नागपूर येथे पशुंचे सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल उभारणार ः सुनील केदार

‘माफसू’चे शास्त्रज्ञ, प्राध्यापक आणि पशुवैद्यकांच्या बैठकीत घोषणा
नागपूर येथे पशुंचे सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल उभारणार ः सुनील केदार
Sunil KedarAgrowon

नागपूर : खासगी व शासकीय पशुवैद्यक यांना एकत्रित करून मुक्या जनावरांची अद्ययावत शुश्रूषा नागपूर शहरात लवकरच सुरू होणार आहे. राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये अद्ययावत पशुवैद्यकीय सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल (Animal Superspeciality Hospital) सुरू करण्याची घोषणा पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, युवक कल्‍याण व क्रीडामंत्री सुनील केदार (Sunil Kedar) यांनी केली.

विदर्भातील पशुधनाला जागतिक दर्जाच्या वैद्यकीय सुविधा मिळाव्यात. उपलब्ध असणाऱ्या पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या दवाखान्याचे अद्यावतीकरण करण्यात यावे. खासगी व शासकीय पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या मनुष्यबळाची जुळवाजुळव करून उच्च प्रतीच्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने आवश्यक सर्व प्रस्ताव देण्याचे निर्देश त्यांनी दिले. नागपुरातील मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या व्हेटर्नरी क्लिनिक कॉम्प्लेक्स येथे यासाठी शास्त्रज्ञ, प्राध्यापक, पशुवैद्यक यांचे विचारमंथन आयोजित करण्यात आले होते.

महाराष्ट्र पशू विज्ञान मत्स्य विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आशिष पातुरकर, सर्व शास्त्रज्ञ, प्राध्यापक, पशुवैद्यक व खासगी स्तरावर पशुवैद्यक सेवा देणारे शहरातील नामवंत डॉक्टर यावेळी उपस्थित होते. सहआयुक्त शीतलकुमार मुकणे यांनी पुणे येथील प्रस्तावित हॉस्पिटलचे प्रेझेंटेशन केले. उपराजधानीमध्ये मुंबई-पुणे याप्रमाणे अद्ययावत पशुवैद्यकीय सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यासाठीचे प्रस्ताव देण्याबाबत सर्व तज्ज्ञ मंडळींना सुचविण्यात आले. यावेळी मनुष्यबळाचा प्रश्न उपस्थित झाला. यासाठी शहरांमध्ये असणाऱ्या तज्ज्ञ डॉक्टरांसोबत समन्वय साधण्याचे निर्देश केदार यांनी दिले.

अद्ययावत शासकीय यंत्रणा आपल्याकडे आहे, या अद्ययावत यंत्रणेचा व उपचार पद्धतीचा लाभ मुक्या जनावरांना झाला पाहिजे. शेतकऱ्यांकडे असणाऱ्या गोधनाला सुदृढ ठेवणे, त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे, त्यांना नव्या तंत्रज्ञानाची जोड देणे हे काम या ठिकाणावरून झाले पाहिजे. यासाठी खासगी-शासकीय असा भेदाभेद न ठेवता समन्वय साधून यातून तोडगा काढण्याचे निर्देश त्यांनी दिले.पशू आरोग्याचा विचार करताना दीर्घकालीन उपाययोजना आपल्याला करावी लागेल. त्यामुळे अशी एक अद्ययावत यंत्रणा विदर्भामध्ये उभी राहणे आवश्यक आहे. महाराष्ट्र पशू विज्ञान मत्स्य विद्यापीठ यांनी यासाठी पुढाकार घ्यावा. आपले तंत्रज्ञान, आपले संशोधन तसेच याबाबतचा अभ्यास एकत्रित करून योग्य प्रस्ताव द्यावा, असे निर्देशही त्यांनी दिले.

या बैठकीत गेल्या काही वर्षात महत्त्वाच्या प्रजातींच्या जनावरांमध्ये दुधाची क्षमता कमी होण्याबाबतही चिंता त्यांनी व्यक्त केली. ही क्षमता कमी होण्यासाठी कोणते घटक कारणीभूत आहेत, याचा अभ्यास करण्याचे आवाहन त्यांनी केले. कृत्रिम रेतन करताना योग्य प्रजातींना चालना मिळेल, या संदर्भातील संशोधन याबाबतही त्यांनी विचारणा केली. दमस्कस शेळी करिता पुढील पिढीसाठी बोकडांची व्यवस्था कशा प्रकारे करायची या विषयावर यावेळी चर्चा झाली. या बैठकीला पशुसंवर्धन विभागाचे सहआयुक्त डॉ. शीतलकुमार मुकणे, प्रादेशिक पशुसंवर्धन डॉ. बी. आर. रामटेके, डॉ अनिल कुरकुरे, डॉ.आखरे, डॉ. गावंडे, डॉ महल्ले, डॉ युवराज केने उपस्थित होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com