Animal Care : जनावरांमध्ये आहे स्वतःची उपचार पद्धती

अपचन, पोटाचे विकार, जंतुसंसर्ग, विषारी पदार्थ बाहेर टाकणे या गोष्टींसाठी प्राणी स्वतः उपचार करताना आपणास आढळतात. यामध्ये प्राणी काही ठराविक वनस्पतीच्या पानांचे सेवन करणे, मुंग्या खाणे, लिंबूवर्गीय फळे खाणे, माती खाणे, काही वनस्पतींना अंग घासतात. प्राण्यांच्या या वृत्तीकडे आपण लक्ष दिल्यास काही नवीन औषधांचा शोध सुद्धा लागू शकतो.
Animal Care
Animal CareAgrowon

डॉ. बाबासाहेब घुमरे, डॉ. विकास कारंडे

निसर्गाकडून जनावरांना अशी काही शक्ती अवगत असते, की त्यामुळे आजारांवर निसर्गात (Natural Treatment) उपलब्ध असणाऱ्या गोष्टींपासून ते उपचार करून घेतात. बऱ्याच वेळा आपल्या आसपास असणारा कुत्रा (Dog Eating Grass) गवत खाताना दिसतो आणि ते गवत खाल्ल्यानंतर तो कुत्रा उलटी करतो. अशावेळी आपण म्हणतो, की त्या कुत्र्याने गवत खाल्ल्यामुळे त्याला उलटी झाली.

पण त्याने गवत का खाल्ले असावे? याचा शोध घ्यायचा झाला तर कुत्र्याच्या पोटामध्ये काही तरी अपचनीय किंवा विषारी खाद्यपदार्थ खाल्ला गेला असल्यास कुत्रा गवत खाऊन उलटी करतो आणि पोटातील घाण बाहेर काढत असतो. निसर्गामध्ये काही आजारावर प्राणी स्वतःचे उपचार स्वतःवर करतात. यालाच इंग्रजीमध्ये झूफार्माकोग्नोसी असे संबोधतात.

Animal Care
Animal Care : वाढवा जनावरांची रोगप्रतिकारशक्ती...

प्राणी काही समस्या, जसे की परजीवी कीटकांचा त्रास, अपचन, पोटाचे विकार, जंतुसंसर्ग, विषारी पदार्थ बाहेर टाकणे या गोष्टींसाठी प्राणी स्वतः उपचार करताना आपणास आढळतात. यामध्ये प्राणी काही ठरावीक वनस्पतीच्या पानांचे सेवन करणे, मुंग्या खाणे, लिंबूवर्गीय फळे खाणे, माती खाणे, काही वनस्पतींना अंग घासतात.

प्राण्यांच्या या वृत्तीकडे आपण लक्ष दिल्यास काही नवीन औषधांचा शोधसुद्धा लागू शकतो. बरेचशे प्राणी वनस्पतींच्या पचनानंतर जी रसायने तयार होतात त्याचा उपयोग प्रतिजैविके, उत्तेजन, किंवा प्रतिविष म्हणून करताना आढळतात. काही वेळा हे उपाय प्रतिबंधात्मक (रोग होऊ नये म्हणून) किंवा उपचारार्थ (बरे होण्यासाठी) प्राण्यांकडून अवलंबिले जातात.

Animal Care
Animal Care : लक्षणांवरून ओळखा जनावरांतील रेबीज

प्राण्यांमध्ये अवलंबल्या जाणाऱ्या स्वयं उपचारांच्या पद्धती ः

परजीवीनाशक वनस्पतींचे सेवन :

- काही प्राणी स्वतःचा परजीवीपासून बचाव करण्यासाठी काही ठरावीक वनस्पतींचे सेवन करतात. परजीवी म्हणजेच पोटातील कृमी किंवा जनावरांच्या अंगावर पोसले जाणारे गोचीड किंवा इतर कीटकवर्गीय जीव.

- परजीवी जनावरांचे रक्त शोषून त्यांना अशक्त बनवतात. जनावरांमध्ये आजार निर्माण करतात. त्यामुळे अशा परजीवींपासून वाचवण्यासाठी काही वनस्पती जनावरांना उपयोगी पडतात.

- आफ्रिकन माकडे काही वनस्पतींचे सेवन करतात आणि स्वतःचा परजीवीपासून बचाव करतात. चिंपाझीमध्ये सुद्धा नैसर्गिकरीत्या खूप मोठ्या प्रमाणात कृमींचा प्रादुर्भाव दिसतो. चिंपाझी काही कडवट चवीच्या वनस्पतींचे नियमित सेवन करताना आढळतात.

- बबून जातीची माकडे बॅलॅटिस अजिप्टिया या वनस्पतीची फळे व पाने खाऊन परजीवी नियंत्रण करताना आढळतात. या वनस्पतीमध्ये इथेनॉल आणि इतर द्रव्य असतात, जी सूक्ष्म जिवाणू विरोधात कार्य करतात.

- कुत्रा, मांजर गवत खाऊन उलटी काढतात.

- आफ्रिकेमधील चाकमा बबून जातीची माकडे धोतरावर्गीय वनस्पतींची पाने थोड्या प्रमाणात नेहमीच चघळतात की जी उत्तेजक आहेत. आपल्या औषध शास्त्रात त्यांच्यापासून बरीच औषधे बनविली जातात.

- काही प्राणी एक विशिष्ट फिनोलिक जिवाणूंचा वापर कठीण पदार्थ पचवण्यासाठी करतात.

प्रजनन क्षमता वाढविण्यासाठीचे उपचार ः

- ब्राझीलमध्ये आढळणारी मुरिकी नावाची मादी माकडे ब्राझीलियन ट्री, कायकयेरा तसेच मंकीज ईयर ट्री झाडांची पाने आणि फळे वयात आल्यावर खाताना दिसतात. या झाडांमध्ये इस्ट्रोजन सारखी संप्रेरक असतात आणि ती यशस्वी गर्भधारणा होण्याची शक्यता वाढवतात.

- आफ्रिकन हत्ती विण्याच्या काही वेळ अगोदर जवळ जवळ १७ मैल चालतात आणि काही ठरावीक वनस्पतींचे सेवन करतात. त्यानंतर अगदी चार ते पाच दिवसांतच त्या एका सुदृढ आणि सशक्त पिलाला जन्म देतात.

प्रतिविष निर्मिती क्षमता :

- आपण बऱ्याच वेळा मुंगूस आणि सापामधील युद्ध पाहतो, पण मग सापाच्या विषाचा मुंगसावर काय परिणाम होत असेल? ब्राझीलमधील परंपरागत औषधोपचारात गुंतलेल्या जमातीमधील काही अनुभवी लोक असे माहिती देतात, की पाल वर्गातील काही प्राणी विषारी सापांना त्यांच्या विषाचा परिणाम न होऊ देता मारू शकतात. कारण या पालवर्गीय प्राण्यांची काही वनस्पती खाण्याची सवय त्यांना सापाच्या तीव्र विषापासून वाचवू शकते.

जनावरांमधील त्वचाविकार :

- बरेच पाळीव तसेच जंगली जनावरे कुठल्यातरी खडबडीत पदार्थावर, भिंतींवर आपले अंग घासताना दिसतात असे का होत असावे? अनेकदा जनावरांच्या अंगावरील केसांमध्ये परजीवी असतात. हे परजीवी अनेकदा खाज निर्माण करतात. त्यामुळे जनावरे आपली कातडी एखाद्या पृष्ठभागाला घासताना आढळतात.

- कॅपचीन आणि इतर काही जातीची माकडे सतत आपले अंग लिंबाच्या झाडाला, पानांना किंवा लिंबूवर्गीय झाडांना घासतात, त्यामुळे कीटक वर्गीय परजीवींचा त्रास कमी होतो.

- बरीचशे पक्षी आपल्या घरट्यामध्ये झाडांची ताजी पाने आणून ठेवतात त्यामुळे अनेक प्रकारचे किडे, मुंग्या तसेच सूक्ष्म जिवाणूपासून घरट्यांचे संरक्षण होते.

विशिष्ट प्रकारची माती खाणे :

- लाल व हिरव्या रंगाचे पोपटवर्गीय पक्षी अनेकदा नदीकाठची माती खाताना आढळतात. कारण अशा मातीमध्ये सोडिअमचे प्रमाण जास्त असते. त्यांच्यामध्ये कोबालामीन (B१२) जीवनसत्त्व सुद्धा असते त्यामुळे शरीरात गेलेले विषारी पदार्थ दूर करण्यास मदत होते.

- अस्वले ठराविक माती जी पोटॅशिअम, सल्फर आणि मॅग्नेशिअम या घटकांनीयुक्त माती खाताना आढळतात. यामुळे त्यांचे पोटाचे विकार बरे होण्यास मदत होते.

- टांझानिया मधील झिंझीबर बेटावर आढळणाऱ्या माकडांचे वैशिष्ट म्हणजे ते काही विषारी झाडांची पाने खातात आणि ते विष नष्ट करण्यासाठी कोळसा किंवा लाकडाची राख खाताना दिसतात. बऱ्याच पक्षांमध्ये ज्यावेळी परजीवींचा त्रास वाढतो त्या वेळी ते मुंग्यांच्या ठिकाणी जातात आणि मुंग्या चावून घेतात. मुंग्यांच्या चाव्यामध्ये फॉरमिक ॲसिड असते जे उत्तम कीटकनाशक म्हणून कार्य करते.

- लाकडावर वाढणाऱ्या मुंग्या वनस्पतींमधील रेझीन आपल्या घरट्यात ठेवतात. मुळे इतर जिवाणूंची वाढ रोखली जाते.

संपर्क

- डॉ. बाबासाहेब घुमरे, ९४२१९८४६८१

- डॉ. विकास कारंडे, ९४२००८०३२३

(पशुवैद्यकीय औषधशास्त्र व विषशास्त्र विभाग, क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com