Animal Care
Animal CareAgrowon

पशु उपचार महागले

शासकीय पशुवैद्यकांमार्फत खासगीत दिली जाते सेवा

नागपूर : इंधन दरात वाढ झाल्याचा हवाला देत घरपोच देण्यात येणाऱ्या पशुवैद्यकीय सेवा (Veterinary Service) शुल्कातही वाढ (Animal Treatment) करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्या संदर्भातील शासन आदेश निर्गमित करण्यात आला असून, आधीच पशुखाद्याच्या (Animal Feed) दरातील तेजीमुळे अडचणीत असलेल्या पोल्ट्री व्यावसायिकांना (Poultry Industry) या निर्णयाचा सर्वाधीक फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


शेतीपूरक व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी शासन स्तरावर जागृती केली जात आहे. त्याच्याच परिणामी शेतकरी दुग्ध व्यवसाय कुक्कुटपालन सारख्या व्यवसायाकडे मोठ्या प्रमाणावर वळले आहेत. दरम्यान राज्यात शासकीय पशुवैद्यकीय सेवा देणाऱ्या वैद्यकांना कार्यालयीन वेळेपूर्वी, लंच ब्रेकमध्ये तसेच कार्यालयीन कामकाज संपल्यानंतर खासगी सशुल्क सेवा देण्याची मुभा आहे. त्याकरिता सशुल्क सेवांचे दरही शासनस्तरावरून निश्चित केले जातात. २०१८ मध्ये अशा प्रकारचे दर निर्धारित करण्यात आले होते. त्यानंतर आता पेट्रोल, डिझेलच्या दरात सातत्याने होत असलेल्या वाढीच्या पार्श्‍वभूमीवर या दरात वाढीची मागणी पशुवैद्यकांकडून होती. त्याची दखल घेत शासनाने हे दर वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

कोंबड्यांच्या लसीकरणासाठी पूर्वी प्रतिपक्षी दहा पैसे आकारले जात होते. आता लसीकरणाच्या दरात वाढ करत थेट एक रुपया करण्यात आला आहे. पोल्ट्री व्यावसायिकांकडे असलेल्या पक्ष्यांची संख्या ही लाखाच्या घरात राहते. त्यामुळे लसीकरणावर त्यांचा आता मोठा खर्च होणार आहे. परिणामी पशुखाद्याच्या दरातील तेजीमुळे आधीच अडचणीत आलेल्या पोल्ट्री व्यावसायिकांसमोर या दरवाढीमुळे नवी समस्या उभी राहणार असल्याचे सांगितले जाते. तर दुसरीकडे शासकीय पशुवैद्यकांसोबतच खासगी सेवा देणारे डिप्लोमाधारक पशुवैद्यक आहेत. त्यांच्याकडून पोल्ट्री लसीकरणासाठी प्रती पक्षी सध्या पंधरा पैसे आकारले जातात. अशाच खासगी सेवादारांकडून मोठे पोल्ट्री व्यावसायिक लसीकरण करून घेतात. त्यामुळे या दरवाढीचा मोठ्या पोल्ट्री व्यावसायिकांवर विशेष परिणाम होणार नाही असा दावा केला जात आहे. अंजनगाव बारी (अमरावती) येथील मातोश्री पोल्ट्रीचे संचालक रवींद्र मेटकर यांनी देखील यास दुजोरा दिला आहे.

सेवा--पूर्वीचे दर--आताचे दर (रुपयांत)
उपचार--१--१०
कृत्रिम रेतन--४१--५०
गर्भधारणा तपासणी--३--१०
औषध उपचार किंवा शल्यचिकित्सा--७५--१५०
औषध उपचार किंवा शल्यचिकित्सा नगरपालिका-ग्रामपंचायत हद्दीबाहेर--१५० --२५०
रात्रीच्या वेळी सेवा द्यायची असल्यास-- अतिरिक्त ७५-- अतिरिक्त १००.
जनन प्रक्रियेत बाधा आल्यास-- अतिरिक्त ७५-- अतिरिक्त १००.

आरोग्य दाखले देण्यासाठी
गाई-म्हशी--१००--१५०
घोडे--१५०--२००

रासायनिक पृथक्करण न करता शवविच्छेदन
मोठी जनावरे--१००--१५०
छोटी जनावरे--७५--१००
लसीकरण--१० पैसै--१ रुपया

खासगी पोल्ट्री व्यावसायिकांनी पशुवैद्यक सेवांकरिता स्वतःची यंत्रणा उभी केली आहे. शासकीय पशुवैद्यक हे छोट्या प्रमाणात असलेल्या गाव खेड्यातील परस बागेतील कुक्कुटपालकांकडे सेवा देतात. आता दहा पैसे चलनातून हद्दपार झाले आहेत. त्यामुळे राउंड फिगर रक्कम असावी या हेतूने एक रुपया करण्यात आला आहे. त्यामुळे फारसा खर्च वाढेल असे वाटत नाही. सोबतच केसपेपर करितापूर्वी एक रुपया आकारला जात होता ते शुल्क माफ करण्यात आले आहे.
डॉ. रामदास गाडे,अध्यक्ष, महाराष्ट्र राजपत्रित पशुवैद्यकीय संघटना
सध्या राज्यात पशूंची संख्या कमी होत असताना पशुपालनाला प्रोत्साहन देण्यासाठी दर नियंत्रित ठेवणे गरजेचे होते. परिणामी, ही दरवाढ पशुपालकांसाठी अन्यायकारक आहे.
रवीकिरण पाटील,पशुपालक, अमरावती

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com