पशू चिकित्सालयांच्या वेळेत बदल करावा

दरम्यान, वर्षभरातच वेळेत बदल करण्याची नामुष्की पशुसंवर्धन खात्यावर का ओढवली? पूर्वीचा निर्णय घाईघाईत घेण्यात आला का, असा सवाल आता होत आहे.
Animal Husbandry
Animal HusbandryAgrowon

नागपूर : सोयीची नसल्याच्या कारणावरून वर्षभरापूर्वीच पशुवैद्यकीय (veterinary) दवाखान्यांच्या वेळेत बदल करण्यात आला होता. मात्र आता पुन्हा नव्याऐवजी पूर्वीचीच वेळ सोयीची असल्याचे सांगत त्याच वेळा कायम ठेवण्याची शिफारस पशुसंवर्धन आयुक्तांनी सचिवांकडे केली आहे. परंतु वेळेत बदल करण्याची मागणी पशुपालकांऐवजी खात्यातील वरिष्ठांनी केल्याने या विरोधात वातावरण निर्मिती होण्याची शक्यता आहे.

पशुपालक सकाळी शेतीची कामे आटोपून दुपारच्या वेळी जनावरांना उपचारासाठी पशुचिकित्सालयात आणू शकतात, असा विचार यापूर्वी वेळेत बदल करण्यामागे होता. त्यानुसार पशू चिकित्सालयांच्या वेळेत सोमवार ते शुक्रवार सकाळी नऊ ते दुपारी साडेचार तर शनिवारी सकाळी ८ ते दुपारी १ असा बदल करण्यात आला.

पशुपालकांना याद्वारे सलग सेवा मिळणार होती. त्यामुळे शासनाच्या या निर्णयाचे पशुपालकांनी स्वागत केले. आता मात्र ही वेळ सोयीची नसल्याचा दावा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केला आहे. या संदर्भात पशुसंवर्धन आयुक्तांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अधिकाऱ्यांच्या बैठका झाल्या. यामध्ये पशुचिकित्सालयांच्या वेळेत बदल करण्याबाबत चर्चा झाली. त्याची दखल घेत अखेर पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्रप्रताप सिंह यांनी पशू चिकित्सलयांची वेळ पूर्वीप्रमाणेच असावी, अशी शिफारस पशुसंवर्धन सचिवांकडे केली आहे.

दरम्यान, वर्षभरातच वेळेत बदल करण्याची नामुष्की पशुसंवर्धन खात्यावर का ओढवली? पूर्वीचा निर्णय घाईघाईत घेण्यात आला का, असा सवाल आता होत आहे. दरम्यान, महिला पशुवैद्यकांनी या निर्णयाचा विरोध केला आहे.

फेब्रुवारी ते सप्टेंबर

सोमवार ते शुक्रवार : सकाळी ७ ते १२, दुपारी ४ ते ६,

शनिवारी : ७ ते १२

ऑक्टोबर ते जानेवारी

सोमवार ते शुक्रवार : सकाळी ८ ते १, दुपारी ३ ते ५,

शनिवारी : ८ ते १

विविध राज्यांतील पशुचिकित्सालयांच्या वेळा

जम्मू-काश्मीर सकाळी १० ते दुपारी ४, हिमाचल प्रदेश ९:३० ते दुपारी ४, मध्य प्रदेश सकाळी ९ ते दुपारी ४, केरळ ९ ते दुपारी ३, सिक्कीम १० ते ४:३०, तेलंगणा ९ ते दुपारी ४, उत्तराखंड ८ ते २.३०, आसाम ८ ते २ या प्रमाणे विविध राज्यांत पशुचिकित्सालयांच्या वेळा निश्‍चित करण्यात आल्या आहेत.

पशुचिकित्सालयाच्या वेळेत बदल करावा, अशी मागणी पशुपालकांनी केली होती. त्यासाठी विविध ग्रामपंचायतींनी ग्रामसभेत ठराव घेतले. दूध संघ तसेच वैयक्तिक पशुपालकांनी देखील निवेदने सादर केली. त्याच आधारे वेळेत बदल करण्यात आला. आता मात्र पुन्हा वेळेत बदल करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

डॉ. रामदास गाडे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य राजपत्रित पशुवैद्यकीय संघटना

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com