Wheat Market Rate : गव्हाचे दर पुन्हा वाढले

Anil Jadhao 

देशातील गव्हाचं उत्पादन यंदा घटलं. त्यातच गहूनिर्यात जास्त झाली. त्यामुळं दरही तेजीत आले होते. दरवाढीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारनं गहू निर्यातबंदी केली. त्यानंतर गहू पीठ आणि रव्याच्या निर्यातीवरही निर्बंध लादले.

निर्यातबंदी केल्यानं गव्हाचे दर कमी होतील, असा विश्वास सरकारला होता. तसचं देशात गहू उत्पादन कमी झालं तरी खरिपात तांदूळ उत्पादन वाढेल, अशी आशा होती.  त्यामुळं सरकारनं कल्याणकारी योजनांमधून गव्हाऐवजी तांदळाचं वितरण वाढवलं.

जून महिन्यापासूनच पावसाचं प्रमाण महत्वाच्या भात उत्पादक पट्ट्यात कमी राहीलं. ही तूट पुढील दोन महिने कायम राहिली. त्यामुळं खरिपातील भात लागवड जवळपास १९ टक्क्यांनी घटली, तर उत्पादन १०० लाख टनांनी कमी राहण्याचा अंदाज जाणकार व्यक्त करत आहेत.

तांदूळ उत्पादनात घटीचे अंदाज पुढे आल्यानंतर गव्हाच्या दरात पुन्हा वाढ होत गेली. अनेक बाजारांमध्ये गव्हाने पुन्हा २५०० रुपये प्रतिक्विंटलचा टप्पा गाठलाय.

जवळपास सर्वच राज्यांमध्ये मागील महिनाभरात गव्हाचे जर वाढले आहेत. गुजरातमध्ये गव्हाच्या दरात क्विंटलमागे ५० रुपयांची वाढ झाली.

मध्य प्रदेशात मागील महिनाभरात ७० रुपयांनी दर वाढले. तर राजस्थानमध्ये ३० रुपये आणि उत्तर प्रदेशात ५० रुपयांची दरात सुधारणा झाली. रब्बीतील गहू हाती येईपर्यंत गव्हाचा तुटवडा भासून दर तेजीतच राहू शकतात, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय.

cta image