Tur Market : तूर उत्पादनात किती घट होणार ?

Anil Jadhao 

देशातील बाजारात सध्या तुरीची आवक वाढत आहे. मात्र सध्यातरी तुरीचे दर तेजीत आहे. पण हे दर टिकतील का? असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत.

जाणकारांच्या मते आयात वाढली तरी, तुरीचे दर तेजीत राहतील. कारण यंदा देशातील तूर उत्पादनात घट होणार आहे. देशात तुरीची लागवड जवळपास साडेचार टक्क्यांनी कमी राहिली. त्यातच सुरुवातीपासूनच तुरीचे पीक संकटाच्या गर्तेत सापडले.

जून आणि जुलै महिन्यात पावसाने ओढ दिल्याने लागवडी उशिरा झाल्या. त्यातच सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्र आणि कर्नाटकातील महत्वाच्या तूर उत्पादक भागांमध्ये सलग जोरदार पाऊस झाले. त्यामुळे पिकाचे नुकसान झाले.

नोव्हेंबर महिन्यातही सलग १५ ते २० दिवस पाऊस होता. त्यामुळे फुलोऱ्यातील तुरीचे फूल गळून पडले. आता तूर शेंगा दाणे भरण्याच्या स्थितीत आहे. मात्र पिकाला आवश्यक थंडी नाही.

यंदा नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात सरासरीपेक्षा जास्त तापमान राहिले. त्यातच मागील चार ते पाच दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे तुरीवर कीड-रोगांचा प्रादुर्भाव होतोय. तर फूलगळही वाढली.

यंदा तुरीचे उत्पादन गेल्या वर्षीपेक्षा जवळपास २५ ते ३० टक्के कमी राहील, असा अंदाज जाणकार व्यक्त करत आहेत. सध्या तुरीला सरासरी ६ हजार ९०० ते ७ हजार ६०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळतोय. हा दर पुढील काही दिवस टिकून राहील.

cta image