वर्षभर हिरव्या चाऱ्यासाठी : बायफ संकरित नेपियर-११

बायफ संकरित नेपियर-११ ही जात बहुवार्षिक असून, जास्त चारा उत्पादन देणारी आहे. या जातीची पाने रुंद, कुसविरहित, मऊ, रसाळ, जाड रसदार व भरपूर पालेदार ताटे असतात. याची लागवड नोव्हेंबर ते जानेवारी हा थंडीचा कालावधी सोडून वर्षभर केव्हाही करता येते.
Green Fodder
Green FodderAgrowon

प्रमोदकुमार ताकवले, राहुल काळे, सागर जडे

हिरव्या चाऱ्याच्या (Green Fodder) उपलब्धतेची तूट भरून काढण्यासाठी जास्त उत्पादन (Fodder Production) देणाऱ्या, पौष्टिक तसेच बहुकापणी (Multi Harvesting) आणि बहुवार्षिक चाऱ्याच्या जातींची लागवड (Throughout Year Cultivation Of Fodder Verity) फायदेशीर ठरते. बायफ डेव्हलपमेंट रिसर्च फाउंडेशनमधील (BIAF Development Research Foundation) कृषी तज्ज्ञांनी बाजरी आणि हत्ती गवत (Elephant Grass) यांच्या संकरापासून बायफ संकरित नेपियर-११ (बी.एन.एच.११) या संकरित नेपियर गवताची जात (Napier Grass Verity) विकसित केली आहे.

Green Fodder
पशुखाद्य तयार करण्यासाठी फॅमिली फीड मिलर

१) बायफ संकरित नेपियर-११ गवताच्या वाढीसाठी २०० ते ४५ अंश सेल्सिअस तापमान उत्तम आहे. २० अंश सेल्सिअसच्या पुढे जसजसे तापमान वाढत जाईल तसतसे पीक जोमाने वाढते आणि २० अंश सेल्सिअसच्या खाली तापमान गेल्यास वाढ थोडी मंदावते. उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात वाढ जलद आणि जोमदार होऊन हिरव्या चाऱ्याचे उत्पादनही जास्त मिळते.

२) या जातीसाठी मध्यम ते भारी, कसदार जमीन जास्त मानवते. हलक्या जमिनीमध्ये खत आणि पाण्याची मात्रा योग्य ठेवून या जातीची वाढ करू शकतो. हे पीक जमिनीत ३ ते ४ वर्षांपर्यंत राहत असल्यामुळे लागवडीपूर्वी जमिनीची चांगली मशागत करावी. जमिनीची खोल नांगरट करून, ढेकळे फोडून कुळवाची पाळी द्यावी. तसेच शेतातील काडी-कचरा व धसकटे वेचून घ्यावीत. हेक्टरी १० टन चांगले कुजलेले शेणखत पसरवून झाल्यावर एक कुळवाची पाळी द्यावी. त्यानंतर ३ फूट अंतरावर सऱ्या पाडून शेताच्या उतारानुसार ३० ते ५० फूट अंतरावर पाण्याचे पाट पाडावेत. ३ ते ४ सऱ्यांचा वाफा तयार करावा म्हणजे पिकास पाणी व्यवस्थित बसेल.

३) बेणे लागवडीच्या वेळी हेक्टरी ७५ किलो नत्र, ५० किलो स्फुरद आणि ४० किलो पालाश द्यावे. प्रत्येक कापणीनंतर पिकास हेक्टरी ४० किलो नत्राची मात्रा द्यावी.

Green Fodder
Cotton : ‘माफसू’ने विकसित केले पऱ्हाटीपासून पोषक पशुखाद्य निर्मितीचे तंत्र

४) लागवड ठोंबांपासून तसेच एक किंवा दोन डोळ्यांच्या कांड्यापासून करता येते. लागवडीच्या वेळी सरीच्या बगलेत एका बाजूला वर नमूद केलेली रासायनिक खते एकत्र मिसळून रांगोळी सारखी टाकावीत आणि कोरड्या सरीच्या बगलेत खताच्या रांगोळीच्या वरती (२ ते ३ इंच) दर २ फूट अंतराने एकेक ठोंब उभे गाडावेत किंवा कांड्या असल्यास त्या जमिनीत २ ते ३ इंच आडव्या लावाव्यात. अशा पद्धतीने लागवड केल्यास हेक्टरी २०,००० ठोंब किंवा कांड्या लागतात. लागवड झाल्यावर लगेच पाणी द्यावे. दुसरे पाणी ६ ते ८ दिवसांनी द्यावे.

५) या पिकाची लागवड नोव्हेंबर ते जानेवारी हा थंडीचा कालावधी सोडून वर्षभर केव्हाही करता येते. हंगामाप्रमाणे पावसाळ्यात पाऊस नसताना दर १२ ते १५ दिवसांनी, हिवाळ्यात दर १५ ते २० दिवसांनी आणि उन्हाळ्यात दर ७ ते १० दिवसांनी पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. वाढीच्या टप्यात पीक तणरहित ठेवावे. या जातीमध्ये रोग, किडींचा प्रादुर्भाव आढळत नाही.

६) लागवडीनंतर ६० ते ७० दिवसांनी पहिली कापणी करावी. चाऱ्याची गुणवत्ता व पचनियता उत्तम ठेवण्यासाठी नंतरच्या कापण्या दर ४० ते ४५ दिवसांच्या अंतराने कराव्यात. कापणी जमिनीला फार खरडून न करता साधारणत: २ इंच वर करावी. हिवाळ्यात वाढ कमी होते म्हणून कापणी लांबवू नये. वर्षभरात ६ ते ८ कापण्यापासून प्रति हेक्टरी १८० ते २०० टन हिरव्या चाऱ्याचे उत्पादन मिळते.

७) दरवर्षी हिवाळ्यात डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये सऱ्या मोडून हेक्टरी १० टन शेणखत आणि ७५ किलो नत्र, ५० किलो स्फुरद आणि ४० किलो पालाश यांची मात्रा देऊन रानबांधणी करून पाणी द्यावे. म्हणजे फेब्रुवारी पासून जसजसे तापमान वाढेल तसतशी पिकाची जोमदार वाढ होते.

वैशिष्ट्ये ः

१) ही जात बहुवार्षिक असून जास्त चारा उत्पादन देणारी आहे.

२) रुंद पाने, कुसविरहित, मऊ, रसाळ, जाड रसदार व भरपूर पालेदार ताटे असतात.

३) कापणी केल्यानंतर जोमदार फूट येते.

४) चाऱ्यामध्ये ७ ते ८ टक्के प्रथिने, २२ ते २५ टक्के शुष्क पदार्थ, एकूण पचनीय घटक ५५ ते ६० टक्के असतात.

---------------------------

संपर्क ः प्रमोदकुमार ताकवले, ९८८१३६९७५०

(बायफ डेव्हलपमेंट रिसर्च फौंडेशन, मध्यवर्ती संशोधन केंद्र, उरुळीकांचन, जि. पुणे)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com