Goat Farming : बंदिस्त, अर्धबंदिस्त शेळीपालनासाठी गोठ्याची रचना

शेळ्यांसाठी बंदिस्त व अर्धबंदिस्त गोठा बांधणी करताना कसा असावा आणि किती खर्चिक असावा, हे ठरविले पाहिजे. शेळीपालनाच्या बाबतीत व्यावसायिकता सांभाळावयाची असल्यामुळे अत्यल्प खर्चात जास्तीत जास्त सोईस्कर गोठा बांधणे आवश्यक ठरते. वेगवेगळ्या वयोगटाची करडे, शेळ्या, बोकडांना एकमेकांपासून दूर ठेवता यावे यासाठी गोठा महत्त्वाची आहे.
Goat Farming
Goat FarmingAgrowon

डॉ. तुषार भोसले, डॉ. उल्हास गायकवाड, जयप्रकाश गायकवाड

नावीन्यपूर्ण पद्धतीने बांधलेल्या गोठ्यात छत बांधणीसाठी सिमेंट पत्रे किंवा लोखंडी पत्रे टाकले असल्यास, वातावरण पुरेसे थंड राहू शकत नाही. मात्र आजूबाजूला वृक्ष लागवड (Tree Plantation) केल्यास हा त्रास कमी करता येईल. झोपडी सारखे, तसेच धाब्यांचे छत किंवा उतरते पालापाचोळ्याचे छत बांधल्यास जास्त सोईस्कर होईल. मात्र पावसाळ्यात त्यातून पाणी आत येणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे, तसेच त्याचे आगीपासून संरक्षण करणे फार आवश्यक असते. सर्व साधारणपणे, शेळीपालनासाठी (Goat Farming) गोठा कोणत्या प्रकारचा असावा, यावर काही निर्बंध नाहीत फक्त ते सर्व सोयींनीयुक्त, टिकाऊ व सुरक्षा देणारे असावे.

शेळ्यांसाठी गोठा बांधणी करत असताना खडी किंवा मुरूम टाकून जमीन कडक करून त्यावर भुसा, तूस, शेंगाची टरफले, चुना व शेण इत्यादी मातीत मिसळून पातळ थर दिलेली जमीन सगळ्या दृष्टीने सोईस्कर ठरते. ठरावीक काळानंतर वरचा थर काढून लेंडीसह खतामध्ये मिसळावा. तसेच दुसरा थर द्यावा लागतो. अशा पद्धतीने केलेली जमीन उबदार असते. त्यापासून शेळ्यांचे थंडीच्या दिवसांत संरक्षण होते.

Goat Farming
Goat Farming : पूरक उद्योगातून बदलले अर्थकारण

शेळीला स्वच्छता आवडत असल्याने, कमी उंचीचे लाकडी मजले पुरविणे फायद्याचे ठरते. करडांनाही त्यावरून चढ- उतर करण्यास, उडी मारण्यास आवडते. लाकडी फळी किंवा लोखंडी पायऱ्यांसारखे मजले दीड ते दोन फूट उंच आणि अडचण न ठरणारे असावेत. मात्र अशा मजल्यांमध्ये गोचीड, पिसवा किंवा इतर परजीवी राहणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. जास्त पाऊस पडणाऱ्या भागात गोठे थोडे उंचीवर व पाण्याचा निचरा होण्यासारखे असावेत.

गोठा बांधणी करत असताना त्याची लांबी दक्षिण-उत्तर असावी. रुंदी पूर्व-पश्‍चिम असावी, जेणेकरून सूर्यप्रकाशाचा पुरेपूर फायदा मिळेल. मलमूत्र जमिनीवर पडल्यास ते लगेच सुकून जाईल व त्यामुळे माश्‍यांचा त्रास होणार नाही.

उष्ण कटिबंधात गोठ्याची दिशा पूर्व-पश्‍चिम लांबी व दक्षिण-उत्तर रुंदी येईल, अशी असावी म्हणजे दुपारच्या तीव्र उन्हाचा त्रास शेळ्यांना होणार नाही. अर्थात, जागेच्या सोयीनुसार (पूर्व-पश्‍चिम शक्य नसल्यास) दिशा थोडी तिरपी ठेवण्यास हरकत नाही. पूर्व-पश्‍चिम लांबी केल्यास गोठ्यामधील तापमान थंड राहते.

Goat Farming
Goat Farming : तुम्हाला शेळ्यांच्या या जाती माहिती आहेत का?

गोठ्यामधील इष्टतम पर्यावरणीय स्थिती १३ ते २७ अंश सेल्सिअस तापमान, सापेक्ष आर्द्रता ६० ते ७० टक्के, वाऱ्याचा वेग ५, तर ८ किमी / तास आणि सौर किरणोत्सर्गाची मध्यम पातळी असावी.

नळीदार कथील, अॅल्युमिनियम किंवा सिमेंटचे पत्रे गोठ्यासाठी वापरावेत. ज्यामुळे आवर्ती खर्च कमी होतो. सामान्यतः जास्त पावसाच्या प्रदेशात गॅबल रूफिंगला प्राधान्य दिले जाते. उष्ण रखरखीत प्रदेशात उंच छप्पर आणि जास्त पाऊस आणि थंड प्रदेशात कमी उंची असणाऱ्या छताला प्राधान्य द्यावे.

कळपासाठी गोठा

यामध्ये प्रौढ प्रजननास योग्य असणाऱ्या शेळ्या ठेवल्या जातात. प्रत्येक शेडमध्ये सुमारे ६० शेळ्या ठेवल्या जाऊ शकतात. शेड तीन मीटर उंच असावे. शेडच्या काठावर मुरूम किंवा वीट असावी. सखल आणि मुसळधार पावसाच्या प्रदेशात मजले शक्यतो उंच आणि मजबूत लाकडाचे असावेत.

Goat Farming
Animal Care : तंत्रज्ञान, व्यवस्थापनातूनच गोशाळा होतील सक्षम

बोकडाचा गोठा

या शेडमध्ये बोकड स्वतंत्रपणे ठेवलेले असतात. पर्यायाने लाकडी विभाजन मोठ्या शेडमध्ये उभे करून त्याचे विविध कप्पे तयार करावेत.

गाभण शेळ्यांचा गोठा

शेडमध्ये गाभण शेळ्या स्वतंत्रपणे ठेवल्या जातात. थंडीच्या काळात कृत्रीम उष्णता देणारे उपकरण (रूम हीटर) गाभण शेळ्यांच्या शेडमध्ये बसवावे. यामुळे नवजात करडांचे हिवाळ्यातील थंडीपासून संरक्षण होते.

करडांचा गोठा

या शेडमध्ये करडे शेळीपासून वेगळे केल्यापासून ते विक्रीयोग्य होईपर्यंत ठेवावेत. प्रत्येक शेडमध्ये सुमारे ७५ करडे ठेवतात. मोठ्या शेडमध्ये योग्य विभाजन करून, लहान करडे, मोठी करडे, परंतु अपरिपक्व आणि परिपक्वता जवळ आलेली करडे स्वतंत्रपणे ठेवता येतात. मोठ्या गोठ्यामध्ये लहान करडांसाठी वयोमानानुसार तीन स्वतंत्र शेड बांधावेत.

आजारी शेळ्यांसाठी गोठा

इतर शेडपासून दूर एक किंवा अधिक (कळपाच्या आकारानुसार) सुमारे ३ × २ मीटर किंवा ३ मीटर आकाराचे आजारी शेळ्यांसाठी शेड बांधावे.

Goat Farming
Animal Care : चारा व्यवस्थापनासह योग्य लसीकरण महत्त्वाचे

दुभत्या शेळ्यांचा गोठा

काही ठिकाणी दुभत्या शेळ्या ठेवल्या जातात. त्यांच्यासाठी एक साधा निवारा आवश्यक असतो. यामध्ये पाण्याचे कुंड, गव्हाणीची व्यवस्था असावी.

जेव्हा मोठ्या संख्येने शेळ्या ठेवल्या जातात तेव्हा दुभत्या शेळ्या, बोकड, करडांसाठी स्वतंत्र शेड असावे.

दुभत्या शेळ्या एका शेडमध्ये ठेवल्या पाहिजेत, मात्र दूध काढण्यासाठी स्वतंत्र सोय असावी. यामुळे वैयक्तिकरीत्या शेळीचे दूध काढणे आणि बंदिस्त शेळीपालन सुलभ होते.

व्यवस्थापनाचे मुद्दे

गोठ्यामधला उतार हा पाण्याचा निचरा होण्यासाठी आवश्यक असला, तरी तो शेळी तिरपी उभी राहील, एवढा जास्त नसावा. पाणी जाण्यासाठी मोरी काढल्यास ती सिमेंटने बांधलेली असावी. त्यात शेळ्या जाणार नाहीत, एवढी बारीक जाळी असावी.

विण्यास आलेली शेळी वेगळी काढून एका कप्प्यात ठेवावी. ती व्याल्यानंतर किमान एक आठवडा त्याच कप्प्यात करडांसह असावी. इतर गाभण शेळ्या एका कप्प्यात ठेवता आल्यास, आहार पुरविण्याच्या दृष्टीने सोईस्कर ठरते.

जेवढे जास्त गट तेवढे निरीक्षणासाठी सोईस्कर पडते. समस्या सोडविण्यासाठी उपयुक्त ठरते. दोन कप्प्यांमध्ये चार ते पाच फूट उंच जाळी असावी. शेळ्या, लहान-मोठी करडे, नर व मादी, प्रजननासाठीचे बोकड, विण्यासाठी आलेल्या शेळ्या, प्रसूत झालेल्या शेळ्या आणि आजारी किंवा बाहेरून आणलेल्या शेळ्या यासाठी वेगळे कप्पे असणे गरजेचे आहे.

प्रजननासाठीचे बोकड एकाच शेडमध्ये असावेत, मात्र काही वेळा टक्करांमुळे ते जखमा करून घेत असल्यास त्यांना दोरीने बांधून ठेवावे. शेळ्या व करडांना बांधण्याची गरज नसते. प्रजननासाठीचे बोकड हे शक्यतो शेळ्यांच्या बाजूला नसावेत.

दूधपिती करडे आणि त्यांच्या शेळ्या समोरासमोरच्या कप्प्यात असाव्यात, अशा पद्धतीने गटांची रचना करावी. प्रत्येक कप्प्यातून मधल्या मोकळ्या जागेत येण्यासाठी लाकडाचे दरवाजे असावेत.

तीन महिन्यांवरील वयाची नर व मादी करडे विक्री होईपर्यंत वेगवेगळ्या कप्प्यात असावीत.

पिण्याचे पाणी कूपनलिकेचे असल्यास त्यात किती क्षार आहे याची चाचणी करावी. साधारणतः आपण पिऊ शकतो, एवढे खारे पाणी शेळ्यांनाही चालते.

हौद स्वच्छ असावा त्यास किमान दर १५ ते २० दिवसाआड चुना लावावा. शेळ्यांना स्वच्छ व थंड पाणी नेहमी उपलब्ध असावे. गरज पडल्यास फक्त तेव्हाच पिण्याचे पाणी निर्जंतुक करावे.

जागेची आवश्यकता

शेळीपालनामध्ये जागेचा योग्य वापर करणे फार आवश्यक असते. शेळ्यांना वेगवेगळ्या वयोगटानुसार कमी-अधिक जागेची आवश्यकता असते. वाढीसाठी योग्य जागा असावी. त्यामध्ये बंदिस्त आणि मुक्त संचार यांचा समावेश होतो.

अ. क्र. वयोगट बंदिस्त गोठा

(चौ.मी.) मुक्त संचार गोठा (चौ.मी.)

१ ३ महिन्यांपर्यंत ०.२ - ०.२५ ०.४ - ०.५

२ ३ ते ६ महिने ०.५ - ०.७५ १.० - १.५

३ ६ ते १२ महिने ०.७५ - १.० १.५ - २.०

४ प्रौढ शेळी १.५ ३.०

५ नर, गाभण किंवा दूध देणारी शेळी १.५ - २.० ३.० - ४.०

जेव्हा शेळ्यांना दिवसा चरायला नेले जाते आणि फक्त रात्री गोठ्यात ठेवले जाते, अशावेळी साधे शेड निवाऱ्यासाठी पुरेसे होते. शेळ्यांना फिरून खाण्याची सवय असते, त्यामुळे बंदिस्त पद्धतीत थोडी मोकळी जागा फिरण्यासाठी असावी.

निवारा लांबीसाठी कोणतेही बंधन नाही, तथापि शेडची रुंदी १२ मीटरपेक्षा जास्त नसावी, इष्टतम रुंदी ८ मीटर असावी. खुल्या जागेसाठी वापरल्या जाणाऱ्या साखळी दुव्याची उंची २ ते २.५ मीटर असावी.

- डॉ. तुषार भोसले,

८००७६५६३२४, ८८३०११७६९१

(पशू संवर्धन व दुग्ध शास्त्र विभाग, कृषी महाविद्यालय, मुक्ताईनगर, जळगाव)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com