
Milk Fat Update : गेल्या काही दिवसांत देशात आणि राज्यात दुधाचे दर (Milk Rate) वाढले आहेत. सध्या स्निग्धांशाचा (फॅट) तुटवडा असल्यामुळे फुल क्रीम दुधाचे दर वाढले आहेत. त्यामुळे फुल क्रीम दूध आणि टोन्ड दूध यांच्या किंमतीत मोठी तफावत पडत असल्याचे दिसून येत आहे.
म्हशीच्या दुधात फॅटचं प्रमाण जास्त असतं तर गायीच्या दुधात फॅट कमी असतं. म्हशीच्या दुधात सरासरी ७ टक्के फॅट आणि ९ टक्के सॉलिड नॉट फॅट (एसएनएफ) कन्टेन्ट असतो. तर गायीच्या दुधात सरासरी ३.५ टक्के फॅट आणि ८.५ टक्के एसएनएफ कन्टेन्ट असतो.
परंतु गेल्या काही वर्षांत म्हशींची संख्या घटत चालल्यामुळे जास्त फॅटच्या दुधाचं उत्पादन रोडावलं आहे, असं मत इंडियन डेअरी असोसिएशनचे अध्यक्ष आर. एस. सोधी यांनी सांगितलं.
सन २०००-०१ मध्ये देशातील एकूण दूध उत्पादनात म्हशींचा वाटा ५६.९ टक्के होता. तर २०२१-२२ मध्ये हा वाटा थेट ४६.४ टक्क्यांवर आलाय. विशेष म्हणजे या कालावधीत देशातील देशी गायींचा वाटाही २४.६ टक्क्यांवरून २०.८ टक्क्यावर घसरला आहे. वाढ झालीय ती संकरित गायींच्या संख्येत. संकरित, विदेशी गायींच्या दुधाचा वाटा १८.५ टक्क्यावरून ३२.८ टक्क्यावर गेला आहे.
“ तूप, आईसक्रीम, खवा, पनीर, चीज आणि इतर दूध उत्पादनांची मागणी वाढत आहे. परंतु दुधाचा पुरवठा प्रामुख्याने संकरित गायींकडून होत आहे. या दुधात फॅटचं प्रमाण कमी असतं. त्यामुळे मागणी-पुरवठ्यात तफावत पडते आहे. त्याचा परिणाम फुल क्रिम दुधाच्या किंमती वाढण्यात झाला आहे,” सोधी म्हणाले.
गल्लोगल्ली असलेले चहावालेही म्हशीच्या दुधाला पसंती देतात. या दुधात १५ ते १६ टक्के सॉलिड्स असतात. त्यामुळे त्यात पाणी टाकून जास्त कप चहा होतो. तो मलईदार असतो.
गेल्या वर्षी ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत अमूल गोल्ड फुल क्रीम दुधाची दिल्लीतील किंमत होती ६२ रूपये लिटर. त्यात ६ टक्के फॅट आणि ९ टक्के एसएनएफ असतं. त्यावेळी अमूल ताजा टोन्ड दुधाची किंमत ५२ रूपये लिटर होती. म्हणजे या दोन दुधाच्या किंमतीत १० रूपयांचा फरक होता. पण आता हा फरक वाढून १२ रूपयांवर पोहोचला आहे.
आता अमूल गोल्डची किंमत ६६ रूपये लिटर आणि अमूल ताजा दुधाची किंमत ५४ रूपये लिटर आहे.
अमूल पाठोपाठ देशातील दुसऱ्या क्रमांकांची सहकारी दूध संस्था असलेल्या कर्नाटकातील नंदिनी दुधानेही फुल क्रीम आणि टोन्ड दुधातील तफावत प्रति लिटर ११ रूपयांवरून १६.५ रूपयांवर पोहोचली आहे. तामिळनाडू मिल्क प्रोड्युसर्स फेडरेशननेही हाच कित्ता गिरवला आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.