बहुवार्षिक संकरित नेपियर चाऱ्याची लागवड

संकरित नेपियर हे बहुवार्षिक गवत बाजरी आणि नेपियर यांच्या संकरातून निर्माण केलेले भरपूर उत्पादनक्षम चारा पीक आहे.
बहुवार्षिक संकरित नेपियर चाऱ्याची लागवड
Hybrid Napier FodderAgrowon

देवानंद राऊत, डॉ. नंदकिशोर हिरवे

संकरित नेपियर हे बहुवार्षिक गवत बाजरी आणि नेपियर यांच्या संकरातून निर्माण केलेले भरपूर उत्पादनक्षम चारा पीक आहे. यात बाजरीतील अधिक प्रथिने आणि नेपियरमधील अधिक उत्पादन क्षमतेचा गुणधर्म आणण्‍यात आले आहेत. संकरित नेपियर हे जलद गतीने २ ते ३ मीटर उंच वाढणारे व कमीत कमी २० ते २५ फुटवे देणारे चारा पीक आहे. या पिकात प्रथिनांचे प्रमाण सरासरी १० ते ११ % आहे. या उत्तम प्रतीच्या चारा पिकाची एकदा लागवड केल्यानंतर ३ ते ४ वर्षे जनावरांना हिरवा चारा उपलब्ध होतो. तसेच त्यापासून मुरघासही बनविता येतो.

महाराष्ट्रात लागवडयोग्य जाती ः

१) यशवंत :

* महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये जायंट बाजरा व नेपियर यांच्या संकरातून विकसन.

* ऑक्झिलिक आम्लाचे प्रमाण २.४६ % आणि प्रथिने १०.१५ % असते.

* उत्पादन - हेक्टरी १४० मे. टन

२) फुले जयवंत :

* महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये विकसित केलेल्या या जातीचे उत्पादन यशवंत गवतापेक्षा १० ते १५ % जास्त.

* ऑक्झिलिक आम्लाचे प्रमाण कमी.

३) फुले गुणवंत :

* महात्मा फुले कृषी विद्यापीठ विकसित या चारा जातीमध्ये ऑक्झिलिक आम्ल अल्प प्रमाणात २.०५ % व लिग्निन ६.६३ % प्रथिने अधिक प्रमाणात ९.१० %

* कापणीनंतर जोमाने वाढणारी जात, भरपूर फुटवे, मऊ लांब व रुंद पाते.

* चारा पालेदार, हिरवागार, रसदार, रुचकर.

* वाळलेल्या चाऱ्याची पचन शक्ती जास्त ५६.०८ %.

४) संपूर्णा (डीएचएन- ६) :

* भारतीय चारा संशोधन संस्थेअंतर्गत प्रादेशिक संशोधन केंद्र, धारवाड येथे विकसित या चारा जातीमध्ये ऑक्झिलिक आम्लाचे प्रमाण १.९ % व प्रथिनांचे ११ % आहे.

* कापणीनंतर जोमाने वाढते. फुटव्यांची संख्या २५ प्रति ठोंब.

* गोडवा जास्त प्रमाणात, चारा पालेदार, रसदार व रुचकर.

५) कोइमतूर-४ (CO-४) :

* तमिळनाडू कृषी विद्यापीठ येथे विकसित गवताचे पाते हिरवेगार, रसरशीत व स्वादिष्ट आहे.

* प्रथिनांचे प्रमाण ११ % असते.

* उत्पादन हेक्टरी ३०० ते ३७५ टन.

जमीन :

* संकरित नेपियर चारा पिकाची लागवड उत्तम पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत करावी. दलदल, पाणथळ किंवा निचरा न होणाऱ्या जमिनीत लागवड केल्यास पिकाची वाढ खुंटते.

* हलकी व मध्यम जमीन उपयुक्त. भारी जमिनीत लागवड करू नये.

* सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण जास्त असलेल्या जमिनीत उत्पादन जास्त मिळते.

* जमिनीचा सामू ५.५ ते ६.० दरम्यान असावा.

हवामान :

* उष्ण कटिबंधातील उष्ण व कोरडे हवामान या पिकाला मानवते.

* जास्त पर्जन्यमानाच्या (२५०० मि.मी.पेक्षा जास्त) प्रदेशात या पिकाची वाढ चांगली होत नाही.

* योग्य वाढीकरिता ३१ अंश सेल्सिअस तापमान आवश्यक असते.

पूर्वमशागत :

* प्रथम उभी- आडवी खोल नांगर करून कुळवाच्या २ पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. शेवटच्या कोळपणीच्या वेळी हेक्टरी ८ ते १० टन कुजलेले शेणखत जमिनीत मिसळावे. त्यानंतर लागवडीसाठी सरी वरंबा तयार करावी.

लागवड काळ :

* पाण्याची उपलब्धता असल्यास १५ अंश सेल्सिअसपेक्षा कमी थंडीचा काळ वगळता कधीही लागवड करता येते.

* पावसाळ्यात जून व ऑगस्ट आणि उन्हाळ्यात फेब्रुवारी - मार्च या काळात लागवड केल्यास पिकाच्या वाढीसाठी व स्थिरतेसाठी योग्य असते.

लागवडीचे अंतर व पद्धत :

* लागवड ठोंब (मुळासह काड्या) लावून करावी. ठोंब उपलब्ध नसल्यास साधारणपणे ३ महिने वाढलेल्या पिकाच्या खोडाच्या जमिनीकडील २/३ भागातील कांड्या लावाव्यात. २ डोळे असणाऱ्या कांड्या चांगल्या फुटतात.

* ठोंब / दोन डोळे कांडी ३ फूट अंतरावर काढलेल्या सरीच्या बगलेत एक डोळा जमिनीत व एक डोळा जमिनीच्या वर राहील, अशा रीतीने लावाव्यात. दोन कांडीमधील अंतर साधारणतः २ फूट ठेवावे.

खत व्यवस्थापन :

* लागवडीच्या वेळी पिकाला प्रति हेक्टरी ५०० किलो नत्र (१०० किलो युरिया) ५० किलो स्फुरद (३०० किलो सिंगल सुपर फॉस्फेट) आणि ५० किलो पालाश (साधारण ८० किलो म्युरेट ऑफ पोटॅश) खताची मात्रा द्यावी.

* प्रत्येक कापणीनंतर २५ किलो नत्र (५० किलो युरिया) या खताची मात्रा द्यावी.

* उत्पादनात सातत्य राहावे याकरिता दरवर्षी पिकाला पावसाळ्याच्या सुरुवातीला वरील प्रमाणे खताची मात्रा द्यावी.

पाणी व्यवस्थापन :

हिवाळ्यात पिकाला १५ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. उन्हाळ्यात ८ ते १० दिवसांच्या अंतराने पाणी देणे आवश्यक आहे. पावसाळ्यात पावसाच्या दिवसात खंड पडल्यास संरक्षित पाण्याची व्यवस्था करावी. पाण्याचा ताण पडल्यास गवताच्या उत्पादनावर परिणाम होतो.

आंतरमशागत :

संकरित नेपियर हे बहुवार्षिक बागायती चारा पिकात सुरुवातीच्या काळात तणाचा जास्त प्रादुर्भाव दिसून येतो. याकरिता सुरुवातीच्या वाढीच्या काळात एक किंवा दोन खुरपण्या करणे आवश्यक आहे. त्यानंतर गरजेनुसार खुरपणी किंवा निंदणी करावे.

कापणी :

या पिकाची पहिली कापणी लागवडीनंतर ७५ दिवसांनी करावी. त्यानंतरच्या कापण्या ५० ते ५५ अंतराने कराव्यात. वर्षभरात एकूण ६ ते ८ कापण्या मिळतात. या पिकाची कापणी वेळेत करावी, अन्यथा चारा जाड टणक होऊन पिकातील पोषण मूल्ये कमी होतात. चाऱ्याचे उत्पादन कमी होते. कापणी जमिनीपासून साधारण १५ ते २० सेंमी. (अर्धा फूट) उंचीवर केल्यास फुटवे फुटण्यास चांगली मदत होते.

उत्पादन :

संकरित नेपियर या गवतापासून हिरव्या चाऱ्याचे सरासरी हेक्टरी उत्पादन २०० मे. टनापर्यंत मिळते.

देवानंद राऊत, ७०२०५३२८२० (विषय तज्ज्ञ - पशुसंवर्धन, कृषी विज्ञान केंद्र, सांगवी (रेल्वे), ता. दारव्हा, जि. यवतमाळ.)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com