Cow Rearing: निराशेचा गायगोठा

स्वतः शेतकरी असणारी, गोसंवर्धनासाठी प्रयत्न करणारी व्यक्ती गायी खरेदी करते आणि तिच्यावर कुठलीही शहानिशा न करता थेट गुन्हा दाखल होत असेल तर ही बाब किती भयानक आहे! गोरक्षा, गोवंश हत्याबंदी वगैरे कायद्यांचा उद्देश नेमका काय आणि त्याचा बडगा कोणाला दाखवला जातोय, याबद्दल दत्तभाऊ साशंक आहेत. शिवाय असल्या कटू अनुभवानंतर गोसंगोपनाचे प्रामाणिक प्रयत्न या भ्रष्ट व्यवस्थेत कितपित टिकून राहतील, याबद्दल ते निराश झाले आहेत.
Animal Care
Animal CareAgrowon

दत्ताभाऊ राक्षे हे आमचे प्रगतिशील शेतकरी मित्र आहेत. ते वारकरी आहेत. पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यातील साळुंबरे हे त्यांचं गाव. आपल्या सहा एकराच्या वावरात भारदस्त देशी गायींचा गोठा असावा, अशी त्यांची मनोमन इच्छा. कोरोनाची पहिली टाळेबंदी उठली तेव्हा त्यांनी देशी गीर गायी आणण्यासाठी थेट राजस्थानातला भिलाडा तालुका गाठला.

त्यांनी तीन-चार दिवस आजूबाजूचा परिसर पिंजून काढला. त्यांना अखेर चांगल्या गायी-वासरांचा पत्ता लागला. मग त्यांनी १० गायी, १ वासरू आणि सोबतीला १ गौर अशी एकूण १२ जनावरं तिथल्या स्थानिक शेतकऱ्याकडून खरेदी केली. काही गायी दहा हजारांना, तर काही गायींसाठी २० ते ३३ हजार रुपयांचा मोबदला ठरवला. सगळ्या गायी थारपारकर. देशी गायींची आपली कित्येक दिवसांची आवड पूर्ण होणार, म्हणून सबंध राक्षे कुटुंब खुश झालेलं होतं. शिवाय या गाय-वासरांची सेवा म्हणजे विठ्ठलाची सेवा, अशी त्यांची अंतर्मनातली भावना होती. देशी गायींचं संगोपन आणि जोडधंदा असा त्यांचा संकल्प पूर्ण होणार होता. पैकी तीन गायी एका मित्राच्या. त्यामुळे तोही सोबतीला होताच. राजस्थानला जाताना आधार कार्ड, पॅन कार्ड इथल्या स्थानिक गोशळेचे पत्र, शेतकरी असल्याचा पुरावा म्हणून सात बारा अशी बरीच कागदपत्रे सोबत घेतली होती. स्वतःची कार आणि जोडीदारासोबत चालक अशी सगळी तयारी केलेली होती.

गायींची खरेदी आटोपली; पण त्या न्यायच्या कशा? वाहतुकीचं साधन मिळेना. खूप चौकशी केल्यावर १२ टायरची गाडी ६० हजार रुपये भाड्याला ठरवली. इतर खर्च काय होईल तसा ठरला. पुढच्या परवानगीसाठी गाडी तडक भिलाडाच्या कलेक्टर ऑफिसला नेली. इथं जिल्हाधिकारीच कोरोना बाधित आणि क्वारंटीइन; त्यामुळे परवानगी काही मिळाली नाही. त्यामुळे बालासती ग्रामपंचायतीचे ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) तसेच बजरंग दल, भिलाडा यांची देखील परवानगी/ एनओसी सोबत असावी म्हणून मिळवली. दुभत्या गायींसोबत सगळ्यांचा खुराक, आंबवण सगळं भरून ते मावळाच्या प्रवासाला निघाले.

नियमाप्रमाणे सहा टायरच्या गाडीला नऊ गुरं वाहून नेण्याची परवानगी असते; मग १२ टायरच्या गाडीच्या प्रमाणात त्यांनी गायी भरल्या. कोरोनाने आधीच बऱ्याच व्यवसायांचं कंबरडं मोडलेलं असल्याने एक गाडीमालक-चालक स्वतःच मावळात यायला निघालेला. त्याच्या गाडीचे हप्ते आधीच थकलेले. मावळातल्या या शेतकरी राजानं कुठं तरी आशेचा किरण दाखवलेला म्हणून त्याच्या चेहऱ्यावरती आनंद दिसत होता. दत्ताभाऊंनी प्रवासाला सुरुवात केली.

राजस्थान ते सांगवडे (ता. मावळ) व्हाया गुजरात या प्रवासात ही गाडी एक-दोन नाही तब्बल सहा वेळा अडवण्यात आली. सुरुवातीच्या टप्प्यात वेगवेगळी कागदपत्रं पाहून गाडी पुढं सोडली जायची. वापी (गुजरात) येथे गुरांना चारा आणि पाणी देण्यासाठी गाडी थांबली. सगळी गुरं, दुभती गाय आणि वासरं माणसासोबत चारा खाऊन, थोडी विश्रांती घेऊन मावळाच्या प्रवासाला निघणार होती. सूर्य मावळायला आला होता. दोनेक तासांनी प्रवास सुरू झाला. पुढच्या चिखली या ठिकाणी पोलीस फौजफाटा व जवळपास ३०० लोकांच्या जमावानं गाडी अडवली. पोलिसांनी किंवा कुणीही कसलीही कागपत्रं न पाहता थेट अरेरावी सुरू केली. गाडीभरून गायी कत्तल करायला कुठं नेत आहात, असे आरोप करत गाडीमालकाशी हुज्जत घालायला सुरुवात केली. तोवर जमाव आणि आपल्या गुरांची गाडी थांबलेली बघून राक्षे बंधूनी आपली मोटरगाडी बाजूला घेतली.

Animal Care
Animal care : लम्फी स्कीन रोगावर नव्या लसीची मात्रा

दत्ताभाऊ काय प्रकार सुरू आहे म्हणून ड्रायव्हर व गाडीतले जोडीदार यांच्यासोबत कागद दाखवायला गेले असता, तुम्ही या जनावरांना कत्तल करायलाच नेत आहात असे म्हणत गुजरात पोलिसांनी थेट मोबाईल काढून घेतले. कुठलीही शहानिशा न करता आरोप करत गाडीतल्या सर्व गायी जवळच्या गोशाळेत नेण्यात आल्या आणि गाडीसह सर्वांना जवळच्या चिखली-डुंग्री पोलिस चौकीला नेण्यात आले. मोटरगाडीचे दोन ड्रायव्हर आणि दत्ताभाऊंचे जोडीदार यांच्यावर थेट ‘एफआयआर’च दाखल करण्यात आला. एरवी एफआरआय दाखल व्हायला कसा आणि किती वेळ लागतो, या किचकट प्रक्रियेचा अनुभव कदाचित तुम्हाला असेल. दत्ताभाऊ म्हणतात, ‘‘इथं सगळं ठरवून केल्यासारखं दिसत होतं. आम्ही थांबलो काय? आम्हाला अडवलं काय जातंय आणि थेट गुन्हे काय दाखल केले जातात? अगदी तासाभरात ही प्रक्रिया पूर्ण होऊन आम्हाला तीन दिवस कोठडीत अडकवलं काय जातंय? या सगळ्यावर आमचा विश्‍वासच बसत नव्हता.’’

Animal Care
Animal Care : पशुआहारात कॅल्शिअम महत्त्वाचे...

एफआयआर नोंदवताना गंभीर कलमं लावली होती. गुरांना अमानुष वागणूक आणि छळ करणे, जसे की चारा-पाणी न देणे, तसेच गाडीत निर्धारित क्षमतेपेक्षा जादा लोड अशी कलमं लावून गाडी जप्तदेखील करण्यात आली. दत्ताभाऊंचं कुठलंही म्हणणं ते लोक ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत नव्हते. आपल्याला जे वाटतंय ते बेधडक निर्धास्तपणे मांडत होते. त्यापुढे सगळेच हतबल झाले. सोबतीला तीन दिवसांची साधी कैद. पोलिसांनीच जामिनासाठी वकील करण्याचा सल्ला दिला. वकिलाला १९ हजार रुपये रोख फी दिल्यानंतर जामीन अर्ज फेटाळत १५ दिवसांची कस्टडी झाली. त्यानंतर पुन्हा तिथल्या स्थानिक वकिलाने पुन्हा एक लाख रुपये इतकी फी घेऊन जामीन मंजूर करण्यासाठी अर्ज केला. शेवटी जामीन मंजूर झाला. दरम्यानच्या काळात मावळात, भागात फोनाफोनी करून राजकीय, संघटन किंवा कुणाचाही मदतीसाठी काहीच उपयोग होत नव्हता.

एवढं सगळं झाल्यानंतर गावी परत आल्यावर तब्बल १५ दिवसांत सोलवन्सीसाठी अर्ज करायचा असतो, अशी आठवण वकील महाशयांनी करून दिली. त्यांनी सोलव्हन्सीसाठी अर्ज नसेल तर पुन्हा वॉरंट निघून अटक होईल, अशी भीती दाखवत त्या कायदेशीर प्रक्रियेसाठी पुन्हा पैशांची मागणी केली. या प्रकाराची खातरजमा करण्यासाठी म्हणून दुसरा वकील नेमून पुन्हा ४० हजार रुपये फी भरून सोलव्हन्सी दाखल केली. त्याचा नाहक आर्थिक, मानसिक त्रास वेगळाच. त्यासोबतच त्यांनी त्याच वकिलाकरवी गुरं व गाडी सोडण्यासाठी कोर्टात अर्ज केला. त्यावर गेली अडीच वर्षे ‘तारीख पे तारीख’ होऊन हे प्रकरण अहमदाबाद उच्च न्यायालय येथे प्रलंबित आहे. त्यावर कुठल्याही प्रकारची दाद अजूनही मिळालेली नाही. गाडीचे हप्ते व गाडी अजूनही सडत आहे.

माझ्या माहितीतील काही लोकांकरवी सदरच्या केसबाबत तिथल्या लोकांची मदत मागण्याचा प्रयत्न केला; पण सगळं व्यर्थ. दत्ताभाऊंवर ओढवलेल्या या आपबितीची कैफियत मी आमचे वकील मित्र आशिष महाजन यांना फोनवर सांगितली. तेव्हा ते म्हणाले, ‘‘ग्रामपंचायतीसारख्या स्थानिक स्वराज्य सस्थेचं पत्र आणि गाई विकणाऱ्याचं प्रतिज्ञापत्र (ॲफिडेव्हिट) अशा ताकदवर गोष्टी न्यायदानात नक्की मदत करतील; पण न्यायादानाची वेळ येईल तेव्हा.’’

स्वतः शेतकरी असणारी, गोसंवर्धनासाठी प्रयत्न करणारी व्यक्ती गायी खरेदी करते आणि तिच्यावर कुठलीही शहानिशा न करता थेट गुन्हा दाखल होत असेल तर ही बाब किती भयानक आहे! गोरक्षा, गोवंश हत्याबंदी वगैरे कायद्यांचा उद्देश नेमका काय आणि त्याचा बडगा कोणाला दाखवला जातोय, याबद्दल दत्तभाऊ साशंक आहेत. शिवाय असल्या कटू अनुभवानंतर गोसंगोपनाचे प्रामाणिक प्रयत्न या भ्रष्ट व्यवस्थेत कितपित टिकून राहतील, याबद्दल ते निराश झाले आहेत. ते मला आपल्या आईसोबत मावळातला त्यांचा रिकामा गोठा दाखवत होते, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरची अबोल हतबलता खूप काही सांगून जात होती.

एवढं सगळं असून गुजरातमध्ये मोकळ्या गायी कशा काय फिरतात? उत्तर प्रदेशमध्ये मोकाट जनावरांची समस्या शेतकऱ्यांची डोकेदुखी कशी बनते? प्रदेश बदलतो तसा कुठल्याही संघटनेचा अजेंडा बदलतो का? असे अनेक प्रश्‍न आजही सामान्य जनतेला भेडसावत आहेत. स्वकमाईतली पुंजी खर्ची पाडत पदरी निराशा पडणार असेल, तर ही व्यवस्था नेमकी कोणाच्या हितासाठी राबवली जात आहे?

सत्ताधीश राजकारणी आणि एकूण व्यवस्था गायी, मंदिरं, बंदी वगैरे गोष्टींच्या वल्गना करत सत्तेचा तख्त संभाळायची धडपड पहिल्या दिवसापासून सुरू असलेली लपून राहत नाही. त्यात माध्यमं अजून भर घालत असतात. एक समाज म्हणून ही आपली हार आहे, पराभव आहे, ही जाणीव माझं मन कुरतडून गेली.

-------

(लेखक अभियंता व ट्रेकर आहेत.)

संपर्क ः अभिजित कुपटे- ९९२३००५४८५

दत्ताभाऊ राक्षे- ९८५०९९१५१८

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com