Animal Care:अकोला जिल्ह्यात जनावरांमध्ये ‘लम्पी’चा प्रादुर्भाव वाढताच

या रोगाचा प्रसार (lumpy skin disease) अन्य जनावरांमध्ये जिल्ह्यातील इतर ठिकाणी होण्याची शक्यता लक्षात घेऊन संक्रमण व सांसर्गिक रोगप्रतिबंधक व नियंत्रण अधिनियमानुसार संसर्गकेंद्रापासून १० किलोमीटर बाधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहे.
Animal Care
Animal CareAgrowon

अकोलाः जिल्ह्यात जनावरांमध्ये ‘लम्पी (lumpy skin disease) हा चर्मरोग आढळून येत असून, दररोज संख्या वाढत आहे. संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव वाढल्याने जिल्हा पशुसंवर्धन (Animal husbandry) यंत्रणा सज्ज झाली असून पशुपालकांना सजग राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या आजारासंबंधी माहिती देण्यासाठी १९६२ हा टोल फ्री क्रमांकही जारी करण्यात आला आहे. यावर पशुपालकांनी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. जगदीश बुकतरे यांनी केले आहे.

जिल्ह्यात मौजे निपाणा (ता. अकोला), तसेच अकोट व तेल्हारा तालुक्यात जनावरांमध्ये या आजाराचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आले आहे. जिल्ह्यात सद्यःस्थितीत १०९ जनावरांना या आजाराची लागण झाली असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले असून, त्वचेचे खरड व रक्त नमुने पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

दरम्यान, निपाणा येथील एका जनावरामध्ये ‘लम्पी’ या आजाराचा प्रादुर्भाव झाल्याचे अहवाल तपासणीनंतर सकारात्मक आला आहे. या रोगाचा प्रसार अन्य जनावरांमध्ये जिल्ह्यातील इतर ठिकाणी होण्याची शक्यता लक्षात घेऊन संक्रमण व सांसर्गिक रोगप्रतिबंधक व नियंत्रण अधिनियमानुसार संसर्गकेंद्रापासून १० किलोमीटर बाधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहे.

पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या क्षेत्र भेटी

पशु वैद्यकीय अधिकारी ग्रामीण भागात क्षेत्रभेटी देत आहेत व जनावरांची पाहणी, तपासणी करून पशुपालकांमध्ये जनजागृती करीत आहेत. जिल्हा पशुसंवर्धन (Animal husbandry) उपायुक्त डॉ. बुकतरे यांनी शिवापूर (ता. अकोट) येथे भेट देत जनावरांची पाहणी व तपासणी केली. दरम्यान शासनाच्या निर्देशानुसार, जिल्ह्यात बाधित जनावरे आढळलेल्या ठिकाणापासून पाच किलोमीटर परिघाच्या क्षेत्रात गोट पॉक्स लसीकरण सुरू करण्यात आले आहे.

‘पशुपालकांनी घाबरू नये’

या आजाराने जनावरे दगावण्याचे प्रमाण हे १ ते ५ टक्के इतके आहे. त्यामुळे पशुपालकांनी घाबरू नये. हा आजार बाह्य कीटकांद्वारे पसरत असल्याने गोठ्यांमध्ये व बाधित जनावरांवर योग्य त्या प्रमाणात औषध फवारणी करावी. बाधित जनावराला अन्य जनावरांपासून वेगळे ठेवावे. बाधित जनावरांच्या गोठ्यामध्ये सोडियम हायपोक्लोराइड २ टक्के या औषधाची फवारणी करावी, असे प्रशासनाने आवाहन केले आहे.

‘लम्पी’ची अशी आहेत लक्षणे...

१) लम्पी हा कातडीशी संबंधित आजार बाह्य कीटकांद्वारे पसरतो.

२) संसर्ग झाल्यास जनावरांना मध्यम स्वरूपाचा ताप २ ते ३ दिवस असतो.

३) काही वेळा १०५ ते १०६ फॅरेनहॅट इतकाही ताप असू शकतो.

४) ताप येऊन गेल्यानंतर शरीरावर २ ते ५ सेंटिमीटर आकाराच्या गाठी येतात.

५) तोंडात, घशात व श्‍वसन नलिकेत पूरळ येतात.

६) तोंडातील पुरळामुळे जनावराची लाळ गळत राहते.

७) जनावरात अशक्तपणा, भूक कमी होणे अशी लक्षणे दिसून येतात.

अशी लक्षणे दिसून आल्यास पशुपालकांनी जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क करावा व तत्काळ जनावरास उपचार द्यावे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com