कालवडीच्या माजाची लक्षणे, कृत्रिम रेतनावेळची काळजी

कालवडीला कृत्रिम रेतन करताना पशुपालक लिंग निर्धारित तसेच विदेशी वळूच्या रेतमात्रा वापरत आहेत.
Cow
CowAgrowon

डॉ. सचिन रहाणे, डॉ. राजू शेलार

कालवडीला कृत्रिम रेतन करताना पशुपालक लिंग निर्धारित तसेच विदेशी वळूच्या रेतमात्रा वापरत आहेत. अशावेळेस गर्भधारणेचे प्रमाण अधिक मिळवण्यासाठी माज ओळखून योग्य वेळी कृत्रिम रेतन करणे महत्त्वाचे आहे.

पशुप्रजननामध्ये जनावरांचा (Cow) माज (heat) ओळखणे ही एक महत्त्वाची बाब आहे. माजाची सर्व प्रकारची लक्षणे माहिती असल्यास पशुपालक (Pastoralist) कालवडीचा माज सहज ओळखू शकतो. सर्वसाधारणपणे योग्य आहार, व्यवस्थापन केलेल्या कालवडी स्पष्ट व नियमित माज दाखवितात. माज ओळखून वेळेत कृत्रिम रेतन केल्यास गर्भधारणेची शक्यता जास्त राहते. पशुपालक (Pastoralist) आता लिंग निर्धारित रेत मात्रा तसेच विदेशी वळूच्या महागाच्या रेतमात्रा कालवडीस कृत्रिम रेतन करताना वापरत आहेत. अशावेळेस गर्भधारणेचे प्रमाण अधिक मिळवण्यासाठी माज ओळखून योग्य वेळी कृत्रिम रेतन करणे अतिशय महत्त्वाचे आहे.

माजाची प्रमुख लक्षणे : Major symptoms of fever:
१) माजावर आलेली कालवड अस्वस्थ, बेचैन होते, वारंवार हंबरते, कान टवकारते, गोठ्यात फिरण्याचे प्रमाण वाढते.
२) खाणे-पिणे रवंथ यावर लक्ष नसते, भूक मंदावते.
३) माजावर (Heat) आलेल्या कालवडीचा योनिमार्ग लालसर ओलसर सुजल्यासारखा दिसतो.
४) योनीमार्गातून पारदर्शक काचेसारखा स्वच्छ चिकट बळस / स्राव / सोट बाहेर लोंबकळू लागतो किंवा खाली पडतो. ग्रामीण भाषेत याला गाय बळसली किंवा सोट टाकला असे म्हणतात.
५) माजावर आलेली कालवड शेपटी उंचावून एका बाजूला करते.
६) स्पष्ट माजावर आलेली कालवड कळपातील वळूकडे आकर्षित होते, त्याच्याजवळ जाऊन लगट करण्याचा प्रयत्न करते.
७) माजावर आलेली कालवड माजाच्या सुरवातीच्या काळात दुसऱ्या जनावरांवर उड्या मारते, परंतु माजाच्या मधल्या काळात दुसरी जनावरे पाठीमागून उड्या मारत असतील तर माजावर आलेली कालवड स्थिर उभी राहते. याला ‘खडा / पक्का माज’ म्हणतात.
८) काही संकरित गाईमध्ये (Cow) तिसऱ्या चौथ्या दिवशी योनीमार्गातून थोडा रक्तस्राव दिसून येतो.

Cow
उन्हाळ्यात जनावरांचा माज चुकल्यास ‘हे’ नुकसान !

ओळखा कालवडीतील माज
१) माज ओळखण्यासाठी पशुपालकाने दररोज पहाटे, सकाळी, दुपारी व संध्याकाळी कालवडीचे निरीक्षण करावे.
२) मोठ्या गोठ्यावर माज ओळखण्यासाठी नसबंदी केलेल्या वळूचा वापर केला जातो.
३) प्रगत गोठ्यावर कालवडीच्या कानात सेन्सर असलेले बिल्ले बसवून त्याद्वारे संगणकावर माहिती जमा करून तिचे विश्‍लेषण करून कोणती कालवड, गाय माजावर असण्याची शक्यता आहे, त्याची माहिती पशुपालकाला उपलब्ध करून दिली जाते.
४) प्रजननाविषयी सर्व नोंदी वेळच्यावेळी केल्यास पुढील माजाची तारीख बिनचूक काढता येते.

माजावरील कालवडीमध्ये कृत्रिम रेतन ः
१) साधारणपणे कालवडीचा माजाचा कालावधी १८ ते २४ तासांचा असतो.
२) कालवडीमध्ये माजाचा मध्य किंवा उत्तरार्ध म्हणजे पक्क्या/खड्या माजाच्या कालावधीत कृत्रिम रेतन करून घेतल्यास गर्भधारणेची शक्यता अधिक असते.
३) ढोबळमानाने सकाळी माजावर आलेल्या कालवडीस त्याच दिवशी सायंकाळी आणि सायंकाळी माजावर आलेल्या कालवडीला दुसऱ्या दिवशी सकाळी कृत्रिम रेतन करावे.

कृत्रिम रेतनासाठी वळूची निवड ः
१) कालवडीला कृत्रिम रेतन करताना काही गोष्टी ध्यानात ठेवणे आवश्यक आहे, जसे की कृत्रिम रेतनासाठी तिच्या वंशावळीतील
वळू वापरला जाऊ नये, म्हणजेच ‘इन ब्रीडिंग’ टाळले जाईल.
२) कालवडीला तिच्याच जातीच्या वळूच्या रेतमात्रा वापराव्यात, गरज नसताना व योग्य तांत्रिक सल्ला घेतल्याशिवाय दोन भिन्न जातींचे संकरीकरण (क्रॉस ब्रीडिंग) करू नये.
३) कृत्रिम रेतनासाठी वापरल्या जाणाऱ्या वळूची दूध उत्पादन क्षमता कालवडीच्या आईच्या दूध उत्पादन क्षमतेपेक्षा अधिक असावी.
४) वापरण्यात आलेल्या वळूपासून जन्मणाऱ्या वासरांची प्रसूती सहजता (Calving ease score) चांगली असावी.
५) कालवडीची शरीर रचना लक्षात घेऊन त्यात काही सुधारणा करायची असल्यास त्यानुसार योग्य वळूची निवड करावी. एका वेळेस जास्तीत जास्त तीन शारीरिक किंवा आनुवंशिक सुधारणा पुढील पिढीत करण्याचा प्रयत्न करावा.

कृत्रिम रेतन करताना घ्यावयाची काळजी ः
१) कालवड वयात आल्यानंतर पहिल्यांदा माजावर आल्यावर कृत्रिम रेतन करू नये, हा माज वांझोटा असू शकतो. म्हणजेच यात बीजांड सुटण्याची शक्यता कमी असते.
२) बरोबर २१ दिवसांनी माज येण्याचे चक्र सुरू झाले, की त्यातील दुसऱ्या किंवा तिसऱ्या माजावर कालवडीला कृत्रिम रेतन केल्यास गर्भधारणा होण्याची शक्यता अधिक राहते.
३) पशुपालकांनी कालवडीचा पक्का माज ओळखण्यास शिकावे. कृत्रिम रेतन करण्यापूर्वी कालवडीची प्रजनन संस्था व माजाची अवस्था पशुवैद्यकाकडून तपासून घ्यावी.
४) कृत्रिम रेतन करण्यासाठी पशुवैद्यकाला गोठ्यात बोलावून कृत्रिम रेतन करून घ्यावे.
५) कृत्रिम रेतन करताना माजावर आलेल्या कालवडीस ममतेने हाताळावे. ती अस्वस्थ होईल अशी कोणती गोष्ट करू नये.
६) कालवडीची यापूर्वी माजावर आल्याची तारीख, माजावर आल्यानंतर पडणारा सोट किंवा स्रावाची स्थिती या विषयी माहिती पशुवैद्यकाला द्यावी.
७) कृत्रिम रेतन करण्यापूर्वी कालवडीचे निरण, पाठीमागील भाग स्वच्छ धुऊन कापसाने किंवा स्वच्छ फडक्याने कोरडा करून घ्यावा.
८) कृत्रिम रेतन करण्यासाठी योग्य आणि चांगली रेतमात्रा वापरण्याचा आग्रह धरावा.
९) कृत्रिम रेतन करण्यासाठी कोणती रेतमात्रा वापरली, दिनांक याची वहीमध्ये नोंद करून ठेवावी.
१०) काही संकरित कालवडीमध्ये माजाची लक्षणे संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी योनीतून रक्तस्राव होतो, याला सुप्त काळातील रक्तस्राव असे म्हणतात. ही एक नैसर्गिक बाब आहे. अशा परिस्थितीत पशुपालकांनी घाबरून जाण्याचे काही कारण नाही.
११) काही ग्रामीण भागात गाई- म्हशींमध्ये कृत्रिम रेतन केल्यानंतर झाडाला बांधले जाते किंवा तिला बसू दिले जात नाही असे केल्यामुळे गर्भधारणा होते असा एक गैरसमज आहे. परंतु असे केल्यामुळे आणि जनावरांना चारा पाणी न दिल्यामुळे त्यांच्यावरती ताण तणाव येतो आणि गर्भधारणेचे प्रमाण कमी होते.

गर्भधारणा तपासणी
१) कालवडीचे रेतन केल्यानंतर जर ती माजावर आली नाही तर आपण समजतो, की ती गाभण आहे. हे जरी खरे असले तरीही बऱ्याच वेळा इतर काही कारणांनी कालवड माजावर येण्यास विलंब होतो किंवा माजावर येत नाहीत.
२) कालवडीमध्ये कृत्रिम रेतन केल्यानंतर २१ आणि ४२ दिवसानंतर ती माजावर येते का? हे पाहावे. माजावर न आल्यास ६० दिवसांनंतर पशुवैद्यकाकडून गर्भतपासणी करून घ्यावी.
३) कमी दिवसांत म्हणजे २८ दिवसानंतर सोनोग्राफीच्या साहाय्याने गर्भधारणा तपासणी करता येते. अशा प्रकारच्या सुविधा सर्व पशुवैद्यकीय महाविद्यालये आणि शासनाच्या जिल्हा तसेच तालुका पशुसर्वचिकित्सालयात उपलब्ध आहेत.

संपर्क :
डॉ. सचिन रहाणे, ९९७५१७५२०५
डॉ. राजू शेलार, ९४२२६०८२६१
(डॉ. रहाणे हे पशुवैद्यकीय दवाखाना, डिंगोरे, जि. पुणे येथे पशुधन विकास अधिकारी आहेत.
डॉ. राजू शेलार क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा येथे सहायक प्राध्यापक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com