
जनावरांच्या गोठ्याचा मुख्य हेतू त्यांचे ऊन, वारा आणि पाऊस यांच्यापासून संरक्षण करणे असते. दुधाळ जनावरांसाठी गोठा मोकळा, हवेशीर आणि आरामदायी असला पाहिजे.
पावसाळ्यात गोठ्याच्या छप्परातून पावसाचे पाणी गळत असल्यास, गोठ्यात पाणी साचू लागते. जनावरे बसण्याच्या जागी खाचखळगे असल्यास, त्यात जनावरांचे मलमूत्र साचून राहते. विशेषकरून पावसाळ्याच्या (Rainy season) दिवसात जनावरांना गोठ्यातच बांधून ठेवले जाते.
पावसाचे पाणी आत येऊ नये यासाठी गोठे पूर्णपणे बंदिस्त केले जातात. गोठ्यात हवा कोंडली जाते. परिणामी गोठ्यात मोकळी स्वच्छ हवा आत येत नाही. याचा परिणाम म्हणून जनावरांवरती ताण (animal stress) येत असतो.
गोठ्यात जनावरे बसण्याच्या जागी जास्त ओलावा असल्यास जनावरे खाली बसत नाहीत. जनावरे उभे राहूनच रवंथ करतात. जनावरे सतत उभे राहिल्याने त्यांच्या शरीरावर एक प्रकारचा ताण येतो. ऊर्जेचा (Energy) अपव्यय होतो. या सर्वाचा परिणाम दूध उत्पादनावर (Milk Production) झालेला दिसून येतो.
गोठ्यातील वातावरण जास्त वेळ ओलसर राहिल्यास, अशा ठिकाणी जिवाणू, विषाणू आणि परोपजीवींची वाढ मोठ्या प्रमाणात होत असते. परिणामी जनावरे आजारी पडण्याचे प्रमाण वाढते. हे सर्व टाळण्यासाठी गोठ्याचा परिसर स्वच्छ ठेवावा. पावसाळा सुरु होण्यापूर्वी गोठ्याचे छप्पर दुरुस्त करून घ्यावे
पाऊस उघडल्यावर जनावरे सकाळी बाहेर सूर्यप्रकाशात बांधावीत. मलमूत्राची व्यवस्थित विल्हेवाट लावताना संपूर्ण गोठा व्यवस्थित स्वच्छ करून घ्यावा. असे केल्याने गोठ्यातील माशांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.गोठ्यात जनावरे बसण्याच्या जागेवरील सर्व खाचखळगे मुरूम टाकून व्यवस्थित भरून घ्यावेत. जनावरे बसण्यासाठी मॅटचा वापर करावा. गोठ्यातील अमोनिया बाहेर जाऊन हवा खेळती राहील, याकडे लक्ष द्यावे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी गोठ्यातील गव्हाणी, पाण्याचा हौद व गोठ्यामध्ये सर्वत्र चुना मारून घ्यावा. पावसाळ्यात गोठ्यामध्ये पावसाचे पाणी येणार नाही व जनावरे भिजणार नाहीत याची विशेष काळजी घ्यावी.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.