Lumpy Skin : स्वतः जगातून गेली पण वासराला जगवलं

‘लम्पी’ झालेल्या गायीची मन हेलावणारी कहाणी; पशुपालकच बनताहेत योद्धे
Lumpy Skin
Lumpy SkinAgrowon

कोल्हापूर : जिल्ह्यात ‘लम्पी स्कीन’चा उद्रेक (Lumpy Skin Outbreak) थांबायला तयार नाही. जसजसे जनावरांचे हृदयद्रावक मृत्यू (Lumpy Skin Animal Death) होत आहेत, तसतसा शेतकरी हतबल बनला आहे. डोळ्यांतून अश्रूंच्या धारा थांबायला तयार नाहीत. दुःख सांगायचे कोणाला हाच प्रश्‍न मृत्यू झालेल्या पशुपालकांना पडला आहे.

...अनाथ वासराला सांभाळतोय

कोरोची (ता. हातकणंगले) येथील पुरंदर पाटील यांची ही कहाणी डोळ्यांत आसवे आणणारी. गोठ्यात एकमेव असणाऱ्या देशी गाईच्या मृत्यूने सारे कुटुंब दुःखात आहे. ‘लम्पी स्कीन’शी झुंज देत असताना सुद्धा गाईने वासराला जन्म दिला. वासरू जगले, पण माय गेली! त्यांच्या गोठ्यात म्हशीशिवाय हीच गाय होती!

Lumpy Skin
Lumpy Skin : लम्‍पी स्कीन प्रतिबंधासाठी तपासणी

ही गाय कुटुंबातील एक भाग झाली होती. व्यायली तरीही कुणाला कळत नव्हते, इतक्या हळुवारपणे ती वासरांना जन्म देत होती. पण पंधरवड्यापूर्वी ‘लम्पी’ने गाठले आणि तिचा जीव गेला. हे सांगताना पुरंदर पाटील हेलावतात...

माझ्या दावणीतील गौरी नावाची गोमाता ‘लम्पी’ने हिरावून नेली. पंधरा दिवसांपूर्वी नकळत पाय सुजला अन् लगेच तातडीने उपचार सुरू केले. सुरुवातीला मानेभोवताली दिसणाऱ्या फोडांनी संपूर्ण शरीर व्यापलं. स्थानिक डॉक्टर झाले, सरकारी झाले शेवटी सर्जन आणला. सगळ्यांनी सांगितलेली सगळी औषध आणली. कितीतरी सुया टोचल्या, सलाइन सोडली. पण गाय वेदनेने जसजशी कापत होती, तशी काळीज चऽऽर्र करत होतं.

Lumpy Skin
Lumpy Skin : ‘आरे’ प्रक्षेत्र लम्पी स्कीन संसर्ग केंद्रापासून १० किमी क्षेत्र बाधित घोषित

प्रत्येक वेळी गोठ्यात गेल्यानंतर प्रचंड आशेने ती माझ्याकडे नजर लावून उपचारासाठी मुकी आर्त विनवणी करत होती. मी सुद्धा तिला बरं वाटाव म्हणून कुणी काही सांगतील ते प्रयत्न केले. शेवटी प्रचंड वेदनेचा महापूर पोटात असूनही तिने वासराला जन्म दिला, पण स्वत: मात्र अखेरचा श्‍वास घेऊन आम्हाला पोरकं केलं. असे सांगताना पाटील यांचा गळा दाटून आला. आता तिची आठवण म्हणून वासराला जगवायचा आहे. वासरू अशक्त असलं तरी आम्ही ते जगवणारच असा निश्‍चय पाटील कुटुंबाचा आहे.

स्वतःच बनले ‘योद्धा’

रांगोळी (ता. हातकणंगले) येथील सतीश सादळे हे गेल्या आठ ते दहा दिवसांत झालेल्या सहा जनावरांच्या मृत्यूने हादरलेत. ५० जनावरांचा त्यांचा गोठा. चार गाई बरोबर शेतात काम करणारा तरणाबांड खिलार बैलही त्यांनी गमावला आहे.

आणखी आठ ते दहा जनावरांना ‘लम्पी’ची लागण झालीय. दररोज हजारो रुपयांचा खर्च होतोय. एकीकडे जनावरांच्या मृत्यूने हतबल झालेले मन, तर दुसरीकडे आहे त्या जनावरांना वाचविण्याची पराकोटीची जिद्द त्यांना योद्धा बनवत आहे. जिथून उपलब्ध होतील तिथून वैद्यकीय अधिकारी बोलावणे, जनावरांचे रक्त काढून घेणे, संघाकडे पाठवणे या कामात ते गेल्या चार दिवसांपासून प्रचंड व्यस्त आहेत. ‘पैसा जाऊ दे ओ, पण जनावरे गेली की ती काय परत येणार आहेत का?

आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करणारच,’ असे सांगत त्यांनी पुन्हा जनावरांना औषध देण्यास सुरुवात केली. एकीकडे शासकीय प्रयत्नांना मर्यादा येत असताना दुसरीकडे मात्र शेतकरी स्वतःच युद्धभूमीवर काम करत असल्याचे चित्र गोठ्यामध्ये आहे.

‘लम्पी’चा होणारा प्रचंड प्रसार आता आवाक्या बाहेर जातोय की काय अशी स्थिती आहे. अनेक जण शासकीय लसीवर अवलंबून न राहता खासगी मिळणाऱ्या लसीचा वापर करून पशुधन वाचवायचा प्रयत्न करत आहेत. दररोज होणारे लाखो रुपयांचे नुकसान विचार करण्याच्या पलीकडे जात आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com