) उपलब्ध आहे.

हवामान खात्याकडूनही (IMD) पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. या पार्श्‍वभूमीवर एक ऑक्टोबरपासून गाळप हंगाम सुरू करण्याचे आव्हान आहे.

गेल्या वर्षी १४ लाख ८७ हजार हेक्टर क्षेत्रावरील उसाची तोडणी झाली होती. यामुळे जवळ जवळ गेल्या वर्षीसारखी स्थिती राज्यभर आहे. यामुळेच राज्य शासनाने नियोजनाचा भाग म्हणून एक ऑक्टोबरपासून ऊसतोडणी सुरू करण्याचे ठरवले आहे.

या बाबत प्रशासन पातळीवरून तयारीही सुरू केली आहे. या महिन्यात हंगाम सुरू करण्यास पावसाबरोबरच ऊस पिकाची अपरिपक्वता ही महत्त्वाची बाब ठरते.

यामुळे या महिन्यात शक्यतो करून कारखाने हंगाम सुरू करण्यास फारसे तयार नसतात. ऊस पट्ट्यात प्रामुख्याने पश्‍चिम महाराष्ट्रामध्ये शेतकरी संघटनांचे वर्चस्व असल्याने या संघटनांच्या ऊस परिषदाही आहेत.

हंगामाच्या प्रारंभासाठी त्या ही महत्त्वाच्या ठरतात. एकंदरीत परिस्थितीचा विचार केल्यास दसऱ्यानंतरच गाळप हंगाम सुरू होईल, असे कारखाना प्रतिनिधींचे मत आहे.

cta image