Poultry : ब्रॉयलर पक्षी संगोपनातून अर्थकारणाला गती

येवदा (ता. दर्यापूर, अमरावती) येथील रवींद्र मामनकर यांनी शेतीला जोड म्हणून सुमारे २२ वर्षांपूर्वी एकहजार पक्ष्यांपासून ब्रॉयलर पक्षी उद्योग सुरू केला. त्यात सातत्य ठेवत तसेच बाजारपेठांची व्यवस्था करीत आज दहाहजार पक्ष्यांचे संगोपन करण्यापर्यंत मजल मारली आहे. त्याद्वारे शेतीला आर्थिक गती दिली आहे. सोबतच घरच्या २० एकर क्षेत्राला अतिरिक्त २० एकरांची जोड देण्यातही ते यशस्वी आहेत.
Poultry Farming
Poultry FarmingAgrowon

अमरावती जिल्ह्यात दर्यापूर-अकोट मार्गावर असलेल्या येवदा (ता. दर्यापूर) गावची लोकसंख्या १८ ते २० हजारांपर्यंत आहे. तालुक्यात लोकसंख्येच्या बाबतीत सर्वात मोठे हे गाव मानले जाते. स्वतंत्र ग्रामपंचायत असलेल्या या गावातील बहुतांशी लोकसंख्येच्या उपजीविकेचे साधन शेती (Agriculture) हेच आहे.

गावातील रवींद्र मामनकर यांची वडिलोपार्जित २० एकर शेती होती. त्यामध्ये पारंपरिक पिके (Traditional Crop Cultivation) घेण्यावर त्यांचा भर होता. मात्र कौटुंबिक अर्थकारण (Family Economy) त्यातून मजबूत होत नव्हते. त्यामुळे शेतीला पूरक व्यवसायाची जोड द्यावी असा विचार रवींद्र यांच्या मनात डोकावू लागला. पण व्यवसायात अपयश आले तर गुंतविलेल्या पैशांची भरपाई होईल की नाही अशी भीती त्यांना भेडसावत होती. परंतु मनाची तयारी करून त्यात उतरण्याचा निर्णय त्यांनी घेतला. बाजारपेठांचा अभ्यास करताना मांसल कोंबड्यांना (Broiler Poultry Farming) (ब्रॉयलर) या भागात मागणी असल्याचे लक्षात आले. त्या तुलनेत पोल्ट्री व्यवसायिकांची (Poultry) संख्यादेखील कमी होती. त्यामुळे हाच व्यवसाय करावा असे ठरविले. काही आप्तेष्ट व पोल्ट्री व्यावसायिकांशी संपर्क साधत व्यवसायाशी संबंधित बारकावे जाणून घेतले.

खारपाणपट्ट्यात केला विस्तार

सुरुवातीला ५० बाय २० फूट आकाराचे शेड उभारून एकहजार पक्ष्यांचे संगोपन सुरू केले. अकोट, अकोला, तेल्हारा येथील व्यापाऱ्यांना पक्ष्यांची विक्री करण्यावर भर होता. त्यातून पैसा जुळत गेला. मग उत्साहही वाढल्याने वडिलोपार्जित शेतीला आणखी क्षेत्र जोडण्यासाठी पुढाकार घेतला. आज शेती क्षेत्र ४० एकरांपर्यंत पोचले आहे. अमरावती, अकोला तसेच बुलडाणा जिल्ह्यात पूर्णा खोऱ्यातील खारपणपट्टा पसरला आहे. या भागातील जमिनीत पाणी मुबलक आहे. परंतु त्यात क्षार अधिक असल्याने त्याचा शेतीसाठी उपयोग होत नाही. त्यामुळे पोल्ट्रीसाठी पाण्याची सोय व्हावी यासाठी काय करावे असा प्रश्‍न रवींद्र यांच्यासमोर होता. त्यांची काही शेती शहानूर नदीलगत तर पोल्ट्री शेड त्या ठिकाणापासून दोन किलोमीटरवर आहे. याच नदीवरून पाइपलाइन करून सिंचनाचा प्रश्‍न सोडवला.

Poultry Farming
पोल्ट्री व्यवसाय झाला मुख्य आर्थिक कणा

व्यवसायाचा विस्तार

व्यवसायात जम बसू लागल्यानंतर विस्तार करण्यास सुरुवात केली. आज प्रत्येकी दोन हजार, तीन हजार व पाच हजार क्षमता अशी तीन शेड्‌स आहेत. त्या माध्यमातून दहा हजार संख्येपर्यंत ब्रॉयलर पक्ष्यांचे व्यवस्थापन करण्यात येते. अर्थात, उन्हाळ्यात तेवढी संख्या असली तरी पावसाळ्यात ती चार हजारांपर्यंत मर्यादित असते. बाजारपेठेचा अंदाज घेत त्यानुसार पक्ष्यांची मागणी नोंदविली जाते. अमरावती तसेच जबलपूर येथून एक दिवसाच्या पक्ष्यांची खरेदी होते. वीस ते चाळीस रुपयांचा दर हंगामनिहाय या पक्ष्यांसाठी राहतो. सध्या बाजारात चिकनला मागणी तुलनेने कमी असल्याने पक्ष्यांचे दर ७५ ते ८० रुपये प्रति किलोपर्यंत आहेत. त्यामुळे एक दिवसाच्या पक्ष्यांचे दरही त्यानुसार कमी झाले आहेत. दहा रुपये प्रति नग याप्रमाणे एकदिवसीय पक्ष्यांचा पुरवठा होत आहे. ज्या वेळी ब्रॉयलर पक्ष्यांना मागणी राहते आणि दरही तेजीत असतात अशावेळी चाळीस रुपये प्रति पक्षी या दराने कंपन्यांकडून पक्ष्यांचा पुरवठा होतो.

Poultry Farming
Poultry Industry: पोल्ट्री क्षेत्रात रोजगाराच्या संधी

व्यवसायाचा ताळेबंद

पक्ष्यांचे वजन उन्हाळ्यात ५० दिवसांमध्ये सुमारे २२ किलोपर्यंत होते. हिवाळा आणि पावसाळ्यात हेच वजन सुमारे ४० दिवसांत मिळते. परिणामी, उन्हाळ्यात पशुखाद्याची मात्रा अधिक द्यावी लागते. वर्षभरात चार ते पाच बॅचेस निघतात. उन्हाळ्यात प्रति किलो १२० ते १३० रुपयांपर्यंत दर मिळतो. अलीकडील वर्षांची परिस्थिती लक्षात घेतली तर किलोला ५० रुपयांपासून ते १३० रुपयांपर्यंत दर राहिले आहेत. पावसाळ्यात चिकनचे दर कमी होतात असा अनुभव आहे. सध्या स्थितीत पक्ष्यांची ८० रुपये प्रति किलोनुसार विक्री होत आहे. हा दर परवडणारा नसल्याने शेडमधील पक्ष्यांची संख्या कमी करण्यावर भर देण्यात आला आहे. त्यातच पशुखाद्याचे दरही वाढल्याने नुकसानही सोसावे लागते असे रवींद्र सांगतात. शिवाय श्रावण महिना तसेच अन्य सणांची पावसाळा हंगामात रेलचेल राहते. त्यामुळे बाजारात मागणी घटत असल्याचा दरवर्षीचा अनुभव आहे. वर्षाला सुमारे पाच ते सहा लाख रुपयांचे उत्पन्न होऊन खर्च वजा जाता एक ते सव्वा लाख रुपयांपर्यंत नफा मिळतो.

फीड मिलची उभारणी

बाहेरून पशुखाद्य आणण्यावरील खर्च कमी करण्यासाठी साडेचार लाख रुपये खर्च करून फीडमिलची उभारणी केली आहे. प्रति तासाला दोन टन अशी त्याची क्षमता आहे. मका, सोयाबीन चुरी तसेच औषधी घटक यांचे मिश्रण करून पशुखाद्य तयार केले जाते. सध्या कच्च्या मालाच्या दरात चांगली तेजी आहे. परिणामी, प्रति पक्षी उत्पादकता खर्चातही वाढ झाली आहे. तुलनेत नफ्यात घट झाल्याचे रवींद्र सांगतात.

शेती यांत्रिकीकरणावर भर

शेतीत मूग, कपाशी, हरभरा, सोयाबीन, उडीद आदी पिके घेण्यात येतात. श्रम आणि वेळेची बचत व्हावी यासाठी यांत्रिकीकरणावर भर दिला आहे. दोन ट्रॅक्टर्स, त्यावर आधारित काही तसेच

कपाशी लागवड यंत्रही आहे. ती भाडेतत्त्वावर देत त्यातूनही पूरक उत्पन्न मिळवले जाते.

रवींद्र मामनकर, ७७४१८४९७५५

अमरावती ठरले पोल्ट्री व्यवसायाचे ‘हब’

दळणवळणाच्या वाढत्या सुविधा मध्य प्रदेश व इतर राज्यांशी सुलभ ‘कनेक्टिव्हिटी’ यामुळे विदर्भात पोल्ट्री व्यवसायाचे हब म्हणून अमरावती जिल्हा नावारूपास आला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक प्रमाणात पोल्ट्री व्यावसायिक आहेत. लेयर (अंडी) व्यावसायिकाची संख्या सर्वाधिक असून, सद्यःस्थितीत दररोजचे अंडी उत्पादन ९ ते १० लाखांवर आहे अशी माहिती अमरावती पोल्ट्री असोसिएशनचे सचिव अतुल पेरसपुरे यांनी दिली. जिल्ह्यातील एकूण पोल्ट्री फार्मसची क्षमता ४२ लाख कोंबड्यांची आहे. त्या माध्यमातून सुमारे ४० ते ५० दिवसांच्या प्रति बॕचव्दारे ३० लाख ब्रॉयलर कोंबड्यांची विक्री होत असावी. पोल्ट्री व्यावसायिकांना पशुखाद्यावर मोठी गुंतवणूक करावी लागते. हंगामात ऐनवेळी त्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचे दर तेजीत येतात. त्यामुळे पशुखाद्यदेखील महागते. त्या पार्श्‍वभूमीवर अनेक पोल्ट्री व्यावसायिकांनी स्वतःचे पोल्ट्रीफीड कारखाने उभारले आहेत. त्यांची संख्या दोनशेपेक्षा अधिक आहे. दररोज काही क्विंटल पशुखाद्य लागत असल्याने किलोमागे दहा रुपयांपर्यंत मोठी बचत होते.

सध्याची स्थिती

सद्यःस्थितीत अंड्यांचे दर साडेतीन रुपये प्रति नग आहेत. उत्पादन खर्च साडेचार रुपयांपर्यंत जातो. ब्रॉयलर कोंबड्यांचा उत्पादन खर्चही १८० रुपये (प्रति दोन किलोसाठी) असून, सध्या घाऊक विक्री दर अवघा ४५ रुपये किलो आहे. बाजारात चिकनची विक्री मात्र २४० रुपये प्रति किलो प्रमाणे होत आहे. सध्या मागणीच्या तुलनेत पुरवठा अधिक असल्याने ब्रॉयलर पक्षी बाजार गडगडला आहे. सण- उत्सव, श्रावण या पार्श्‍वभूमीवर मांसाहारी पदार्थांच्या मागणीत घट होते. त्याचा फटका या उद्योगाला बसतो. मागणी वाढल्यानंतर मात्र दर तेजीत येतात असे पोल्ट्री व्यावसायिक शुभम महल्ले यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com