Animal Biodiversity : शाश्वत विकासासाठी पशू जैवविविधता संवर्धन

परभणी येथील पशुवैद्यक आणि पशुविज्ञान महाविद्यालयात आज (ता.२३) आणि उद्या (ता.२४) पशू आनुवंशिक संसाधनांचे व्यवस्थापन या विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने देशातील विविध पशुधनातील जैवविविधतेची स्थिती आणि भविष्यातील संवर्धनाबाबत घेतलेला आढावा...
Indigenous Cow
Indigenous CowAgrowon

डॉ. बी. पी. मिश्रा

Animal Biodiversity Conservation आपल्या देशात विविध प्रकारची जैवविविधता (Biodiversity) आढळून येते. यामध्ये पशुवंश (Animal Breed) प्रामुख्याने महत्त्वाचा ठरतो. पशुधनाच्या (Livestock Breed) विविध जाती आणि संख्या याबाबत भारताचे प्राधान्य दिसून येते.

प्रक्षेत्रावर आढळणारा वशिंडधारी गोवंश तसेच म्हशी, शेळ्या, मेंढ्या, घोडे, वराह, गाढव, उंट, याक, मिथुन, बदक, कोंबडी यांसारखे अनेक जीव आपापल्या विविधतेने नटलेले आहेत.

देशातील विविध भूप्रदेशांत अशा प्राण्यांचा अस्तित्वात असलेला वातावरणातील सहभाग विशेष आहे. देशात २०१९ मध्ये झालेल्या पशुगणनेत ५३६.८ दशलक्ष एवढे पशुधन आणि ८५१.८ दशलक्ष पक्षीवर्गीय प्रजातींची नोंदणी करण्यात आली आहे.

गेल्या ७५ वर्षांत सतत होणाऱ्या संख्यात्मक वाढीमुळे जैवविविधतेत अनेक नवीन बाबी समोर आल्या आहेत.

एकूण नोंदणीच्या १८७ देशी पशू जाती, २२ पक्षी जाती, तीन श्वान जाती अधिकृत मान्यताप्राप्त आहेत. भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या कर्नाल येथील राष्ट्रीय पशुवंश संशोधन ब्युरो या संस्थेकडे त्यांची सविस्तर माहिती संकलित करण्यात आली आहे.

गेल्या ४० वर्षात देशातील अर्थव्यवस्थेत एकूण कृषी क्षेत्राच्या वाट्यांपैकी ३० टक्के सहभाग पशू उत्पादनातून वाढला आहे.

महत्त्वाची बाब अशी, की कृषी विकासापेक्षा पशुधन विकासाचा वार्षिक दर दीडपट अधिक दिसून आला आहे. दूध, मांस, अंडी यांच्या उत्पादनात भरीव वाढ झाली आहे. तसेच निर्यातीसाठी विविध उत्पादनांपासून इतर बाबी निर्माण करण्याच्या संधी वाढल्या आहेत.

Indigenous Cow
Khillar Cow : महाराष्ट्राची शान खिल्लार

जागतिक पातळीवर निर्धारित करण्यात आलेल्या शाश्वत जैवविविधतेच्या उद्दिष्टापैकी १७ बाबी कृषी जैवविविधता या संबंधाने अंतर्भूत करण्यात आल्या आहेत. यामध्ये पशू जैवविविधतेचा समावेश आहे. शाश्वत विकासाच्या उद्दिष्टात पशू जैव विविधता ही शून्य भूक याच संकल्पनेत अंतर्भूत आहे.

यामध्ये बियाणे, वनस्पती, पाळीव प्राणी, आणि हिंस्र प्राणी यांचा जैव विविधतेबाबत समावेश करण्यात आला आहे. उपमुद्यामध्ये ऱ्हासाकडे वळलेली पशू जैवविविधता टिकून ठेवण्याचा मसुदा आहे.

वातावरणाशी जुळलेली स्थानिक जनावरे टिकविण्याचे उद्दिष्ट अशाच प्रकारे मांडण्यात आले आहे. अन्न आणि कृषी संघटनेकडे जैवविविधता नियंत्रणाची जबाबदारी आहे. या संस्थेने जागतिक पातळीवर कृतीसाठी आराखडा निर्धारित केला आहे.

साधारणपणे २००७ मध्ये अनेक देशांनी आंतरराष्ट्रीय घोषणा पत्रानुसार संवर्धनाचा स्वीकार केला आहे. या घोषणा पत्रात पशू संसाधन जैवविविधता अधोरेखित असून, जगभरात याबाबत सतत संशोधन, संवर्धनाचा कार्यक्रम सुरू आहे.

Indigenous Cow
Indigenous Chickens Breed : देशी कोंबड्यांच्या विविध जातींची ओळख

देशातील पशू संसाधनांची उपलब्धता

शाश्वत विकासाच्या उद्दिष्टातील शून्य भूक संकल्पनेत भारताची बाजू महत्त्वाची ठरते. मानवी अन्नपोषण, पीक पोषणासाठी साहाय्य, वाहतूक, उत्कृष्ट खते, जैविक खते आणि पर्यावरण संतुलन यादृष्टीने पशुधनाचे महत्त्व आहे.

जगातील एक पंचमांश अन्न पशू उत्पादनातील दूध, अंडी, मांस यापासून मिळते. या बाबी अधिक प्रमाणात उत्पादन करण्याचा जगभरात प्रयत्न सतत सुरू आहे.

देशात २०२०- २१ मध्ये २१० दशलक्ष मेट्रिक टन एवढे दूध उत्पादन नोंदविण्यात आले. देशात प्रति माणसी प्रति दिन ४०६ ग्रॅम एवढे दूध वापरले जाते. यामध्ये वाढ दिसून येत आहे. अंडी उत्पादन आणि वापरामध्येही वाढ झालेली आहे. या पशुसंसाधनातून भारताची मानवी अन्नसुरक्षा आणि मूल्यवर्धित पदार्थ निर्मिती निर्यातक्षम झाली आहे.

देशात प्रथिनांचा वापर मानवी आहारात वाढण्यासाठी पशू उत्पादने महत्त्वाची ठरतात. जैवविविधतेमुळे मिळणाऱ्या उत्पादक बाबी वेगळ्या नावीन्य आणि रुचकर पौष्टिकतेच्या आहेत.

Indigenous Cow
Indigenous Cow : देशी गाई वाढविण्यासाठी ‘भ्रूण प्रत्यारोपण’ आवश्‍यक

भविष्यातील कार्याची दिशा

देशातील विस्तीर्ण प्रदेशांनी व्यापलेला भूभाग आणि तेथील निसर्ग संपदा, वातावरण, पर्यावरण नैसर्गिक संसाधनामध्ये अनेक पशुवंश अजूनही नोंदणीच्या टप्प्यात आलेला नाही. जगातील दहा टक्के पशूधन संख्या असणारा भारत केवळ चार टक्के पशू वंश नोंदणीकृत झालेला दिसतो.

एका पशुवंशास तीन दशलक्ष पशुधन अशी देशाची बाजू जगापेक्षा मोठी आहे, कारण परदेशात केवळ ०.९ दशलक्ष पशुधनास एक अधिकृत वंश मानले जाते. देशातील ५४ टक्के पशुधन वंशरहित असल्याने नोंदणी आणि अधिकृत विकासापासून दूर आहे.

देशातील अनेक राज्यात पशू जैवविविधता गांभीर्यायाने घेतली जात नाही, मात्र महाराष्ट्राचा यात समावेश नाही. भविष्यात पशुसंवर्धनाच्या आधुनिक पद्धती विस्तारित झाल्यास नोंदणीकृत सर्वच वंश आधुनिक आणि शास्त्रीय पद्धतीने संवर्धित विकसित आणि उपयुक्त करण्यास मदत होईल.

देशातील पशू संवर्धनाची स्थिती

देशात पशुवंश नोंदणी विशेष पद्धती आणि राजपत्र प्रकटन अवलंबण्यात येते. या पद्धतीमुळे नवीन वंश सार्वभौम अधिकार निश्चित होतो.

नोंदणीकृत पशुवंश विकासाची जबाबदारी राज्य शासनाकडे सोपवण्यात येते. अशा सर्व पशुवंशाचे दर पंचवार्षिक संख्यात्मक गणनेमुळे अस्तित्व कळू शकते.

देशात एकूण २१२ स्थानिक देशी वंशापैकी गोवंश ५३, म्हैससवर्गीय २०, शेळी ३७ ,मेंढी ४४, अश्व ७ , उंट ९, वराह १३ ,गाढव ३, याक एक, बदक दोन, गीज एक आणि कोंबडी १९ अशा संख्येने जातींची नोंद करण्यात आली आहे.

यातील ८४ नोंदी गेल्या बारा वर्षांतील आहेत. वंश विरहित पशुधन अभियानात पुढील काही वर्षात शंभरहून अधिक नोंदी अपेक्षित आहेत.

संस्थेच्या राष्ट्रीय जनुक बँकेत नोंदणीकृत पशुधनाच्या संवर्धनासाठी मर्यादित आणि दीर्घकालीन योजनेत प्रयत्न केले जातात.

अधिकृत नोंदणीच्या ६३ वंशाचे रेत नमुने अतिशीत बीज मात्रा स्वरूपात संवर्धन करण्यात आले आहे. ३४ स्थानिक वंशाचे संरक्षण शरीर पेशी साठवणूक स्वरूपात केलेले आहे. वंशाच्या स्त्रीबीज आणि अनुवंशिकतावाहक डीएनए यांचेही संवर्धन होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com