Donkey : गाढवांची दखल घ्यावीच लागेल

महाराष्ट्रात फक्त १८ हजार गाढवे असून ती २०१२ च्या पशुगणनेच्या तुलनेत ३९.५९ टक्के इतके कमी झाले आहेत. जवळपास चाळीस टक्के एवढ्या प्रमाणात पशुधनाची संख्या कमी होणे, ही बाब अत्यंत गंभीर आहे.
Donkey Farming
Donkey FarmingAgrowon

विविध माध्यमांतून मागील चार-पाच महिन्यांत आपण गाढवाविषयी (Donkey Farming) मोठ्या प्रमाणात बातम्या वाचत आलो आहोत. त्यात 'चीनमध्ये गाढवाची तस्करी,' (Donkey Smuggling) 'पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला गाढव संवर्धनातून (Donkey Conservation) चालना,' 'आंध्र प्रदेशात गाढवाची मांसासाठी कत्तल (Donkey Meat)' आणि अगदी अलीकडे 'कर्नाटकातील तरुणाने नोकरी सोडून गाढव संवर्धन व्यवसायातून मिळवले लाखो रुपये' अशा बातम्यांचा समावेश आहे. खरं तर गाढव अत्यंत गरीब आणि आज्ञाधारक प्राणी, पण तितकाच दुर्लक्षित राहिला आहे. कोणीही जाणीवपूर्वक लक्ष देत नाही. याचं कारण म्हणजे त्याचं संगोपन करणारा भटका विमुक्त, गरीब समाज. वीट भट्टीतील माती, वीट वाहतुकीसाठी कुंभार, दगडाच्या वाहतुकीसाठी वडार, बेलदार, वैदू मदारी ही मंडळी दैनंदिन रोजीरोटीसाठी गाढवांचा सांभाळ करतात आणि आपली उपजीविका साधत असतात.

भारतातील शेतीमाल, दुध उत्पादन वाढवण्यासाठी नेदरलँडचे मार्गदर्शन

जवळपास पाच हजार वर्षांपासून मानवाने गाढवाचा वापर हा आपल्या दैनंदिन कामासाठी सुरू केला आहे. सुरुवातीला इजिप्तमध्ये गाढवाला माणसाळण्यास सुरुवात केली आणि आज जगात जवळपास ४० दशलक्ष गाढवांची संख्या आहे. विकसनशील देशात मोठ्या प्रमाणात या गाढवांचा वापर ओढकाम, वाहतूक, शेती व इतर प्राण्यांची राखण यासाठी केला जातो. अत्यंत स्वभावाने गरीब, आज्ञाधारक आणि कष्टाळू प्राणी आहे.

Donkey Farming
शेळी पालन व्यवसायाला मिळणार चालना; राज्य सरकार राबवणार समूह शेळी योजना 

आपल्या देशात गाढवांची संख्या २०१९ च्या पशुगणनेनुसार १.२ लाख आहे जी २०१२ मधील पशुगणनेच्या तुलनेत ६१.२३ टक्क्यांनी कमी झाली आहे. महाराष्ट्रात फक्त १८ हजार गाढवे असून ती २०१२ च्या पशुगणनेच्या तुलनेत ३९.५९ टक्के इतके कमी झाले आहेत. जवळपास चाळीस टक्के एवढ्या प्रमाणात पशुधनाची संख्या कमी होणे ही बाब अत्यंत गंभीर आहे. अशीच परिस्थिती राहिली तर ते पशुधन हळूहळू नामशेष होऊ शकते अथवा त्या मार्गाने पुढे सरकू शकते. या बाबतीत खरं तर संबंधितांनी काळजी घ्यायला हवी पण एकूणच त्याकडे दुर्लक्ष होताना दिसतंय हे मान्य करावेच लागेल. फक्त 'सेव्ह द डॉंकी' म्हणून घोषणा करून, परिपत्रक काढून भागणार नाही तर धोरणात्मक निर्णयातून आपल्याला ते दाखवावे लागेल.

गाढवाच्या संख्येत झालेली घट ही वाढलेल्या यांत्रिकीकरणामुळे, संबंधित समाजातील वाढलेली साक्षरता त्यातून मिळणाऱ्या नोकऱ्या, नवनवीन व्यवसायांकडे वळलेली नवी पिढी त्यामुळे आणि एकूणच गाढव पालनाकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन त्याचबरोबर सरकारी अनास्था हे देखील एक महत्त्वाचे कारण आहे. आता वाढलेले डिझेलचे भाव, अडचणीच्या ठिकाणी ओझी वाहून नेण्यासाठी होऊ शकणारा वापर (अलिकडेच रायगड/ राजगड किल्ले संवर्धनामध्ये मोठ्या प्रमाणात गाढवांचा वापर दगड वाळू वाहतुकीसाठी केला आहे) अल्प, अत्यल्प भूधारक शेतकरी ज्यांना बैल किंवा यांत्रिक शेती परवडत नाही त्यांना शेतातील मर्यादित कामासाठी गाढवांचा वापर करता येऊ शकतो. मोठ्या बागायती शेतीत माती, खत वाहून नेण्यासाठी यांचा चांगला वापर होऊ शकतो. त्याचबरोबर गाढविणीचे दूध मोठ्या प्रमाणात सौंदर्यप्रसाधने बनवण्यासाठी वापरले जाते. सोबतच अश्व संहिता, चरक संहिता यामध्ये देखील गाढविणीच्या औषधी गुणधर्माबाबत वर्णन केल्याचे दिसून येते. एकूणच परिस्थिती पाहता येणाऱ्या काळात गाढव संवर्धन हे महत्त्वाचे ठरणार आहे.

गाढव संवर्धनाबाबत आज कुठेही नेमकी माहिती उपलब्ध नाही. व्यवस्थापन, निवारा, आरोग्य, प्रजनन याविषयी सहज माहिती उपलब्ध होत नाही. माझ्या एकूण सदतीस वर्षाच्या सेवा काळात फक्त दोन वेळा, 'पोटात दुखणे'

आणि 'विताना आलेला अडथळा' या आजारांवर दोन गाढवावर उपचार करण्याची संधी मला मिळाली. यावरुन लक्षात येईल की किती पशुवैद्यकांचा थेट संबंध या प्राण्यांशी येत असावा. त्यामुळे मुळातच इतर बाबी व्यवस्थापन, निवारा, आहार या बाबतीत सर्वसाधारण पशुवैद्यक हा दूर असतो. संबंधितांना मार्गदर्शन करताना अडचणी येतात. त्यामुळे त्याचे मार्गदर्शन पशुवैद्यकांपासून संबंधित पशुपालकांना सहज मिळायला हवे. याबाबतीत ब्रुक इंडिया (BI) ही संस्था देशात काम करते. देशातील सर्व राज्यातील पशुसंवर्धन विभाग, ग्रामीण विकास यंत्रणा, पशुवैद्यकीय विद्यापीठे आणि संबंधित सेवाभावी यंत्रणा यांच्या सहकार्याने ते घोडे, गाढव, खेचरं या संबंधित काम करताना दिसतात. त्यांच्या माध्यमातून प्रशिक्षण देखील देण्यास सुरुवात केली आहे. मुळातच हा विषय पदवी अभ्यासक्रमात घोड्यांच्या बरोबरीने समाविष्ट होणे आवश्यक आहे. चांगले व्यवस्थापन, निवारा खाद्य व्यवस्थित पुरवले गेले तर गाढवांच्या क्रयशक्तीत निश्चित चांगली वाढ होईल. आणि सध्या प्रचलित दरापेक्षा त्यांना जादा मजुरी मिळेल व त्यांच्या किंमतीही सुधारतील.

गाढव हा सहज आजारी पडत नाही पण जर पडले तर त्यावर औषध उपचार करण्याची देखील संबंधित पशुपालकांची इच्छा नसते. किंबहुना त्यांची आर्थिक परिस्थिती आढ येत असावी. त्यासाठी त्यांना सर्व पशुवैद्यकीय दवाखान्यातून मोफत पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध झाली तर गाढव संवर्धनासाठी हातभार लागेल. त्याचबरोबर जर कोणी या व्यवसायात उतरू इच्छित असेल तर त्याला बँक कर्ज, अनुदान व सोबत पशू विमा देखील उपलब्ध व्हायला हवा. शासकीय आणि खाजगी स्तरावर जर चांगल्या जातिवंत गाढवाची पैदास करून पुरवठा होऊ शकला तर अनेक सुशिक्षित बेरोजगार या व्यवसायाकडे वळू शकतील. मोठे उदरनिर्वाहाचे साधन तयार होऊ शकेल. लीद आणि दुधाचा वापर देखील चांगला होऊ शकतो. लीद खत म्हणून चांगली किंमत मिळू शकते. दुधाच्या बाबतीत त्वचेचा ओलावा वाढवण्यासाठी सौंदर्य प्रसाधनात मोठ्या प्रमाणात वापर सुरू आहे. मानवाच्या दुधाची साधर्म्य असल्यामुळे त्याचा वापर विशिष्ट परिस्थितीत नवजात बालकासाठी होऊ शकतो. त्याच बरोबर कमी फॅट, कमी प्रथिने असल्यामुळे त्याची मागणी वाढू शकते, किंबहुना वाढत आहे. विशेषतः राजस्थानमध्ये मोठ्या प्रमाणात वापर सुरू झाला आहे.

जागतिक स्तरावर माध्यमातून चीन मधील 'इजिआवो' (Ejiao) या नावाच्या औषधनिर्मितीसाठी जगातील पन्नास टक्के गाढवांची संख्या नष्ट होऊ शकेल अशी चर्चा आहे. सोबतच पाकिस्तान गाढवाच्या संख्येत जगात तिसऱ्या क्रमांकावर असून गाढवाच्या निर्यातीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळते, अशा प्रकारच्या बातम्या झळकताना दिसतात. जागतिक स्तरावर ८ मे हा 'जागतिक गाढव दिवस' म्हणून साजरा केला जातो. जेणेकरून या कष्टाळू, आज्ञाधारी प्राण्याने मानवी जातीस दिलेल्या योगदानाची आठवण व्हावी आणि गाढवांसाठी अजून चांगले योगदान देता यावे, हा त्या मागचा हेतू आहे. एकंदरच या सर्वांचा विचार केला तर देशात, महाराष्ट्रात गाढवांची संख्या वाढली पाहिजे. असे झाले तर निश्चितच 'डॉन्की फार्मिंग' ही नवीन संकल्पना प्रत्यक्षात उतरून गाय-म्हैस, शेळी-मेंढी, कुक्कुटपालन याप्रमाणे गाढव पालनास चांगले दिवस येतील.

(लेखक पशुसंवर्धन विभागातील सेवानिवृत्त सहायक आयुक्त आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com