Animal Care : जनांवरातील जंतबाधेचे दुष्परिणाम अन उपाययोजना

जंताच्या प्रादुर्भावामुळे बाधित जनावरांच्या पोटात अन्न पचनानंतर तयार होणारे अन्नघटक कमी होतात. आतडीमधील गोल कृमींमुळे आतड्याला इजा पोहोचते. तीव्र पोटदुखी दिसून येते.
Animal Care
Animal CareAgrowon

डॉ. पी. डी. पवार,

डॉ. व्ही. एस. धायगुडे

----------

जंताच्या प्रादुर्भावामुळे (Worm Infection) बाधित जनावरांच्या पोटात अन्न पचनानंतर तयार होणारे अन्नघटक कमी होतात. आतडीमधील गोल कृमींमुळे (Worm) आतड्याला इजा पोहोचते. तीव्र पोटदुखी दिसून येते. काही प्रकारचे जंत उदाहरणार्थ गोलकृमी दररोज जनावरांचे रक्त शोषतात. गंभीर रक्तक्षय (Anemia) निर्माण होतो. यकृतामधील पर्णकृमी जंत यकृत पेशींचे भक्षण करून यकृतास मोठ्या प्रमाणात हानी पोचवतात. दुधाळ जनावरांच्यामध्ये (Milch Animal) जंत झाल्यामुळे २० ते ३० टक्के उत्पादन कमी होते. मांस आणि लोकर उत्पादन करणाऱ्या जनावरांमध्ये उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. (Worm Infection In Animal)

आतड्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढणाऱ्या जंतामुळे अन्न तुंबून राहते, अजीर्ण होते, अन्नाचे पचन होत नाही. जंत संसर्ग झाल्याने रक्तामधील महत्त्वाच्या रक्त घटकांचे प्रमाण कमी होत जाऊन जनावरांमध्ये अंतर्गत तीव्र स्वरूपाचा रक्तस्राव देखील होतो. विशेषतः लहान जनावरांमध्ये अशक्तपणा, रक्तक्षय दिसून येतो. जनावरांच्या पचन संस्थेमधील एकूण चयापचयाचे कार्य बिघडते. त्यांची भूक मंदावते. उत्सर्जनात जंतांच्या शरीरातून बाहेर पडणाऱ्या विषारी पदार्थांद्वारे जनावरांच्या शरीरामध्ये विषबाधा बघायला मिळते.

आतड्यातील जंतामुळे तसेच एक पेशीय आदीजीवी यासारख्या जंतामुळे रक्त हगवण लागते.

जंत असल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती मोठ्या प्रमाणात कमी होते, त्यामुळे असे जनावर इतर आजारांना लवकर आणि सहज बळी पडतात. अशा जनावरांचे लसीकरण करून देखील संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव अशा जनावरांमध्ये मोठ्या प्रमाणावर होतो. त्यामुळे परिणामकारक लसीकरण होत नाही.

जनावरांची भूक मंदावते. आतडीमधील आवरणास झालेल्या जखमांमुळे जनावरांना रक्तमिश्रित अतिसार होतो.

कृमींमुळे आतड्याला आरपार छिद्र पडलेले दिसते. यामुळे गंभीर पोटशूळ होतो. शरीरामधील प्रथिने, रक्तशर्करा, क्षार व इतर अत्यावश्यक सूक्ष्म घटकांचे प्रमाण कमी होत जाते.

गाई-म्हशींच्या दूध उत्पादनात आणि बैलांच्या कार्यक्षमतेमध्ये देखील लक्षणीय घट होते. शेळ्या-मेंढ्यांची कोकरे तसेच वासरांची रोगप्रतिकार क्षमता कमी होते, रक्तक्षय होत जातो, जनावरांची वाढ खुंटते व तीव्र रक्तक्षय झाल्यामुळे लहान करडे व वासरे मृत्युमुखी देखील पडतात.

कालवडीमध्ये जंतांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असेल तर कालवडी योग्य वयात येऊनही माजावर येत नाहीत. मोठी जनावरे वारंवार रेतन करून देखील गाभण राहत नाहीत. जंतांच्या प्रादुर्भावामुळे गाई, म्हशींमधील प्रजननक्षमता कमी होते. माजावर वेळेवर न येणे, गर्भधारणा न होणे, तसेच वारंवार उलटणे यांसारख्या समस्या आढळून येतात.

प्रतिबंधात्मक उपाय

जनावरांच्या विविध नमुन्यांची वेळोवेळी व नियमित तपासणी करून घ्यावी. जंतांचा प्रकार समजल्यानंतर प्रतिबंधात्मक उपायांसाठी उपयुक्त व प्रभावी कृमिनाशक निवडणे आणि व्यवस्थापन करणे सोपे आणि सुलभ होते.

अशक्त आणि बाधित जनावरे इतर निरोगी जनावरांपासून वेगळी ठेवावीत. चांगली प्रतिकारशक्ती असणाऱ्या जनावरांमध्ये कृमींचा प्रादुर्भाव आपोआप कमी होताना आढळतो. त्यांच्यावर कोणताही तणाव नसावा.

पाऊस थंडी व वातावरणातील अचानक होणारे बदल यापासून रक्षण करावे. जनावरांच्या आहारामध्ये प्रथिने, कर्बोदके, सूक्ष्म खनिजे, जीवनसत्वे यांचा योग्य प्रमाणामध्ये वापर करून जनावरांना रोज संतुलित आहार व स्वच्छ व मुबलक पाणी द्यावे. त्यामुळे जनावरांचे आरोग्य निरोगी व तंदुरुस्त राहण्यास मदत होते.

गोठा नेहमी स्वच्छ, कोरडा व हवेशीर ठेवावा. वेळोवेळी योग्य औषधांचा वापर करून निर्जंतुकीकरण करावे. जंतांचा प्रसार मध्यस्ती जीव, कीटक यांच्यामार्फत होत असल्याने त्यांचा प्रसार नियंत्रणात ठेवावा.

आपल्या गोठ्यातील / विभागातील सर्व जनावरांची जंत निर्मूलन मोहीम एकाच वेळी राबवावी. यामुळे पुन्हा नव्याने होणाऱ्या जंत बाधेला थांबवता येऊ शकते. आजाराची लक्षणे दिसताच पशुवैद्यकाकडून सल्ला घेऊन रक्त, लघवी व शेण यांची प्रयोगशाळेमध्ये तपासणी करून आजाराचे निदान करावे.

कृमींचा प्रकार, संख्या व जनावरांचे संतुलित आहार आणि व्यवस्थापन यावरच जंत बाधेचे दुष्परिणाम अवलंबून असतात. ज्या जनावरांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असते, त्या जनावरांमध्ये कृमीची वाढ प्रमाणाबाहेर होत नाही.

योग्य त्या अंतराने वेळोवेळी पशुवैद्यकाच्या सल्ल्याने जंतनाशकाचा कटाक्षाने वापर करावा, जेणेकरून परजीवींमुळे पशुपालकाचे होणारे आर्थिक नुकसान टाळता येऊ शकते.

--------------

- डॉ. पी. डी. पवार, ८८७२५३७२५६, (क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com