Poultry : ब्रॉयलर कोंबड्यांमधील जलोदराची कारणे

कोंबड्यांमध्ये जलोदर हा ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे होणारा आजार आहे. अंडी उबवताना हॅचरीमध्ये पुरेसा ऑक्सिजन नसेल, तर जन्माला आलेल्या पिलांना जलोदर होण्याची शक्यता खूप जास्त असते, शेडमधील प्रकाशाचा वेळ आपण गरजेनुसार कमी जास्त करू शकतो. योग्य व्यवस्थापन केले असता जलोदर टाळता येऊ शकतो.
Poultry
PoultryAgrowon

डॉ. पार्थ सुतार, डॉ. अक्षय वानखडे

--------------------

कोंबड्यातील जलोदर (Ascites in Chickens) हा अनेक आजारांचे मिश्रण आहे, यामध्ये कोंबड्यांच्या पोटात पिवळ्या रंगाचा द्रव जमा होतो आणि अचानक मृत्यूचे प्रमाण (Mortality Rate In Chicken) वाढते. या आजारामध्ये ब्रॉयलर कोंबड्या (Broiler Chicken) अचानक मरण्यास सुरुवात होते आणि मरतुकीचे प्रमाण वाढते. या आजारात नेहमी पोटात पाणी येते असे नाही, काही वेळा पाणी न भरता अचानक मृत्यू होतो. वाढ थांबल्याने खाद्य परिवर्तन क्षमतेवर (FCR) परिणाम दिसून येतो. जसजसा हिवाळा जवळ येतो, तसतसे जलोदराची समस्या वाढत जाते.

Poultry
Poultry : कोंबड्यांसाठी पोषक खाद्याचे नियोजन

ब्रॉयलर कोंबड्यांची मांस तयार करण्याची आनुवंशिक क्षमता खूप जास्त असते. ४० ग्रॅमचे पिलू ४० दिवसांत अडीच किलो वजनाचे होते. म्हणून त्यांना अतिशय चांगल्या दर्जाच्या खाद्याची गरज असते यामध्ये ऊर्जा आणि प्रथिनांचे योग्य प्रमाण असते. यामध्ये मांसाची वाढ झपाट्याने होते, परंतु हृदय, फुफ्फुसे इत्यादी इतर महत्त्वाच्या अवयवांची वाढ तितक्या वेगाने होत नाही, त्यामुळे वाढत्या शरीराला प्राणवायूचा पुरवठा करण्यास ते इतके सक्षम नसतात. त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त काम करतात. वाढीचा भार वाढल्यास नंतर ते बिघडण्याच्या स्थितीत पोहोचतात. लहान हृदय आणि फुफ्फुसे वाढत्या कोंबडीला पुरेसा आधार देत नाहीत. ब्रॉयलर कोंबड्यांची ऑक्सिजनची गरज वजनाबरोबर वाढते, त्यामुळे हृदय अधिकाधिक रक्त फुफ्फुसांना पाठवण्याचा प्रयत्न करते, परंतु रक्तवाहिन्यांची देखील एक क्षमता असते, ज्यापुढे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, यामुळे रक्तदाब खूप वाढतो. रक्तातून काही पाणी फुफ्फुसात येऊ लागते.

जलोदर होण्याची परिस्थिती ः

१) जेव्हा फुफ्फुसात कमी रक्तप्रवाह होतो आणि दाब वाढतो तेव्हा हृदय वेगाने धडधडू लागते आणि त्याच वेळी अधिक शक्ती लावून रक्त फुफ्फुसात ढकलते. यामुळे हृदयाच्या आकारात वाढ होते, ज्याला “राइट वेंट्रिक्युलर हायपरट्रॉफी” म्हणतात.

२) जेव्हा हृदयातून रक्तप्रवाह थांबू लागतो, तेव्हा यकृत आणि इतर अवयवांमधून येणारे रक्त स्वीकारण्यासही हृदय असमर्थ ठरते. रक्ताचा दाब यकृतातून येणाऱ्या शिरेवर पडतो आणि यकृतामध्ये रक्त जमा होऊ लागते. जास्त दाबामुळे यकृताच्या शिरा मोकळ्या होतात. रक्तातून प्लाझ्मा (द्रव) बाहेर पडू लागतो, हा द्रव पोटात जमा होऊ लागतो, त्यामुळे पोट मोठे होऊ लागते आणि शेवटी पोट फुग्यासारखे फुगते.

३) जलोदर हा प्रामुख्याने ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे होणारा आजार आहे. ही कमतरता वातावरणातील ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे होत नाही तर हृदय आणि फुफ्फुसाच्या मर्यादित क्षमतेमुळे उद्‍भवते. जर शरीराची ऑक्सिजनची मागणी काही प्रमाणात कमी झाली तर हृदयावरील अतिरिक्त ताण टाळता येऊ शकतो, तसेच अशी काही औषधे कोंबडीला दिली पाहिजे, ज्यामुळे त्याच्या हृदयाची कार्यक्षमता वाढते, जलोदरामुळे होणारे मृत्यू कमी करता येतो.

Poultry
Poultry : कृषिपूरक व्यवसायातून सावरले घर!

जलोदराची बाह्य लक्षणे आणि शवविच्छेदनात पाहण्यासारख्या गोष्टी :

१) आकस्मिक मृत्यू होतो.

२) तुरा आणि त्वचा निळसर पडते.

३) बहुतेक कोंबड्या पाठीवर पडून मरतात.

४) श्‍वासातून घरघर आवाज येतो.

५) नर ब्रॉयलरमध्ये मृत्यूचे प्रमाण जास्त असते.

६) तीन आठवड्यांपेक्षा जास्त वयाच्या कोंबड्यांमध्ये मृत्यूचे प्रमाण जास्त आढळते.

७) खाद्यामध्ये मायकोटॉक्सिन यकृताची कार्यक्षमता कमी होते.

८) कोंबडीचे पोट पेंग्विनसारखे दिसते.

९) कोंबडी तोंड उघडे ठेवून श्‍वास घेण्यास सुरुवात करते.

१०) फुफ्फुसे पाण्याने भरतात. फुफ्फुसात जास्त प्रमाणात रक्त मिसळल्याने लालसर पडतात. त्यांचा आकार वाढतो.

११) पोटात पिवळ्या रंगाचे पाणी जमा होते.

१२) हृदयाचा आकार सामान्यपेक्षा २५ ते ३५ टक्यांनी वाढतो (व्हेंट्रिक्युलर हायपरट्रॉफी)

१३) जास्त पाणी आणि सोडिअम शरीरातून बाहेर टाकल्यामुळे, मूत्रपिंडाची कार्यक्षमता कमी होते.

कोंबडी फक्त बसून राहते.

जलोदराची कारणे :

१) रक्त घट्ट झाल्यामुळे रक्तवाहिन्यांमधील त्याचा प्रवाह मंदावतो. रक्तदाब वाढतो आणि रक्तातून पाणी बाहेर येते.

२) फुफ्फुसात रक्त साचल्यामुळे कार्बन डायऑक्साइड शरीरात जमा होऊ लागतो. ज्यामुळे रक्तातील मेटाबॉलिक अॅसिडोसिस होतो, ज्यामुळे हिमोग्लोबिनची ऑक्सिजनशी बांधण्याची क्षमता खूप कमी होते. शरीरात ऑक्सिजनची कमतरता होते.

३) कोंबडीची फुफ्फुसे माणसांसारखी छातीत उघडी राहत नाहीत, तर छातीला चिकटून स्थिर असतात. त्यामुळे कोंबड्यांना छाती फुगवून श्‍वास घेता येत नाही. रक्तात ऑक्सिजनची कमतरता निर्माण होते (सस्तन प्राण्यांच्या तुलनेत) त्यामुळे जलोदरामध्ये ही प्रणाली पूर्णप्रकारे काम करीत नाही. रक्ताचे ऑक्सिजनेशन पुरेशा प्रमाणात होत नाही.

४) ब्रॉयलर कोंबडीचे हृदय लहान असते, जे योग्यरीत्या रक्तपुरवठा करू शकत नाही.

५) गोळी खाद्यामुळे जलोदराची संभाव्यता किंवा धोका वाढू शकतो. कारण ते खूप कमी वेळेत शरीरात भरपूर ऊर्जा पोहोचते, चयापचय करण्यासाठी अधिक ऑक्सिजनची आवश्यकता असते.

६) जास्त उंचीवर (डोंगराळ भाग) जलोदराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते. कारण तेथे ऑक्सिजनचा दाब कमी असतो आणि रक्ताचे शुद्धीकरण कमी होते, फुफ्फुसातील रक्तदाब वाढतो आणि नंतर पाणी बाहेर पडायला सुरुवात होते.

७) काही अभ्यासात असे दिसून आले आहे, की अंड्यातून उशिरा बाहेर पडणाऱ्या पिलांमध्ये जलोदर होण्याची शक्यता वाढते, जिथे अंडी उबवण्याचे काम कमी ऑक्सिजन वातावरणात होते, येथे काही कारणांमुळे तापमान कमी राहते.

८) धान्यामध्ये क्लोराइडचे प्रमाण जास्त असल्याने रक्ताची आम्लता वाढते, ज्यामुळे रक्तात ऑक्सिजनेशन होण्यास अडथळा निर्माण होतो. यातून जलोदर होण्याची शक्यता वाढते.

९) जीवनसत्त्व डी, कॅल्शिअम आणि ओमेगा ३ फॅटी ॲसिडची कमतरता यामुळे जलोदर होण्याची शक्यता वाढते.

१०) शरीरात अँटिऑक्सिडंट्सच्या कमतरतेमुळे ऑक्सिडेटिव्ह तणाव वाढतो. त्यामुळे रक्तातील ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या पेशींचा तुटवडा निर्माण होतो आणि पुन्हा ऑक्सिजनची कमतरता भासते.

११) थंडीच्या मोसमात जलोदराची प्रकरणे वाढतात, याचे कारण ऑक्सिजनची कमतरता. कारण थंड हंगामात कोंबड्या उबदार राहण्यासाठी अतिरिक्त धान्य खातात, जे पचण्यासाठी शरीरात अधिक ऑक्सिजनची आवश्यकता असते.

१२) सर्व जातीच्या कोंबड्यांमध्ये आनुवंशिकदृष्ट्या जलोदराचा धोका असला, तरी कोणत्याही जातीमध्ये ते अधिक दिसल्यास त्या जातीच्या कोंबड्या विकत घेऊ नयेत.

------------------------------------

संपर्क ः

डॉ. पार्थ सुतार, ९०११४२७८३२

डॉ. अक्षय वानखडे, ८६५७५८०१७९

---------------------------------------------------

(लेखक पशू पोषण आणि आहारशास्त्र तज्ज्ञ आहेत.)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com