Team Agrowon
माझ्या लहानपणी दुपारच्या वेळी घाटावर नदी वेगळाचं दिसायची. इथं माणसांची रेलचेल असायची. लोकं कपडे धुवायला यायची.
परीट गल्ली इथून तीन चार फर्लांग अंतरावर. त्यामुळे तेंव्हा सगळीच माणसं इथं येत असावीत. जरा पुढं उजवीकड मंदिरं ओलांडली की एखादा गडी म्हशी धुवायला इथच घालायचा.
घाटाजवळ म्हशी घातल्या की उगा वादाचा विषय होऊन बसतो. उत्तरेश्वर, तेली गल्ली, डांगे गल्ली, बुरुड गल्ली, कासार गल्ली सगळं इथं यायचं दुपारच्याला.
त्यावेळी रोज नळाला पाणी कुठं? आणि असलं तरी कितीसं. सकाळी पिण्यापूरतं आणि न्हाण्यापूरतं झालं की झालं. मग धुणं इकडचं.
मला एकदाच कधीतरी दसऱ्याचं बायकांनी घाटावर केलेलं धुणं बघायला मिळालं. घाटाच्या मागं डावीकडे हिरवागार एक जमिनीचा तुकडाय.
आणि त्या तुकड्यावर लालभडक, गुलाबी, हिरव्याकंचं, निळ्याशार तुकड्यांचा बनलेला गोधड्यांचा कोलाज एखाद्या इम्प्रेशनीझम किंवा मॉडर्न ऍब्स्ट्रॅक्ट वगैरे कलेचा नमुना वाटावा इतका सुंदर रंगांनी भरलेला.
खरतरं डोळ्याने प्रत्यक्ष दिसतात त्यापेक्षा चित्रातलेचं रंग मला आवडतात. काही अपवादांपैकी हा एक.