Lumpy skin : ‘लम्पी’च्या लढाईत बैलांकडे दुर्लक्ष नको

राज्यात मृत्युमुखी पडलेल्या एकूण ९०७ जनावरांपैकी ५० टक्के बैल आहेत. राज्यात गळीत हंगाम लवकरच सुरू होत असल्याने ऊस वाहतुकीसाठी बैलांचा वापर मोठ्या प्रमाणात होणार आहे. अशावेळी बैलांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
Lumpy Skin
Lumpy SkinAgrowon

राज्यातील एकूण पाच प्रजाती खिलार (Khillar Cow), देवनी, गवळाऊ, डांगी व लाल कंधारी या मान्यताप्राप्त असून, त्या त्या भागातील पशुपालकांनी मोठ्या मेहनतीने आणि प्रेमाने सांभाळल्या आहेत. किंबहुना, अनेक कुटुंबाचे अर्थकारण (Farmer's Economy) या देशी जनावरांच्या प्रजातींवर व त्या सदृश दिसणाऱ्या गावठी गाई बैलावर (Desi Bull) अवलंबून असल्याचे निदर्शनास येते. राज्यातील अनेक साखर कारखान्यांचे गळीत हंगाम (Sugarcane Crushing Season 2022) या बैलांच्या जिवावर चालू होतात. अनेक कुटुंबांचा हा व्यवसाय एक मोठा आधारस्तंभ आहे.

सोबत देशी गोवंश संवर्धन, त्याचे दूध, पंचगव्य उत्पादने आणि बरेच काही लोकप्रिय झाल्यामुळे आज महाराष्ट्रात देखील गीर, सहिवाल, यांची संख्या वाढताना दिसते. अनेक युवक या देशी गाई संवर्धनाकडे वळताना दिसत आहेत. बैलगाडी शर्यतीवरील बंदी हटवल्यामुळे खिलारसारख्या पशुधनाला पुन्हा चांगले दिवस येऊ लागले आहेत. एकंदरीतच काय तर देशी गोवंश संवर्धन त्याची गरज, मागणी आणि उत्पादकता वाढीसाठी प्रयत्न आणि प्रयोग राज्यांमध्ये सुरू झाले आहेत.

देशात सध्या सुरू असलेल्या लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. २७ सप्टेंबर २०२२ अखेर देशात जवळपास एक लाख पशुधन मृत्युमुखी पडले आहे. देशी गोवंश जास्त असणाऱ्या राज्यात मरतुकीचे प्रमाण जास्त आहे. महाराष्ट्रात देखील २७ सप्टेंबरअखेर एकूण ९०७ पशुधन मृत्युमुखी पडले असून, त्यांपैकी ४६७ गाई आणि ४४० बैल आहेत. संकरित बैलांची संख्या खूप कमी आहे. म्हणजे मृत्युमुखी पडलेल्या एकूण ९०७ जनावरांपैकी ५० टक्के बैल आहेत हे काळजी करण्यासारखे जरूर आहे, पण त्यावर देखील मात करता येऊ शकेल.

मुळातच लम्पी स्कीन हा आजार सर्वांसाठी नवीन आहे. सुरुवातीच्या काळात झालेली लागण, बरे होण्याचे प्रमाण आणि मृत्यूदर हे सर्व आवाक्यात होते. त्याची तीव्रता इतकी जाणवली नाही पण २०१९ मध्ये ओडिशा राज्यात काही जनावरे बाधित झाली नंतर २०२० पासून आशिया खंडात बांगलादेश, चीन, भारतात या रोगाचा हळूहळू प्रादुर्भाव होत गेला. पण या वर्षी २०२२ मध्ये त्याची तीव्रता इतकी वाढली की देशातील एक लाख पशुधन या वर्षी आत्तापर्यंत या रोगाला बळी पडले आहे.

Lumpy Skin
Lumpy Vaccination : मांडवे परिसरातील १८ हजार जनावरांचे तत्काळ लसीकरण

हा विषाणूजन्य आजार आहे. कॅप्रीपॉक्स या शेळ्या मेंढ्यांमधील देवी या रोगाचा प्रसार करणाऱ्या विषाणूच्या समूहातील हा विषाणू आहे. हे विषाणू वारंवार उत्परिवर्तनातून (म्युटेशन) आपले स्वरूप बदलत असतात. एका संशोधनानुसार आजअखेर लम्पी स्कीनच्या विषाणूचे ३९ प्रकार पुढे आले आहेत. विषाणूजन्य आजारावर मुळातच नेमके औषध उपलब्ध नसल्याने लसीकरण हा एकमेव उपाय असतो. प्रादुर्भाव झालेल्या जनावरांत मात्र लक्षणानुसार उपाय करून पशुवैद्यकांना आपले कसब, निरीक्षण आणि अनुभव पणाला लावून उपचार करावे लागतात.

अशावेळी पशुसंवर्धन विभाग, पशुवैद्यक महाविद्यालये, विद्यापीठ यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार संहिता बनवून त्याद्वारे उपचाराची दिशा ठरवली जाते. पण प्रत्यक्ष उपचार करणाऱ्या पशुवैधकालाच बाधित जनावरानुसार, प्रत्येक दिवसाची लक्षणे, आजारातील चढ-उतार आणि प्रत्यक्ष प्रयोगशाळा तपासण्या पाहूनच उपचाराचा निर्णय घ्यावा लागतो. अशावेळी सवंग लोकप्रियतेसाठी मोफत उपचार किंवा अमुकच औषधे वापरली जावीत, अशा प्रकारच्या धोरणामुळे अडचणी निर्माण होऊ शकतात.

लम्पी स्कीन रोगाचा प्रादुर्भाव आपल्या देशात तसा अलीकडचा! त्यामुळे प्रत्येक गोष्ट ही कोविड नियंत्रणासारखी प्रयोग आणि प्रमाण यावर आधारित आहे. कोविड नियंत्रणात जगातील अनेक देशांतील विदा (डाटा) फार उपयोगी पडला. त्याचे योग्य विश्‍लेषण केले गेले. अनेक यंत्रणांचा कोविड नियंत्रणात समावेश होता पण लम्पी स्कीनबाबत अजूनही आपल्याकडे योग्य विदा उपलब्ध नाही किंवा तो ठेवला गेला नाही. अनेक राज्यांतील लागण, मृत्यू, नेमक्या उपाय योजना याबाबत आकडेवारी तसेच केलेल्या उपायांबाबतच्या माहितीची देवाण-घेवाण होताना दिसत नाही.

Lumpy Skin
Lumpy Skin : ‘लम्‍पी स्कीन’च्‍या अटकावासाठी ग्रामस्‍तरीय समिती होणार स्थापन

राज्याराज्यांत एक वाक्यता नाही. त्यामुळे ही लढाई लढताना खूप मर्यादा येतात. विनाकारण वाद उत्पन्न होऊन पशुपालकांच्या नुकसानीकडे दुर्लक्ष होऊ शकते. उपचाराबाबत अजूनही चांगलं विषाणू प्रतिबंधक नेमकं औषध उपलब्ध नाही. स्टिरॉइड कधी व कोणत्या वेळी द्यावीत, द्यावीत की नाही, मिथिलिन ब्लू वापरावे की न वापरावे या बाबतीत वेगवेगळे मतप्रवाह आहेत. सीआरपी, केएफटी, सीएफटी सारख्या तपासण्या सुद्धा महत्त्वाच्या आहेत. त्यासाठी अनेक माणसांच्या रोगनिदान प्रयोगशाळांची मदत आपल्याला घेता येऊ शकेल. जिल्हा रुग्णालये, शासकीय रुग्णालये हे याबाबतीत मदत करू शकतात.

एकंदरीत या आजारात मोठ्या प्रमाणात देशी गोवंश हा प्रभावित झाला आहे. ज्या ठिकाणी तत्काळ हा रोग निदर्शनाला आला आणि ताबडतोब उपचार सुरू झाले त्या ठिकाणी मृत्युदर फारच कमी आहे. पण जे पशुपालक सुरुवातीला काळजी घेत नाहीत, उशिरा तज्ज्ञ पशुवैद्यकांचा सल्ला घेतात अशावेळी विशेषतः खिलार खोंड, बैल, गाई आणि इतर गावठी गाई देखील ज्यावेळी पायावर सूज येते, सांधे सुजतात, बाधित होतात त्यावेळी ते जनावर बसले की त्याला उठता येत नाही. त्याला फुफ्फुसदाह इतर सहआजार (Co-morbidity) म्हणजे गोचीड ताप, थायलेरियोसिस, बबेसिओसिस, घटसर्पसारखे आजार होतात. प्रतिकारशक्ती कमी होते. आणि मग उपचारांना दाद मिळत नाही. शेवटी मृत्यू ओढवतो.

पुष्कळ पशुपालक अपुऱ्या मनुष्यबळामुळे विलगीकरणात आपली जनावरे ठेवू शकत नाहीत. पण गरज असेल तर ठेवायलाच हवेत. गोचीड, गोमाश्या, डास, माश्या यांपासून संरक्षण हे केलेच पाहिजे. त्यासाठी मोहीम स्वरूपात ग्रामपंचायत, नगरपालिका, दूध संस्था यांनी पुढाकार घेतला तर अजून नियंत्रण आणणे सोपे होईल. अनेक भागांत जनावरे चरायला सोडतात. खरे तर बाधित, उपचाराखालील, नुकतीच बरी झालेली जनावरे ही चरायला सोडू नयेत. पण हवेशीर जागेत बांधून ठेवता येतील. प्रतिकारशक्ती चांगली राहण्यासाठी संकरित गाईप्रमाणे देशी गाई-बैलांना जास्तीचा खुराक देणे आवश्यक आहे.

राज्यातील साखर कारखान्यांचे गळीत हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. मोठ्या प्रमाणात ऊसतोड कामगार आपल्या बैलांसह राज्यात सर्व ठिकाणी स्थलांतर करतात. त्यांनी देखील विशिष्ट काळजी घेणे आवश्यक आहे. कारखान्यांवर निघण्यापूर्वीच लसीकरण करून घ्यावे. साधारण लसीकरणानंतर पंधरा वीस दिवसांनी बाहेर पडण्यास हरकत नाही. लसीकरण दाखला घेऊन बाहेर पडल्यास पुन्हा कारखाना स्थळावर लसीकरण आणि विलगीकरणात वीस दिवस राहावे लागणार नाही.

यामुळे आपले किमती पशुधन या आजारापासून वाचवण्यास मदत होणार आहे. या लेखातील अनेक निरीक्षणे, अनुभव हे प्रत्यक्ष कार्यरत तज्ज्ञ पशुवैद्यकांशी चर्चा करूनच या ठिकाणी मांडले आहेत. पण शेवटी पशुपालकांनी या मंडळींना सहकार्य करणे त्यांच्या सूचनांचे पालन करणे आणि प्रशासनात सहकार्य करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे आपले किमती गाई, बैल वाचतील आणि कारखान्यांच्या गळीत हंगामासह रब्बी हंगाम सुद्धा सुखकर जाईल, यात शंका नाही.

(लेखक पशुसंवर्धन विभागातील सेवानिवृत्त सहायक आयुक्त आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com