Wheat Rate Update: गव्हाचे दर पुन्हा वाढले

Anil Jadhao 

देशात दिवाळीमुळे ऑक्टोबर महिन्यात गव्हाचे दर वाढले होते. यंदा हंगाम सुरु झाल्यापासून गव्हाचे दर तेजीत होते. दरात आणखी वाढ होईल, या आशेने शेतकऱ्यांनी गहू मागे ठेवला होता. आता दर पुन्हा सुधारल्याने शेतकऱ्यांनी गहू विक्रीला पसंती दिली.

देशात यंदा गहू उत्पादन घटले. तसेच निर्यातही जास्त झाली. त्यामुळे गव्हाचे दर तेजीत होते. खुल्या बाजारात गव्हाचे दर तेजीत असल्याने सरकारला गहू खरेदीचे उद्दीष्ट साध्य करता आले नाही. अनेक शेतकऱ्यांनी दर वाढेल, या आशेने गव्हाचा साठा मागे ठेवला होता.

शेतकऱ्यांनी गहू मागे ठेवल्याने एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीतील गहू आवक यंदा मागील तीन वर्षांतील उच्चांकी ठरली. आता ऑक्टोबर महिन्यात दिवाळीच्या सणामुळे गव्हाला मागणी वाढली होती.

यंदा रब्बीतील गहू आवक सुरु झाल्यापासून म्हणजेच एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत बाजारात २१५ लाख टन गहू आवक झाली. मागील हंगामात, म्हणजेच २०२२ च्या हंगामात १८० लाख टनांची आवक या काळात झाली होती.

यंदा शेवटच्या टप्प्यात गव्हाची आवक वाढली. याचाच अर्थ असा की शेतकऱ्यांनी यंदा गव्हाचा साठा मागे ठेवला होता. त्यामुळे यंदा सरकारला केवळा १८८ लाख टन गहू हमीभावाने खरेदी करता आला. तर मागील हंगामातील खरेदी ४३४ लाख टनांवर झाली होती.

सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातील दर सरासरी २ हजार ४०० रुपांवर पोचला होता. मात्र ऑक्टोबर महिन्यात  गव्हाच्या दराने २ हजार ६५० रुपयांचा टप्पा गाठला. दिवाळीमुळे गव्हाला उठाव मिळाल्याने दर वाढल्याचे बाजारातील व्यापाऱ्यांनी सांगितले.

cta image