Wheat Market : गहू दर विक्रमी टप्पा गाठणार

Anil Jadhao 

रशिया आणि युक्रेनमधील युध्दामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात गव्हाचा पुरवठा कमी झाला. परिणामी आंतरराष्ट्रीय बाजारात गव्हाचे दर वाढले. नेमकं याच काळात देशातील नवा गहू बाजारात आला.

देशात गव्हाचा साठाही भरपूर होता. त्यामुळे देशातून विक्रमी गहू निर्यात झाली. पण सरकराल देशातील गहू उत्पादनाचा अंदाज आला नाही. विक्रमी उष्णतेमुळे देशातील गहू उत्पादन घटले. तर दुसरीकडे निर्यातही मोठ्या प्रमाणात झाली.

खुल्या बाजारात गव्हाचे दर हमीभावापेक्षा वाढले. यंदा सरकारने ४२० लाख टन गहू खरेदीचे उद्दीष्ट ठेवले होते. नंतर त्यात कपात केली गेली. सरकारला केवळ १८६ लाख टन गहू मिळाला. त्यामुळे सराकरकडील गव्हाचा बफर स्टाॅक घटला. तसेच बाजारातील आवकही कमी झाली.

देशातील गव्हाचे वाढलेले दर कमी करण्यासाठी सरकारने गहू, गहू पीठ, रवा आणि मैदा निर्यातबंदी केली. मात्र तरीही वरचेवर गव्हाचे दर वाढत गेले. मागील चार महिन्यांमध्ये गव्हाच्या दर प्रतिक्विंटल २ हजार ३०० रुपयांवरून २ हजार ९०० रुयांपपर्यंत वाढले.

देशातील गहू दरवाढ पाहून प्रक्रिया उद्योगाने सरकारकडे खुल्या बाजारत गहू विक्री करण्याचे आवाहन केले. गव्हाचे दर कमी करण्यासाठी सरकारला किमान ३० लाख टन गहू खुल्या बाजारात विकावा लागेल.

सरकारने खुल्या बाजारात हस्तक्षेप करून दरनियंत्रण केले नाही तर गहू लवकरच दराचा विक्रमी टप्पा गाठेल, असा अंदाज प्रक्रिया उद्योगांनी व्यक्त केला आहे. सरकारने आपल्या साठ्यातील गहू खुल्या बाजारात विकावा, हा सर्वात योग्य पर्याय असल्याचेही उद्योगाचे म्हणणे आहे.

cta image